Quotes

From the blog

सांग तरंगा

सांग तरंगा मजसी सांग जरा तुझाचि तू की निराचा ह्या खरा ? || धृ || आठव तू तुज पवनाने लोटिले तरंग नावे जळावेगळे केले तेचि नाव तू हृदयी सांभाळिले आता तरी तू जागा होई, साडी भलती तर्हाि || १ || अरे जळावरी चंद्राच्या कर्षणे सागरासी रे तुझे लाभले लेणे तुजला फिरुनी जणू तेचि की होणे … Continue reading सांग तरंगा

More Blog Articles

Upcoming Events

  • No events

अनुग्रह

Posted on July 20, 2016

0.00

प्रास्ताविक

अनुग्रह या अत्यंत पवित्र, नाजुक आणि साधकाच्या जीवनाला नवा रंग देणार्‍या विषयासंबंधी काही लिहावे असा माझा अधिकार नाही; किंवा कोणा अधिकारी पुरुषाने काही लिहिले असेल तर तत्संबंधी काही अभिप्राय व्यक्त करण्याची पात्रताही मजजवळ नाही. तरीही चार शब्द लिहित आहे ते केवळ डॉ. श्री. द. देशमुख यांच्याशी असलेल्या दीर्घ व अकृत्रिम स्नेहसंबंधामुळे. अध्यात्मशास्त्राचा सखोल अभ्यास, प्रदीर्घ काळ केलेली गुरुपदिष्ट साधना, अखंड मनन-चिंतन, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि विचारांची स्पष्टता इत्यादी त्यांच्या गुणांचा परिचय अगदी जवळून झालेला आहे. तत्त्व आणि व्यवहार यांचा सुरेख संगम त्यांच्या ठायी प्रत्ययास आला आहे. म्हणून त्यांचा मजवरील अहेतुक लोभ ही मला मोठी मोलाची गोष्ट वाटते. त्यांच्या इच्छेचा अनादर करणे अशक्य असल्यानेच हे चार शब्द.

‘अनुग्रहा’संबंधी साधकांत आणि अन्य लोकांत देखील फार कुतूहल असते. अनेक समज आणि गैरसमज असतात. परमार्थाचे क्षेत्र प्रदूषित करणार्‍या मतलबी बुवा-महाराजांनीही गोंधळात भर घातली आहे. अशा स्थितीत अनुग्रह म्हणजे नेमके काय, हे सोप्या, सुबोध भाषेत कोणातरी अधिकारी पुरुषाने समजावून सांगण्याची फार आवश्यकता होती. सद्गुरू कोणाला म्हणावे? सच्छिष्य कोण? गुरु-शिष्य संबंधांचे स्वरूप परमार्थामध्ये कशा प्रकारचे असते? महावाक्य कशाला म्हणतात? त्याची तात्त्विक बैठक कोणती? अनुग्रह कोणी घ्यावा? अनुग्रह घेणारावर कोणते दायित्व येऊन पडते? अनुग्रहात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? इत्यादी अनेक प्रश्न साधकाच्या मनापुढे येतात. या सर्व प्रश्नांचे शास्त्रशुद्ध विवेचन डॉ. देशमुख यांनी समर्थपणे केलेले आहे. अनेक मार्मिक उदाहरणांच्या सहाय्याने आणि संतवचनांचा मागोवा घेत त्यांनी सगळा विषय स्पष्ट केला आहे.

डॉ. देशमुख यांच्या विवेचनाचे ठळक वैशिष्ट्य हे की, वेदान्त तत्त्वज्ञानातील अनेक आधारभूत संकल्पना मूळ विषयाच्या अनुषंगाने त्यांनी स्पष्ट केल्या आहेत. उदाहरणार्थ, ‘तत् त्वम् असि’ – ते तूच आहेस, – असे सद्गुरू अनुग्रह देतांना सांगतात. या उपदेशाची तात्त्विक बैठक डॉ. देशमुख यांनी अनेक समर्पक उदाहरणांच्या सहाय्याने समजावली आहे. तसेच वेदान्तातील सुख-दुःख विवेकही प्रशांत जलाशयाचा दाखला देऊन मार्मिकपणे उलगडला आहे. दगडाबरोबर लाडूही त्यांनी आणल्यामुळे विषय सहज गळी उतरतो. गुरुतत्त्व आणि गुरुपरंपरा, संप्रदाय आणि त्याच्या मर्यादा या संबंधीच्या कल्पनाही नेटक्या पद्धतीने पुढे मांडल्या आहेत. ‘शक्तिपाता’चे जे मोठे गूढ सामान्यतः वाटते, त्याचीही उकल केली आहे.

‘जे चि क्षणीं’ अनुग्रह केला| ते चि क्षणीं मोक्ष जाला|

बंधन काही आत्मयाला| बोलोचि नये॥

या समर्थवचनाचा संपूर्ण आशय अशा प्रकारे क्रमाक्रमाने त्यांनी उलगडून दाखविला आहे. वरवर शब्द सोपे वाटतात, पण त्यांचा खरा अभिप्राय कळण्यासाठी अधिकारी पुरुषांकडून काही श्रवण करावे लागते. समर्थांसारखे आत्मज्ञानी सत्पुरुष जेव्हा ‘तत्क्षणी’ असा शब्दप्रयोग करतात, तेव्हा तो क्षण येण्यापूर्वी साधकाला केवढे जीवनपरिवर्तन घडवून आणावे लागते आणि अनुग्रहाचा खरा लाभ कोणत्या साधकांना होतो हे अशा श्रवणाने मनावर बिंबते. ज्याला खरोखरच परमेश्वरप्राप्तीची तळमळ आहे, त्याच्या प्रयत्नांना योग्य दिशा लाभते.

म्हणून ही पुस्तिका छोटीशीच असली तरी तिचे मूल्य निस्संशय मोठे आहे. डॉ. देशमुख यांची या विषयावरील दोन प्रवचने अशा प्रकारे पुस्तिकेच्या स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाशक अभिनंदनास पात्र आहेत. साधक बंधू या पुस्तिकेचे उचित स्वागत करतील, असा विश्वास आहे.

चं.प. भिशीकर, गणेशवाडी, पुणे -४

संपूर्ण ग्रंथ

Click to open PDF in popup window- अनुग्रह

॥ अनुग्रह ॥
(दि. ३-७-९३ व दि. ४-७-९३ ला गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या गुरुवर्य परमपूज्य डॉ. श्री. श्री. द. देशमुख, मुरगुड यांच्या प्रवचनांचे शब्दांकन)

बंधूंनो आणि भगिनींनो,
अनुग्रह असा विषय आपल्या समोर मांडण्यासाठी दिलेला आहे. आणि अनुग्रहाच्या संदर्भात एक ओवी आपल्या समोर ठेवलेली आहे. त्याच ओवीच्या अनुषंगाने विचार करू या. –
जेचि क्षणीं अनुग्रह केला| तेचि क्षणीं मोक्ष जाला|
बंधन कांही आत्मयाला| बोलोचि नये॥ दास. ८-७-५९
अशी ही ओवी आहे. अर्थ सरळ आहे. ज्या क्षणी अनुग्रह केला त्याच क्षणी मुक्त झाला. आत्मा नांवाचे जे तत्त्व आहे, त्या तत्त्वाला बंधन असल्याची कल्पना सुद्धा करता येत नाही, असा ओवीचा सामान्य अर्थ आहे. ह्या ओवीच्या अनुरोधाने दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे. खरंच असं असतं का की ज्या क्षणी अनुग्रह केला जातो, त्याच क्षणी शिष्य मुक्त होतो; का ह्या बोलण्यामध्ये आणखी काही विचार केला पाहिजे? दोन्ही गोष्टी आहेत. ज्या क्षणी अनुग्रह केला त्या क्षणी मुक्त होण्याची शक्यता असते. म्हणजे मुक्त होत नाही असं नाही, पण असं फार फार कमी. ज्ञानदेवांची एक ओवी आहे –
कानावचनाचिये भेटी| सरिसाचि पैं किरीटी|
वस्तु होऊनि उठी| कवण एकु जो॥ ज्ञाने. १८-९८९
कानावचनाचि भेटी ह्याचा अर्थ श्रीगुरूंच्या मुखातून आलेले वचन आणि शिष्याचा कान ह्या दोघांची गाठ-भेट झाल्याबरोबर ‘वस्तु होऊनि उठी’ आत्मा नावाची जी वस्तु आहे, त्या आत्मा नावाच्या वस्तूचा अनुभव घेऊनच तो शिष्य एकदम तयार होऊन जातो. पण तेथे एक गोष्ट लगेच सांगितली – ‘कवण एकु जो|’ आणि ‘कवण एकु जो’ शब्दाचा अर्थ असा आहे की क्वचित कोणी एखादा असा अपवादात्मक असू शकतो. सर्वसाधारणपणे हा नियम लागू होत नाही. आपण तसे आहोत असे समजू नये. परमार्थात काही गोष्टी आपण फार सोयिस्कर रीतीने वापरतो. आपण म्हणतो, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे की ‘वस्तु होऊनि उठी कवण एकु जो’. माझ्या बाबतीत कानावचनाची भेटी झालेली आहे आणि ज्या अर्थी असा कोणीतरी आहे, तर तसा मी का असू नये? अशा तर्हेाचा विचार आपण करतो. मग आपल्याला वाटतं की, आता आपल्याला काहीच कर्तव्य उरलेलं नाही, आपलं काम झालेलं आहे. पण अशा समजुतीत राहिलं तर फार मोठी पंचाईत होण्याची शक्यता आहे. म्हणून जो कोणी असा अपवादात्मक आहे, तो मी नाही एवढी खात्री ठेवावी. पण त्यांच्या सांगण्याचा हेतू एवढाच की ह्या जगामध्ये असं असू शकतं.
जनकराजाची एक कथा सांगतात. जनक स्वतःच्या राजवाड्याच्या गच्चीवरती आनंदाने बसलेला होता. चांदणं होतं आणि ते चांदणं असताना आकाशामध्ये गंधर्वांचा संवाद झाला. आत्मज्ञान किंवा आत्मचर्चा ज्याला म्हणतात, अशी आत्मचर्चा चाललेली होती. आणि ही आत्मचर्चा त्या जनकाने ऐकल्याबरोबर, केवळ त्या आत्मचर्चेच्या श्रवणाने त्याला तत्काळ ज्ञान होऊन गेलं. आतां जनकाला असं ज्ञान का झालं? ‘तो कवण एकु जो’ मधे बसणारा होता म्हणून! वास्तविक श्रीगुरू म्हणून त्याने गंधर्वांना स्वीकारलेलं नव्हतं, त्या गंधर्वांना देखील ठाऊक नव्हतं की असा कोणी एक ऐकणारा बसलेला आहे. पण तरी सुद्धा जनकाला ज्ञान होऊन गेलं तेवढ्या गोष्टीतून. ह्याचा अर्थ असा की असं होऊ शकतं. पण ही फार अपवादात्मक अशी गोष्ट आहे.
सर्वसामान्यपणे इथे जेव्हा समर्थ म्हणतात – ‘जेचि क्षणी अनुग्रह केला| तेचि क्षणीं मोक्ष जाला|’ तेव्हा काय अभिप्रेत असतं? नेहमीच्या व्यवहारात एखादा माणूस आपल्याला काहीतरी काम सांगतो आणि जर ते काम निश्चितपणे आपल्याकडून होण्यासारखं असेल तर आपण त्याला सांगतो, ‘हे काम झालंच म्हणून समजा. पुन्हा त्या विषयी विचार करू नका.’ ही जी आपली बोलण्याची पद्धत आहे, तीच पद्धत इथे आहे. श्रीगुरूंनी अनुग्रह केल्यानंतर, हाताशी धरल्यानंतर अधिकारी साधकाला मोक्ष मिळालाच हे धरून चला. अनुग्रह म्हणजे काय, तो कोणी कोणाला द्यायचा हा सगळा विचार आपण पुढे करणार आहोत. पण ह्याचं तात्पर्य असं आहे की अनुग्रह देणार्याणने आणि अनुग्रह घेणार्यारने जर एकमेकांना नीट पारखून घेतलं असेल, तर अनुग्रहाच्याच क्षणी अनुग्रह घेणारा मुक्त झाला असं समजायला अजिबात हरकत नाही. व्यवहाराच्या भाषेमध्ये मांडणी आहे की तुमचं काम झालंच म्हणून समजा. हे जसं आहे, त्याच पद्धतीचं समर्थांचं हे बोलणं आहे आणि हे समजणं महत्त्वाचं आहे. ज्या क्षणी अनुग्रह, त्याच क्षणी मुक्त होऊन गेला असा त्याचा अर्थ नाही. ज्याला लाक्षणिक म्हणतात, तो अर्थ घ्यायचा आणि ज्याच्या प्राप्तीसाठी बोध केला तो जो आत्मा आहे, त्या आत्म्याला बंधन मानू नये. आत्मा हा बंधनाचा विषय नाही, हे ध्यानात ठेवायचं.
अनुग्रह कोणी कोणाला द्यायचा हे समजून घेण्यापूर्वी प्रथम अनुग्रह म्हणजे काय हे स्पष्ट करू या. अनुग्रह शब्दाचा अर्थ ‘कृपा’ असा आहे. अनुग्रह शब्दाचा दुसरा अर्थ आहे स्वीकारणे. अनुग्रह शब्दाचा तिसरा अर्थ आहे हाताशी धरणे. तीन अर्थ आपल्यासमोर आहेत. एक कृपा करणे, दुसरा स्वीकारणे व तिसरा हाताशी धरणे. अनुग्रह शब्दाध्ये ‘ग्रह’ शब्द आहे. तो ग्रह् हा संस्कृत धातू आहे व त्याचा अर्थ आहे ग्रहण करणे. ग्रहण करणं म्हणजे स्वीकारणं. स्वीकारणं ह्या शब्दाचा अर्थ अनेक ठिकाणी निरनिराळा आहे. खाण्यालाही ‘ग्रहण करणे’ म्हणतात. खिशात घालणं ह्यालाही ग्रहण करणे म्हणतात. तेव्हा ग्रहण करणं ह्या शब्दाचा अर्थ नीट बघू. इथं खिशातबिशात काही टाकायचं नसतं. येथे ग्रहण करण्याचा अर्थ आहे स्वीकारणं. ज्याला स्वीकारायचं आहे ते कशासाठी स्वीकारायचं असतं? तर ते आत्मबोधासाठी स्वीकारायचं, हाताशी धरायचं. ‘हाताशी धरणं’ हा शब्दप्रयोग आपल्या चांगल्या परिचयाचा आहे. एखाद्याला हाताशी धरायचा म्हणजे अगदी चांगला त्याला स्वीकारायचा, आपल्या अगदी जवळ ठेवायचा आणि त्याचं काम पूर्ण होईपर्यंत त्याच्याकडून जे काही साधन करून घ्यायला पाहिजे, ते करून घ्यायचं. असा हा ‘हाताशी धरणं’ ह्या शब्दाचा अर्थ आहे. अनुग्रहाच्या कृपेमध्ये एक वैशिष्ट्य आहे. व्यवहारामध्ये आपण जेव्हा कोणावर कृपा करतो, त्यावेळेला कृपा करणार्या ला आपण कृपा करीत आहोत आणि आपण ती केलेली आहे हे फार लक्षात राहतं. अध्यात्मशास्त्रामध्ये, परमार्थामध्ये, कृपा करणार्याहला आपण कृपा केलेली आहे असं मुळीच वाटत नसतं. ज्याच्यावर ती कृपा झालेली आहे, त्याला मात्र वाटत असतं की आपल्यावर फार मोठी कृपा झालेली आहे. कारण कृपा करणारा जो असतो, तो ‘मी काही करतो’ ह्या भूमिकेच्या पलीकडेच गेलेला असतो. आणि ही भूमिका आपल्या एकदम लक्षात येत नाही, समजत नाही. त्यामुळे व्यावहारिक पातळीवर जसा ‘कृपा करणे’ असा शब्दप्रयोग वापरतो, तशाच अर्थाने परमार्थामध्ये सुद्धा हा शब्दप्रयोग जर वापरला तर तो ठीक नाही.
कृपेमध्ये दयेचा समावेश असतो. व्यवहारामध्ये दया हा शब्द आपल्याला बरा वाटत नाही. ‘माझ्यावर दया करावी’ हे म्हणायला आवडत नाही. कोणीतरी माझी अनुकंपा करावी, कींव करावी, हेही आपल्याला आवडत नाही. पण परमार्थामध्ये दया हा शब्द फार उन्नयन झालेला शब्द आहे. तो फार उंच पातळीवरचा शब्द आहे. उदाहरणार्थ, एखादी झोपडपट्टी पाहिली, तर त्या झोपडपट्टीच्या माणसांविषयी फार दया येते, त्यांच्या विषयी आपल्याला अनुकंपा वाटते. आता ही जी अनुकंपा आहे, ह्या अनुकंपेचे स्वरूप आणि परमार्थामध्ये जे दयेचे स्वरूप आहे ते, ह्यामध्ये पुष्कळ अंतर आहे. परमार्थामध्ये दयेचं स्वरूप, अनुकंपेचं स्वरूप असं आहे की वस्तुतः ज्याच्याबद्दल दया वाटते, ज्याच्यावर दया केली जाते, तो ब्रह्मरूप आहे. पण अज्ञानामुळे, अविद्येमुळे, गैरसमजुतीमुळे तो स्वतःला ‘मी जीव आहे’ असं समजतो. तेवढी त्याची गैरसमजूत दूर करायची आणि त्याचं जे पूर्ण पोटेन्शियल आहे, त्याची जेवढी क्षमता आहे, तेवढ्या क्षमतेची त्याला जाणीव करून द्यायची. त्या क्षमतेचा उपयोग करून घेऊन त्याने आपण जे मूळचे आहोत, त्या मूळच्या स्वरूपापर्यंत शांतपणे पोहोचायचं. हे त्यांना समजत नाही, म्हणून त्यांना ते समजावून सांगायचं. जसा मी ब्रह्म आहे, तसेच ते मुळात आहेत हे पटवून सांगायचं. ‘मी’ शब्दाचा अर्थ श्रीगुरू असा समजतात की ज्या दर्जाचा मी आहे, ज्या योग्यतेचा मी आहे, जसा मी ब्रह्मरूप आहे, तसाच समोरचा माणूसही आहे. प्रत्येक जण तसाच आहे पण त्याला ते कळत नाही. ते त्याच्या लक्षात येत नाही. अनंत जन्मांचे चुकीचे संस्कार त्याच्यावर आहेत आणि त्यामुळे ‘मी ब्रह्म आहे’ हे त्याला कळत नाही. एवढंच समजावून देण्याचं काम करायचं आहे आणि एवढंच दयेचं स्वरूप आहे. अनुकंपेचं स्वरूप आहे. व्यवहारातील जी दया आहे, त्या अर्थाने हे शब्द ह्या क्षेत्रामध्ये वापरले जात नाहीत. म्हणून मी दयेचा विषय होणं, कोणीतरी माझ्यावर अनुकंपा करणं, असं व्यवहारात आपल्याला अजिबात आवडत नाही. समजा मी गरीब असेन आणि मला बसने जावं लागत असेल, तर माझ्यावर कोणीतरी अनुकंपा करावी आणि मला त्याच्या मोटारीने लिफ्ट द्यावी हे मला आवडत नाही. स्वाभिमानी मनुष्य म्हणतो की मी माझ्या पद्धतीने जाईन. थँक्यू. ठीक आहे. हे व्यवहाराच्या दृष्टीने अगदी बरोबर झालं. पण परमार्थामध्ये दया आणि अनुकंपा हे शब्द अशा आशयाचे नाहीत. अनुग्रहामध्ये दया आणि अनुकंपेचा पूर्ण समावेश आहे. अनुग्रह ह्या शब्दातच त्या दोन्हीचा समावेश आहे.
काय द्यायचं असतं अनुग्रहामध्ये? अनुग्रह करणं आणि अनुग्रह देणं ह्यांच्यातच थोडसं अंतर आहे. कोणीतरी म्हणतं की माझ्यावर अनुग्रह करा. म्हणजे माझ्यावर कृपा करा, दया करा. मला काहीतरी समजावून सांगा. अनुग्रह मागतांना असा विचार असतो. पण अनुग्रह देणं ही गोष्ट थोडी वेगळी आहे. अनुग्रह शब्द दोन प्रकारचा आहे. एक सामान्य आणि एक विशेष. एखाद्याकडून जर सुंदर, चांगलं तुम्ही ऐकलं तर त्याने तुमच्यावर अनुग्रह केलेला असतो. हा सामान्य अनुग्रह आहे. अनुग्रह हा केवळ परमार्थाच्याच क्षेत्रात केला जातो आणि केला जावा असं नाही. अज्ञानाची अनेक क्षेत्रे असतात. त्या क्षेत्रांमध्ये एखादा ज्ञानी माणूस जेव्हा तुम्हाला समजेल अशा पद्धतीने काही चांगल्या गोष्टी सांगतो, तेव्हा त्याने तुमच्यावर अनुग्रह केलेला असतो. अनुग्रह शब्दाचा हा सामान्य आशय झाला. पण ‘अनुग्रह देणं’ हा शब्द काहीतरी वेगळा आहे. हा शब्द काही विशेष आहे.
अनुग्रह कशाला करायचा? परमार्थात पारंपारिक पद्धतीने जे काही चालत आलेलं ज्ञान आहे, चालत आलेली जी काही साधनापद्धती आहे, चालत आलेले जे काही मंत्र आहेत, नाम आहे, प्रक्रिया आहे ते सगळं पुढच्याला देणं एवढंच अनुग्रहाचं स्वरूप आहे. याला संप्रदाय असे म्हणतात. संप्रदायामध्ये सम्यक् प्रदान करायचं असतं. पाठीमागून चालत आलेलं जे ज्ञान आहे, जे परंपरेने मिळालेलं आहे, ते पुढच्याला देण्याची जी परंपरा, त्या परंपरेला ‘संप्रदाय’ असे म्हणतात. संप्रदाय हा शब्द आपण वर्तमानपत्रात वारंवार वाचतो. उदा. सांप्रदायिक दंगे. संप्रदाय हा शब्द वर्तमानपत्रांनी वेठीला धरल्यामुळे या शब्दाचा जो खरा अर्थ आहे, तो कुठच्याकुठे दडून गेल्यासारखा झाला आहे. संप्रदाय ह्याचा अर्थ आहे सम्यक् प्रदान. आणि सम्यक् प्रदान शब्दाचा अर्थ आहे, जी पाठीमागून चालत आलेली परंपरा आहे, तीच परंपरा पुढच्या व्यक्तीला आपण देणं. ह्याला म्हणतात संप्रदाय चालवणं, संप्रदाय पुढे नेणं. संप्रदाय शब्द म्हटला की मठ, आश्रम वगैरे आपल्या डोळ्यासमोर येतात. एखादी संघटना येते. काहीतरी त्या संघटनेची घटना असते. काही उत्सव असतात. हे संप्रदायाचं एक स्वरूप, ढोबळ मानाने डोळ्यासमोर येतं. ठीक आहे. ते स्वरूप आहेही. तसं असलंही पाहिजे. पण केवळ तेवढं म्हणजेच तो संप्रदाय नव्हे. सगळीकडे अनुभवाची गोष्ट आहे. एक मठ स्थापन केला की वर्षाचे दहा उत्सव हे विशिष्ट पद्धतीत साजरे झाले पाहिजेत असं ठरवून दिलं. अशी कृतिशीलतेची सवय लागली की त्या कृतिशीलतेमध्ये चिंतनशीलता कुठल्याकुठे निघून जाते आणि ह्याचं कारण असं आहे की जे मला सांगितलं ते मी केलेलं आहे. नेमून दिलेले दहा उत्सव पार पाडलेले आहेत आणि ते पार पाडल्यानंतर माझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही. अशा वेळी संप्रदायाचे उद्देश कुठल्याकुठे राहून गेलेले असतात. म्हणून ह्या अनुग्रहामध्ये जो संप्रदाय असतो, पाठीमागून पुढे चालत आलेलं जे ज्ञान असतं, जो मंत्र असतो, जी एक साधना पद्धती असते, ती पुढे द्यायची असते.
जे अनेक संप्रदाय आहेत किंवा अनुग्रहाच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्या पद्धतींचा उगम भगवान श्रीशंकराच्या ठिकाणी आहे. एकदा भगवान शंकर पार्वतीला अनुग्रह देत होते. जरा अनुग्रहाच्या भाषेत बोलू या आपण. तो उपदेश मच्छिंद्रनाथांनी ऐकला. जरा आपल्या भाषेत बोलायचं असेल तर माशाचं रूप घेऊन तो संवाद त्यांनी चोरून ऐकला. म्हणून मच्छिंद्रनाथांना जो बोध झालेला आहे तो आदिशंकरापासून झालेला आहे. मग मच्छिंद्रनाथांपासून गोरखनाथ, पुढे गहिनीनाथ, निवृत्तिनाथ, त्यांच्यापासून ज्ञानेश्वरमहाराज आणि ज्ञानेश्वरमहाराजांच्या पुढे ज्या परंपरा चालत असतील त्या. ह्याला म्हणतात संप्रदाय. तेव्हापासून चालत आलेली जी अनुग्रहाची पद्धती आहे, ती त्या संप्रदायामध्ये जशी तेव्हा होती, तशीच आता आहे. ह्याचा अर्थ असा आहे की अनुग्रहाची जी पद्धत आहे, अनुग्रहाची जी रीत आहे किंवा अनुग्रहाचं जे साधन आहे, ते साधन मच्छिंद्रनाथांनी चोरलेलं आहे. ते मी जेव्हा ऐकलं, तेव्हा ते मी सुद्धा चोरलेलंच ऐकलं आहे. ‘मी’ शब्दाचा अर्थ म्हणजे मी एक विशिष्ट व्यक्ती असा समजू नका. मी शब्दाचा अर्थ आहे ज्याने ऐकलेलं आहे तो. त्याने ते चोरलेलंच ऐकलं आहे. चोरलेलंच पुढे दिलं आहे. आता जे चोरलेलं आहे, आणि जे चोरलेलंच पुढे दिलं आहे, त्याबद्दल देणार्या च्या मनामध्ये ‘मी काही दिलं’ असं येण्याची शक्यता आहे का? तशी शक्यता नाही. कारण की ते त्याचं स्वतःचं नाही आणि ते दुसर्यातला देणं हा त्याच्या कर्तव्याचाच भाग असतो. जे मागून चालत आलेलं आहे ते पुढच्याला देणं आहे. हा कर्तव्याचाच एक भाग आहे आणि तो भाग पार पाडत असतांना ‘मी देणारा आहे’ अशा तर्हे्चा विचार त्याच्या मनामध्ये डोकावत सुद्धा नाही. त्यामुळे अनुग्रह देणार्याेच्या मनात ‘मी अनुग्रह देणारा आहे’ अशा तर्हेनची भूमिकाच नसते. ह्याच्यामध्ये कृपा जरूर आहे पण ती घेणार्याचला आहे. देणार्यााच्या मनात कृपेचा अंशसुद्धा नाही. ह्याच्यामध्ये दया आहे पण घेणार्याीच्या मनामध्ये. देणार्यााच्या मनामध्ये दयेचा विषयच नाही. अनुकंपेचा कुठे स्पर्शसुद्धा नाही. घेणार्याीला वाटतं की माझं फार कल्याण झालेलं आहे. माझं जीवनसुद्धा खूप बदलून गेलेलं आहे. माझ्या जीवनाचा दर्जा उंच झालेला आहे. घेणार्याआला मोठं समाधान वाटतं आणि त्यात त्याला अनुग्रह देणार्याीची दया दिसते, अनुकंपा दिसते, कृपा दिसते. ह्या सगळ्या गोष्टी घेणार्यासला दिसतात. देणार्याीच्या मनामध्ये असं सुद्धा नसतं की आपण असं काही दिलेलं आहे, असं काही केलेलं आहे. त्याचं कारण आहे. कर्तृत्व नावाची गोष्ट आहे, मी कर्ता हे जे व्यवहारामध्ये रुजलेलं असतं, ती रुजलेली गोष्ट येथे अजिबात शिल्लक नसते. औषधालासुद्धा शिल्लक नसते. ही भूमिका ह्या अनुग्रहाच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवण्याची फार मोठी आवश्यकता आहे.
साधनापद्धती सांगणं हे अनुग्रहाचं मूळ स्वरूप आहे. साधनापद्धती सांगणं, साधनेच्या प्रक्रिया सांगणं, साधनेसंबंधी तत्त्वज्ञान सांगणं आणि हे तत्त्वज्ञान सांगतांना व्यक्तीमध्ये काहीतरी शक्तीचं संक्रमण करणं हे ते स्वरूप आहे. अनुग्रह करणार्याजला ती शक्ती परंपरेने मिळालेली असते. ती त्याने शिष्यात संक्रमित करायची. ती करताना तो माध्यम असल्यासारखा आहे. दृष्टान्त द्यायचा झाला तर ह्या घराला विजेचं कनेक्शन आहे तारांचं. पण ते विजेचं कनेक्शन जर म्हणेल की ह्या घराला मी वीज पुरवठा करतो, तर ते चुकीचं आहे. ती जी तार आहे, ती तार काही विजेचा पुरवठा करीत नाही. त्या तारेला मेन लाईनपासून तार आलेली असते, तेथून जो विजेचा पुरवठा येत असतो, तोच पुरवठा ती तार इथे देत असते. त्या तारेला काहीही अहंकार नसतो. ‘मी ह्या घराला वीज पुरवते’ असं ती म्हणत नाही. पण त्याचबरोबर त्या तारेशिवाय वीज येत नाही हेही तितकंच खरं. दोन्ही गोष्टी खर्याव आहेत. ती तार आहे त्याच खांबापासून इथपर्यंत आलेली, म्हणून वीज आहे. ती तार नसती तर वीज आली नसती. पण म्हणून त्या तारेला जराही अहंकार नसतो की मी कृपा केली, मी काही अनुकंपा केली, मी कांही अनुग्रह केला, मी काही दया केली असा जराही विचार त्या तारेच्या ठिकाणी नसतो. हा अनुग्रहामधला फार मोठा विशेष आहे आणि हा विशेष आपण लक्षात घेण्यासारखा आहे. सारांश, अनुग्रह देणारा स्वतःला कधीच विशेष समजत नाही.
दुसरं असं की अनुग्रहामध्ये शक्तीचं एक संक्रमण असतं. आता हे शक्तीचं संक्रमण कोणी कोणाला करायचं असतं हा एक थोडासा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ज्याच्याजवळ ही शक्ती आहे, त्यानेे हे संक्रमण करायचं असतं ह्यात शंका नाही आणि ज्याला ही शक्ती पेलण्याची क्षमता आहे त्याच्यात हे संक्रमण करायचं असतं. दोन गोष्टी आहेत. एक संक्रमण करणार्या च्या ठिकाणी सामर्थ्य असलं पाहिजे की जे त्याचं नसतंच, परंपरेनं आलेलं असतं, आणि जो घेणारा आहे त्या घेणार्या मध्येही काही सामर्थ्य असण्याची आवश्यकता असते. एकनाथ महाराजांची एक सुंदर ओवी आहे –
जो शब्दज्ञाने पारंगतु| ब्रह्मानंदे सदा डुल्लतु|
शिष्य प्रबोधनीं समर्थु| यथोचितु निजभावें॥ ए. भा. ३-२९८
कोणी अनुग्रह द्यायचा, त्या देणार्यािला काय अधिकार लागतात, त्याचा विचार एकनाथ महाराजांनी केलेला आहे. जो अनुग्रह देणारा आहे, तो शब्दज्ञानामध्ये पारंगत असला पाहिजे. ह्याचा अर्थ अध्यात्मशास्त्राची संपूर्ण जाण त्याला असली पाहिजे. आता अध्यात्मशास्त्राचेही काही भाग आहेत. ते म्हणजे प्रस्थानत्रयीतील गीता, उपनिषदे व ब्रह्मसूत्रे. ह्याविषयी चांगलं ज्ञान त्याच्यापाशी असलं पाहिजे. आणि ह्या ज्या तीन गोष्टी आहेत, त्यांच्यावर अनेक टीका आहेत, त्यामध्ये अनेक मत-मतांतरं आहेत, त्यामध्ये पुष्कळ वाद आहेत. त्या वादांचं, त्या मतांचं सम्यक् ज्ञान त्याच्यापाशी असलं पाहिजे. म्हणजेच तो शब्दज्ञानात पारंगत असला पाहिजे. शाब्दे परे च निष्णतः असला पाहिजे. त्याने शब्दज्ञानात पारंगत असलं पाहिजे ह्याचे एकच कारण आहे. ज्याला हा संप्रदाय संक्रमित करायचा, ज्याला अनुग्रह द्यायचा, त्याच्या मनात शेकडो शंका निर्माण होण्याची शक्यता असते. त्या निर्माण होतातच आणि त्या शंका मग प्रश्नरूपाने मांडल्या जातात. त्या मांडल्या गेल्यानंतर त्यांचं व्यवस्थित समाधान करण्याची क्षमता अनुग्रह देणार्यायच्या ठिकाणी असली पाहिजे. जर उडवाउडवीची उत्तरं, तोंड बंद करण्याची उत्तरं, अशा तर्हेयची उत्तरं येत असतील तर समजायला हरकत नाही की ती क्षमता त्याच्याजवळ नाही. तो शब्दज्ञानात पारंगत नाही. तोंड बंद करण्याची उत्तरं पुष्कळ प्रकारची असतात. ‘काही वर्ष गेल्याशिवाय तुला हे समजणार नाही’ – पहिलं उत्तर. ‘ती वेळ आल्याशिवाय ते होणार नाही’ – दुसरं उत्तर. ‘अजून तुझी समजण्यासारखी योग्यता नाही’ – तिसरं उत्तर. अशा पद्धतीने उत्तरं दिली जातात तेव्हा ती तोंड बंद करण्याची उत्तरं असतात. उत्तरं देणार्यादनी योग्य उत्तरं दिली पाहिजेत. ऐकणार्यावला समजेल अथवा न समजेल, स्वीकारण्याची क्षमता असेल अथवा नसेल. पण उत्तर देणार्यावनी जास्तीत जास्त सोप्या भाषेत उत्तरं दिली पाहिजेत. म्हणून तो शब्दज्ञानात पारंगत असला पाहिजे. पुष्कळ परमार्थ वाङ्मय आपण पाहतो जे प्रश्नोत्तररूपाने आहे. प्रत्यक्ष भगवद्गीतासुद्धा प्रश्नोत्तररूपाने आहे. अर्जुनाने प्रश्न विचारलेत, भगवान श्रीकृष्णांनी उत्तरं दिली आहेत. भागवत बघा. त्यामध्ये अनेक प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचारले आहेत आणि अनेक मोठमोठ्या लोकांनी त्यांची उत्तरं दिली आहेत. सनंदन आहे, शुकांनी उत्तरं दिली आहेत, नारदांनी उत्तरं दिली आहेत आणि प्रत्यक्ष भगवंतांनीही ती दिली आहेत. त्यांच्या शंकांचे व्यवस्थित व पद्धतशीर शास्त्रशुद्ध पद्धतीने समाधान केले आहे. हे जे आपले मोठमोठे पारंपारिक ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांमध्ये प्रश्नोत्तरांची पद्धत रूढ आहे. ह्याचाच अर्थ असा की शिष्याकडून प्रश्न अपेक्षित असतात. प्रश्न निर्माण होणं हे अपेक्षित आहे. प्रश्न निर्माण होणं शक्य आहे. ते निर्माण झाले पाहिजेत आणि सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याची क्षमता अनुग्रह देणार्याहत असली पाहिजे. म्हणून तो शब्दज्ञानात निष्णात असला पाहिजे. – ‘शब्दज्ञाने पारंगतु’.
पण एवढ्याने भागत नाही. ‘ब्रह्मानंदे सदा डुल्लतु’ असा अनुग्रह देणार्या चा पुढचा अधिकार आहे. शब्दज्ञानाचा विषय आहे ब्रह्म, आत्मा. शब्दज्ञानाने जे आत्मा नावाचं तत्त्व, ब्रह्म नावाचं तत्त्व सांगायचं आहे, त्याचा त्याला अखंड अनुभव असला पाहिजे. ही दुसरी पात्रता आहे. ज्याने अनुग्रह द्यायचा त्याच्याजवळ नुसती शाब्दिक ब्रह्मविद्या असून भागत नाही. तर तो ‘ब्रह्मानंदे सदा डुल्लतु’ असला पाहिजे. संतांचे शब्द फार सुंदर असतात आणि संतांच्या शब्दामध्ये काही खोच सुद्धा असते. ही खोच जर लक्षात आली तर ठीक; नाही तर फसगत होते. आताच आपल्यासमोर ओवी आहे – ‘जेचि क्षणीं अनुग्रह केला| तेचि क्षणीं मोक्ष जाला’ आपल्याला सोपं वाटेल – अर्थात चटकन त्याच्यातील खोच जर लक्षात आली नाही तर! आता मी अनुग्रह घेतला आहे म्हणजे आताच्या आता मला मोक्ष मिळालाच आहे असं मी समजेन. आता आत्मा नावाची गोष्ट संपली, मला आता काही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, असं म्हणेन. ही खोच जर लक्षात आली नाही तर मोठी पंचाईत असते. आणि ही खोच का ठेवतात ह्याचंही उत्तर उपनिषदामध्ये आहे. त्याचं उत्तर आहे ‘परोक्षप्रिया हि देवाः|’ देव जे असतात ते परोक्षप्रिय असतात आणि परोक्षप्रिय शब्दाचा अर्थ आहे, एखादी गोष्ट स्पष्ट, स्वच्छ न सांगता जरा दूरान्वयानं सांगणं. असं का सांगायचं? स्वच्छ स्पष्ट सांगायला काय हरकत आहे, असा प्रश्न आपल्यासमोर येतो. पण असं होतं की एखादी गोष्ट आपल्या बुद्धीला आकलन झाली असं जर एखाद्याला वाटलं तर ज्या क्षणी ती बुद्धीला कळली त्या क्षणी आपल्याला तिचा अनुभवच आला अशा तर्हेाचा गोड गैरसमज होण्याची शक्यता असते. असा गैरसमज होणं योग्य नाही. त्यामुळे माणसाचे प्रयत्न अर्ध्यावरच थांबतात. म्हणून जाणत्याला त्याने मार्गदर्शन मागावे यासाठी ही युक्ती आहे. त्याला जेव्हा पूर्ण मार्गदर्शन मिळतं तेव्हा त्याला असं कळतं की खरंच आपण जेवढं समजत होतो, जसं समजत होतो, ते तेवढंच आणि तसंच नाही. ते पूर्णपणे मिळण्यासाठी अजूनही बर्याहच गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. सध्याच्या ओवीबाबत बोलायचे तर केवळ ह्या किंवा अशा ओव्यातून केवळ शाब्दिक ज्ञान होतं पण त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मात्र अजून दूरच असतो. पण हा प्रत्यक्ष अनुभव केव्हा येईल? जर शास्त्रशुद्ध आणि संप्रदायशुद्ध योग्य पद्धतीने त्याने साधना केली, तो प्रॉपर चॅनालमधून आला तरच! इथे पुन्हा आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी. व्यवहारामध्ये एखाद्याच्या अडचणीचा गैरफायदा घेण्याची सवय अनेकांना असते हे आपल्याला ठाऊक आहे. ती सर्वांच्या परिचयाची आहे. पण परमार्थात अनुग्रह मागणार्यााला अडवून ठेवावं आणि आपल्याशिवाय त्याचं अडावं, आपल्याच मार्फत त्याने जावं असा दुराग्रहही येथे त्याज्य आहे. हे सांगावं लागतं याचं कारण असं आहे की व्यवहारातल्या अहंकार पुष्ट करणार्या आमच्या ज्या सगळ्या सवयी असतात किंवा व्यवहारात वागण्याच्या ज्या पद्धती असतात, त्या तशाच्या तशा परमार्थामध्ये असण्याची शक्यता आपण गृहीत धरून चालतो. असं गृहीत धरणं अगदी सहज असतं कारण आपल्या ठिकाणी असलेला स्वार्थी आणि अहंकारी व्यवहाराचा अनुभव आपल्या अंगवळणी पडलेला असतो. परमार्थात एक दक्षता ठेवली पाहिजे. व्यवहारातील सगळ्याच्या सगळ्या सवयी ज्या आहेत, त्या सगळ्या बाजूला ठेवल्याशिवाय परमार्थामध्ये खर्याह अर्थाने प्रवेश होतच नाही. व्यवहारातले सारे निकष परमार्थात जर आणले व त्या निकषांवर जर इथली प्रत्येक गोष्ट घासून पाहू लागलो, तर अध्यात्मासंबंधी, परमार्थासंबंधी पुष्कळ गैरसमज निर्माण होतात आणि परमार्थ हा चर्चेचा, टीकेचा विषय होतो. असे विपरीत समज होऊ नयेत म्हणून इथे एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवायची की इथे अनुग्रह देण्याबाबत कोणी कोणाला अडवत नाही. विशिष्ट व्यक्तीच्याच मार्फत ती गोष्ट झाली पाहिजे अशी काही अनुग्रह ही ‘सोल एजन्सी’ म्हणजे कुणाचा एकाधिकार नाही. व्यवहारात एखाद्या मोठ्या कंपनीने एखाद्या जिल्ह्यात एजंट नेमून दिलेला असतो. प्रत्येक व्यवहार त्याच्याच मार्फत झाला पाहिजे असा नियम असतो. या व्यवहारात त्याचा जो नफा किंवा कमिशन जे काही असेल ते त्यालाच गेले पाहिजे असाही नियम असतो. अशा तर्हेचची एक जी वितरणाची पद्धती आहे, त्या पद्धतीच्या दृष्टीने जर अनुग्रहाकडे बघितलं, तर फार मोठी पंचाईत होते. हेतू अतिशय स्वच्छ आहे. सरळ आहे. चांगला आहे, कल्याणाचा आहे पण केवळ शब्दांनी कळल्यामुळे मला त्याचं ज्ञान झालं असं जर मला वाटलं तर फार मोठी पंचाईत होईल. तो स्वतःच्या खर्याच कल्याणाला मुकेल. ह्या दृष्टीने ‘परोक्षप्रिया हि देवाः|’ म्हटलं आहे. जे काही सांगायचं असतं त्याची अतिशय मोकळ्या शब्दात स्पष्ट मांडणी केली जात नाही. म्हणून कुठेतरी खोच म्हणजे ‘ग्यानबाची मेख’ मारून ठेवलेली असतेच. ‘ग्यानबाची मेख’ हा वाक्प्रचार फार प्रसिद्ध आहे. ग्यानबा म्हणजे ज्ञानेश्वरमहाराज. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत अनेक मेखा मारून ठेवल्या आहेत. म्हणून ग्यानबाच्या नावावरून ‘ग्यानबाची मेख’ असा शब्दप्रयोग मराठीत रूढ झालेला आहे. खरोखरच ज्ञानेश्वरमहाराजांच्या जेवढ्या रचना आहेत, तेवढ्या सगळ्या रचनांमध्ये कुठेतरी मेख आहेच. समर्थांच्या रचनांमध्येही अशी मेख बघायला मिळते. तुकोबारायांच्या रचनांतही अशा मेखा अवश्य आहेत. या सर्वांचा मेख मारण्याचा उद्देश आम्ही त्यांच्याकडे जावं, त्यांच्याशिवाय आमचं अडावं असा नाही. उलट आम्हाला खरं काय ते नीट समजावं आणि आम्ही भ्रमामध्ये राहू नये. केवळ शब्द कळल्यामुळे मला सगळं कळलं असं आम्हाला वाटू नये एवढाच त्यांचा हेतू आहे. नाहीतर ‘मी देह आहे’ हा एक भ्रम, ‘मी मन आहे’ हा दुसरा भ्रम, ‘मी प्राण आहे’ हा तिसरा भ्रम आणि ‘मी ब्रह्म आहे’ हा चौथा भ्रम – अशी ही भ्रमांची रांग लागू नये. ह्या उद्देशाने ‘परोक्षप्रिया हि देवाः|’ म्हटले आहे. ह्या दृष्टीने अनुग्रह करणारा म्हणजे अनुग्रह देणारा ‘जो शब्दज्ञाने पारंगतु| ब्रह्मानंदें सदा डुल्लतु|’ असा असतो, त्याला अनुग्रहाचा विषय असलेल्या आत्मा, ज्ञान, ब्रह्म या तत्त्वांचा सतत अनुभव असला पाहिजे. त्या अनुभवाच्या आनंदात तो सतत डोलत राहील इतकी सहजता त्याच्या ब्रह्मानंदाच्या अनुभवाला आलेली असली पाहिजे.
तो ‘शिष्यप्रबोधनीं समर्थु| यथोचितु निजभावें|’ असा असला पाहिजे, ही आणखी एक मेख नाथमहाराजांनी मारून ठेवली आहे. ‘शिष्यप्रबोधनीं समर्थु’ म्हणजे काय? समोर असलेला जो शिष्य आहे, त्याची पातळी ओळखून, त्याची योग्यता ओळखून, त्याची अवस्था ओळखून त्या अवस्थेनुरूप, ज्याच्या त्याच्या पातळीनुसार त्याचे प्रबोधन करण्याचे सामर्थ्य अनुग्रह देणार्याीजवळ असलं पाहिजे. ‘यथा उचितु’ म्हणजे त्याचा अधिकार पाहून ज्या पद्धतीने करावयास पाहिजे त्याच पद्धतीने. ‘निजभावें’ म्हणजे त्याचा जो स्वतःचा भाव आहे, तो भाव ओळखून तो कुठेशी उभा आहे, त्याच्यात कोणत्या गुणाचे आधिक्य आहे, सत्त्व आहे की रज आहे की तम आहे, ह्या सगळ्याचा विचार करून शिष्याचं प्रबोधन उत्तम होईल अशाच उचित पद्धतीने अनुग्रह देता आला पाहिजे. इतक्या तीन गोष्टी ज्याच्यापाशी आहेत तो अनुग्रह देण्यासाठी खरा समर्थ आहे.
आता पुढचा मुद्दा आहे, अनुग्रह घ्यायचा कोणी? अनुग्रह घ्यायला अडचण कोणालाही नाही. ज्याला इच्छा झालेली आहे की आपण अनुग्रह घ्यावा त्याने अनुग्रह घ्यावा. कारण तत्त्वदृष्ट्या अनुग्रह देणार्याेचा ‘मोक्ष’ हाच अंतिम हेतू असतो. पण स्वीकारणार्यांनच्यामध्ये तरतम भाव असतो. हा तरतम भाव अधिकाराच्या दृष्टीने असतो. म्हणून तुकोबारायांचे एक म्हणणे आहे – ‘अधिकार तैसा करूं उपदेश| साहे ओझें त्यास तेंचि द्यावे॥ जसा अधिकार असेल तसा उपदेश करू. ज्याला डोक्यावर उपदेशाचे, साधनेचे जेवढे ओझे सहन होईल, तेवढेच ओझे त्याला देऊ. जास्त देणार नाही किंवा कमी देणार नाही. म्हणजे ज्याला ‘अंडर युटिलायझेशन’ म्हणतात तसंही नको आणि ‘ओव्हर बर्डन्ड’ म्हणतात, तसंही नको. असं दोन्ही प्रकारचं तारतम्य ठेवून अनुग्रह दिला जातो. म्हणून ‘शिष्यप्रबोधनी समर्थु| यथोचितु निजभावें’ हा नाथांचा शब्दप्रयोग नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. अनुग्रहाची इच्छा अनेक कारणांनी होऊ शकते. कुठल्याही कारणाने झाली तरी ती चांगलीच समजली पाहिजे. आयुष्याचं एक चांगलं नवीन दालन उघडण्याचा तो संकेत आहे असं मानलं पाहिजे. जर तो नंतर टिकला तर पुष्कळ भव्य नि दिव्य गोष्टी त्याच्यामध्ये दडलेल्या दिसतील. नवीन दालन उघडण्याची ती इच्छा आहे हेही पुष्कळ बरं आहे.
अनुग्रह मागण्याची कोणकोणती कारणं असू शकतात? कोणीतरी अनुग्रह घेतलेला आहे असं कळतं. त्यांनी घेतला मग आपणही घेऊ या. इतक्या सहजपणातून कधी कधी अनुग्रह घेतला जातो. कधी असं होतं की काही साधना केली जाते. जमेल तशी, जमेल तेव्हा, जमली तर! पूर्व सुकृताने व प्रयत्नाने साधनात सातत्य राहिले तर काही एक उंची गाठली जाते. साधनाच्या विशिष्ट उंचीवर गेल्यावर त्याच्या असं लक्षात येतं की मी उंचीवर गेलोय खरा, पण अजून समाधान ज्याला म्हणतात, ते काही मला प्राप्त झालेलं नाही. हे समाधान जर मिळायचं असेल तर मला असं कोणतं एक तत्त्व मिळालं पाहिजे की जे विशिष्ट व्यक्तीच्या रूपाने साकार झालंय? मी तत्त्वाच्या भाषेत बोलतो आहे. व्यक्तीच्या भाषेत नाही. ‘सद्गुरू’ हे असं तत्त्व आहे. ‘ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति|’ असं उपनिषदात सांगितलं आहे. याचा अर्थ असा की जो ब्रह्म जाणणारा असतो, तो ब्रह्मरूपच असतो. तो आणि ब्रह्म यांच्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणून म्हटले आहे, ‘ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति|’. मुंडक उपनिषदाचं सांगणं आहे की असा कुणीतरी मुमुक्षूला भेटेल आणि ज्या क्षणी तो भेटेल, तेव्हा अनुग्रह होईल आणि त्या क्षणी मुमुक्षू कृतार्थ होईल. असे सद्गुरू जेव्हा भेटतील तेव्हा अनुग्रह घेतला पाहिजे अशी पद्धत आहे. अशी परंपरा आहे. अशा तर्हेरने अनेकांनी घेतला म्हणून आपणही घेऊ या अशा सामान्य स्तरापासून तर मुमुक्षू, उपासक अशा अत्यंत उच्च स्तरापर्यंत अनुग्रह मागणारी मंडळी असतात. देणार्याूच्या दृष्टीने जे परंपरेने मागून आलेलं आहे, तेच त्याला पुढे द्यायचंय, देऊन मोकळं व्हायचंय. पण खरं तर मोकळं व्हायचं नाहीये. जर हाताशी धरलं असेल तर मोकळं व्हायचं नाहीये. पण देणाराने धरल्यानंतर त्याच्या हाताशीच राहणं इत्यादी पुष्कळ गोष्टी घेणार्यामच्या ठिकाणी हव्या असतात. अनुग्रह घेणारे घेतात, त्याला काही तोटा नाही. पण एकदा तो घेतला की हाताशी राहिलं पाहिजे ना! लहान मुलं असतील तर ठीक आहे. हाताशी धरता येतात, एखादे वेळेस दोन धपाटे देताही येतात. पण हे अनुग्रह घेणारे फार मोठे झालेले असतात. हाताशी धरणारे धरतात पण हेच हाताशी राहत नाहीत. मग मोठी पंचाईत होऊन जाते. दासबोधातील शिष्यलक्षणं या दृष्टीने मुद्दाम वाचावी. ‘शिष्यलक्षणनाम’ असा एक फार मोठा नि सुंदर समास आहे. त्याचा अभ्यास करावा. अभ्यास केल्यानंतर आपल्यालाच आपल्याबद्दल असं वाटतं की ‘कितने पानीमें है पहेचान गये’ आपण किती पाण्यात उभे आहोत हे आपलं आपल्याला कळतं ती शिष्यलक्षणं वाचल्यानंतर. आपली जबाबदारी काय आहे ती आपली आपल्याला कळते. आपली जबाबदारी कळल्यानंतर एका विशिष्ट उंचीवर आपल्याला जाता येतं. तिथेही अनुग्रह तोच असतो. साधन तेच असतं. तत्त्वज्ञानही तेच असतं पण त्या अनुग्रहाचं जे साधन आहे, त्या अनुग्रहाची जी प्रक्रिया आहे, त्या अनुग्रहाचं जे तत्त्वज्ञान आहे ते सगळंच्या सगळं तत्त्वज्ञान त्या उंचीवर गेल्यानंतर फळाला येतं. त्या उंचीवर जाईपर्यंत सगळं जरी तेच असलं तरी त्या विशिष्ट उंचीवर गेल्याशिवाय यातलं काहीही फळाला येत नाही. एवढा फरक शिष्याचा अधिकार अधिक वाढण्यापूर्वीची साधना व तो वाढल्यानंतरची साधना यांच्यात आहे.
आतापर्यन्त आपण थोडक्यात विचार केला की अनुग्रह देणारा कसा असला पाहिजे, अनुग्रह घेणारा कसा असला पाहिजे आणि अनुग्रहाचे स्वरूप काय असतं. सर्वसाधारण कल्पना असते की अनुग्रह म्हणजे मस्तकावर हात ठेवणं. खरं आहे. मस्तकावर हात ठेवणं हा भाग अनुग्रहामध्ये निश्चितपणाने आहे. पण तेवढा तो एकच भाग नाही. त्या शिवायही आणखी अनेक प्रकार आहेत. उदा. अंगठा दाबणं नावाचा एक प्रकार असतो. बारा-तेरा प्रकारचे अनुग्रह असू शकतात. त्यांचं वर्णन मी करत बसत नाही. जसा संप्रदाय चालत आलेला असेल, त्या संप्रदायाची अनुग्रहाची जी रीत असेल, त्या रीतीप्रमाणे तो अनुग्रह दिला जातो. प्रत्येक संप्रदायाची अनुग्रह करण्याची पद्धत वेगळी असते. त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नसतं. म्हणून हे चांगलं, ते वाईट, हे बरोबर, ते चूक अशा पद्धतीचा विचार करायचा नसतो. नाहीतर आमच्या समजुती असतात की विशिष्ट क्रिया केली तरच अनुग्रह झाला, नाहीतर झाला नाही. आपल्याला वाटतं की जर आपल्या अनुग्रहाच्या वेळी तसं झालं नसेल तर त्या संप्रदायाचा अनुग्रह आपल्याला मिळालाच नाही. असं उगीचच वाटत राहतं आणि मग अनुग्रहाचा व्हावा तसा फायदा होत नाही.
सुरवातीला एक विचार मांडला होता की शक्तिसंक्रमण नावाची एक गोष्ट अनुग्रहात असते. त्या शक्तिसंक्रमणाचा अनेकांना अनुभव येतो. काहींना मात्र काहीच अनुभव येत नाही. देणारा एकच असतो, तो देताना कुणालाही काही कमी किंवा जास्त देत नसतो. अमुक असा आहे म्हणून त्याला बेताने द्यावं, अमुक एक तसा आहे म्हणून त्याला सामुदायिक अनुग्रह द्यावा, एखादा जरा खाजगी असावा; हे तो अनुग्रह देणारा मनातच आणत नाही. पण असेही अनुग्रह देणारे कोणी कोणी आहेतच! उदा. पाच रुपयांचा अनुग्रह. सामुहिक स्वरूपात सगळ्याच लोकांना एकाच क्षणात पाच रुपयांचा अनुग्रह ते देतात. तसेच कुणाला गुप्त स्वरूपात अनुग्रह पाहिजे असेल, एकट्याला गुपचुप हवा असेल असा प्रकार चालतो. अशा पद्धतीच्या अनुग्रहाच्या कल्पना पाहण्यात आल्या आहेत. त्या विकृत कल्पना आहेत. देणारा तर तोच आहे, जे द्यायचं ते तो जर जसंच्या तसंच देत असतो तर असा फरक करण्याचं काहीच कारण नाही. फरक जो असतो, तो घेणार्या च्या क्षमतेमध्ये असतो. हे जर लक्षात घेतलं तर ठीक. नाही लक्षात घेतलं तर ज्या अर्थी अन्य कुणाला तरी ‘असा असा’ अनुभव आला आणि मला मात्र तसा आला नाही, त्या अर्थी येथे भेदभाव झालेला दिसतो, असा विकल्प अनुग्रह घेणार्यालच्या मनात निर्माण होतो. रामकृष्ण परमहंसांच्या फार सुंदर कथा आहेत. काही शिष्यांनी त्यांच्यावर असाच आरोप केला होता की तुम्ही माणसं बघून अनुग्रह देता. माणसात काय बघून ते अनुग्रह देत असतील ते शिष्यांनीच ठरवलं. श्रीमंत आहे, विद्वान आहे, वशिल्यातला आहे इत्यादी इत्यादी. इथेही पहा, व्यवहारातल्या सर्व सवयी घेऊनच शिष्य परमार्थाच्या क्षेत्रात उतरले आहेत. म्हणून मूळ जे नेमकं करायला पाहिजे ते राहतं बाजूला आणि या क्षेत्रात जे अजिबात करू नये तेच आपण धरून बसतो. त्यालाच धरून आपण काही उलट सुलट अनुकूल प्रतिकूल विचार करत राहतो. मग मोठी पंचाईत होऊन जाते. रामकृष्ण परमहंसांवर असा काही आरोप केला गेला. त्यांनी एक दिवशी असं ठरवलं की ह्या लोकांची कटकट कायमची बंद करू या. असेच शे-पाचशे लोक जमले होते. त्या प्रत्येकाच्या मस्तकावर परमहंसांनी हात ठेवला. प्रत्येकाच्या ठिकाणी शक्ती संक्रमित केली. ती केल्यानंतर जे तयारीचे होते, ते शांत झाले, स्तब्ध झाले, त्यांची समाधी लागली आणि जे तयार नव्हते, ते नाचायला लागले, वेड्यासारखे हातवारे करायला लागले, ओरडायला लागले, बडबडायला लागले. त्यांना ते शक्तिसंक्रमण सहन झालं नाही. इतका सगळा प्रकार झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण जो आरोप केला होता, तो काही ठीक नव्हता. आपला आरोप बरोबर नाही. आपलीच क्षमता कुठे तरी कमी पडते. देणार्यांीनी द्यायचं तेच सर्वांना दिलेलं आहे. रामकृष्ण परमहंस हे फार मोठ्ठ, महान् नाव आहे. त्यांना भावसम्राट म्हणतात. सगळेच्या सगळे भाव एका ठिकाणी एकवटलेलं असं ते स्वरूप आहे. त्यांची ही कथा मी मुद्दाम सांगितली. कथेवरून ध्यानात यावं की अनुग्रह देणारा जो आहे, तो सर्वांना तेच देत असतो. पण अनुग्रह घेणारांमध्ये व्यक्तिपरत्वे कमीजास्त अधिकार असतो. त्यामुळे अनुग्रह देतांना भेदभाव झाला असं न समजता, आपल्यातच काही कमी जास्त आहे असं जर वेळीच ध्यानात आलं तर आपला अधिकार वाढवण्याची इच्छा निर्माण होते. मग आपण आपला अधिकार वाढवू शकतो. अधिकार प्रत्येकाला वाढवता येतो. ह्या संदर्भामध्ये अनेक अनुभव येतात. कुंडलिनी जागृत होऊ शकते. कुंडलिनी जागृत झाली की पोटात, कंबरेत कळ येण्यापासून तर ओक्साबोक्शी रडेपर्यंत सर्व तर्हेकचे अनुभव असतात. काही ठिकाणी यातली एकही गोष्ट न होता अनुग्रहित साधक अतिशय शांतपणे बसून असतो. तिसरीही गोष्ट होऊ शकते. त्याला काहीच होत नाही. तो शांतही होत नाही, रडत ओरडतही नाही. ह्याचं कारण असं आहे की काहीतरी होण्यासारखं तिथे काही नसतंच. शक्तिसंक्रमण प्रकारानंतर दोघे दिसायला सारखेच दिसतात. परमार्थात एक मोठी मजा आहे. ज्याला खरोखर त्या अनुग्रहाचा उपयोग झालेला आहे तो आणि ज्याच्यावर काहीच परिणाम झालेला नाही तो, असे दोघेही दिसायला एकदम सारखे दिसतात, असायला मात्र फार वेगळे असतात. तुकाराम महाराज म्हणतात –
एक तटस्थ मानसीं| एक सहजचि आळसी|
दोन्ही दिसती सारखीं| वर्म जाणे तो पारखी॥ तु. गा. १६७
‘एक तटस्थ मानसी’- एकाची अन्तःकरणवृत्ती आत्माकार झालेली आहे म्हणून तो आतमध्ये स्तब्ध, शांत झालेला आहे. ‘एक सहजचि आळशी’ – एक नुसता आळसाने सुस्तावलेला आहे म्हणून शांत आहे. ‘दोन्ही दिसती सारखी’ बाहेरच्या लोकांना दिसायला दोन्हींचा बहिरंगच दिसतो. हा ही शांत आहे आणि तो ही शांत आहे. ‘दोन्ही दिसती सारखी| वर्म जाणे तो पारखी॥ ह्या दोन्हीतले अंतर जो जाणतो, ह्या दोन्हीतला फरक ज्याच्या लक्षात येतो, तो चांगला पारखी असतो. गाजरपारखी असून चालत नाही. आता एवढं लक्षात आलं म्हणजे आपल्याला अनुग्रह म्हणजे काय ते कळेल. ह्याला शक्तीचं संक्रमण असं म्हणतात आणि हे संक्रमण मागून पुढे चालत आलेलं असतं, पूर्वापार चालत आलेलं असतं. या परंपरेलाच ‘संप्रदाय’ असं म्हणतात. या संप्रदायातून जे मागून पुढे चालत आलेलं आहे ते जसंच्या तसं, त्या संप्रदायाच्या पद्धतीनुसार, त्या संप्रदायाच्या सरणीनुसार पुढच्याला संक्रमित केलं जातं आणि हे जे संक्रमित करणं त्याला अनुग्रह म्हणतात.
आता शक्तीचं संक्रमण करण्याचा जो काळ असतो – अर्धा मिनिट, एक मिनिट जो काय असेल तो, त्याचा लाभ काय आहे? त्याने प्रत्यक्ष काय घडतं? तर एक गोष्ट घडते. शास्त्रात असंभावना नावाचा दोष सांगितलेला आहे. साधकाच्या ठिकाणचा तो असंभावना दोष नाहीसा होऊन जातो. असंभावना म्हणजे काय? ‘आत्मा नावाची एक वस्तू आहे’ असं आपण श्रद्धेने मानतो. पण काहींचं म्हणणं असतं की आत्मा नावाची वस्तूच नाही आणि असलीच तर तो आत्मा मी असणं शक्य नाही. ह्याला ‘असंभावना’ असं म्हणतात. हा शब्द आपल्याला जरा नवीन वाटेल. जरा किचकट वाटेल, तरी सुद्धा असे शब्द थोडेसे रोजच्या बोली भाषेमध्ये बदलून घेतले तर ते फार सोपे होऊन जातात. ‘संभवत नाही’ अशी नित्याची बोलण्याची भाषा आहे. जे संभवत नाही, ते असंभव. त्यावरून शब्द झाला असंभावना. असंभावना दोष ह्याचा अर्थ आत्मा नावाचं तत्त्व असणं शक्य नाही आणि असलं तरी ते मी असणं शक्य नाही. असं वाटणं त्यालाच ‘असंभावना दोष ’ म्हणतात. अनुग्रहाने जो अनुभव येतो, त्या अनुभवकाळी शिष्य जर तयारीचा असेल आणि गुरू जर खरंच अनुग्रह देण्याच्या योग्यतेचा असेल (या दोन्ही गोष्टींचं फार महत्त्व आहे) तर त्या अनुग्रह घेणार्या शिष्याला त्यावेळेला अर्धा मिनिट-एक मिनिट काही एक विलक्षण आनंद मिळतो. विलक्षण अनुभव येतो. तो विलक्षण अनुभव आणि विलक्षण आनंद यामुळे त्याची खात्री पटते की आपण जे समजतो की आत्मा नावाचं तत्त्व नाहीच, ते आपल्या समजुतीच्या पलिकडचं काहीतरी आहे, आपल्याला आत्मा कळत नाही, हा आपला समज चुकीचा आहे. आपण जे समजू शकतो, जाणू शकतो, त्या समजुतीच्या पलीकडे, त्या जाणण्याच्या आणखी पलीकडे काहीतरी आहे. जे मला समजत नाही असं काहीतरी असू शकतं. आतापर्यंत मी जे जाणून घेतलं, जे ज्ञान आतापर्यंत संपादन केलं, त्या ज्ञानाच्या पलीकडे असं काहीतरी निश्चित आहे. एवढं त्याच्या लक्षात आणून देण्याचं काम त्या अनुग्रहाने होऊन जातं. एकदा त्याच्या लक्षात आलं की अशी स्थिती असू शकते, अशी अवस्था असू शकते, असा आनंद असू शकतो की नंतर त्याच्या अन्तःकरणात फार मोठी श्रद्धा निर्माण होते. या प्रक्रियेत श्रद्धेची दोन ठिकाणे आहेत – १. ज्याने अनुग्रह दिला त्याच्यावर श्रद्धा आणि २. ज्याच्यासाठी अनुग्रह दिला, ते जे तत्त्व आहे, त्या तत्त्वावरची श्रद्धा. विशेष महत्त्वाची श्रद्धा कोणती असेल तर ती त्या तत्त्वावरची श्रद्धा होय. ज्यांनी त्या तत्त्वाचा क्षणभर अनुभव आणून दिला, त्यांच्यावरच्या श्रद्धेपेक्षा, ज्याचा अनुभव आणून दिला, त्या तत्त्वावरची श्रद्धा अत्यंत मोलाची आहे कारण ती आयुष्यभर साथ देणारी आहे. सच्चिदानंदरूप आत्मा एक तत्त्व आहे. ते आपल्या आवाक्याबाहेर आहे, आपल्या समजुतीच्या पलीकडचं आहे, आपण ज्याची आजपर्यंत कल्पनाही करू शकलो नाही किंवा करू शकणार नाही असं आपल्याला वाटलं होतं, असं काहीतरी एक तत्त्व निश्चिशत आहे. ही पहिली श्रद्धा तयार होते आणि हे तत्त्व अनुभवाला आणून दिल्यानंतर सहजच ज्याने अनुभव आणून दिला, त्याच्या ठिकाणी श्रद्धा जडते. ही दुसरी श्रद्धा. ह्या दोन श्रद्धात मला तरतम विचारलं तर त्या तत्त्वाविषयीची श्रद्धा ही, ज्यांनी अनुभव दिला त्यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे असं मी सांगेन. कारण अनुभव देणारा राहील अगर न राहील, तो देहाने असेल अगर नसेलही पण आत्मा अखंडत्वाने सद्रूप आहे. तो नाही असं होऊच शकत नाही. मग यात जास्त उपयोगी पडणारी श्रद्धा कोणती आहे? खरंच तो जो अनुभव दिला गेला होता, तो अनुभव आपल्याला शेवटपर्यंत साथ देणारा आहे. त्या अनुभवाचं बोट धरून, तो अनुभव कसा वाढेल, त्या अनुभवाला परिपक्वता कशी येईल, त्या अनुभवाला सातत्य कसं येईल, हा जो प्रयत्न आहे, हा जो अभ्यास आहे, त्याला खर्याी अर्थाने साधना असं म्हणतात. म्हणून अनुग्रहातून स्वतःच्या जबाबदारीची जागृती ही एक गोष्ट निर्माण झाली पाहिजे. क्षणिक का होईना, ज्या अवस्थेचा अनुभव आलेला आहे त्या अवस्थेचा कालावधी लांबवता येईल, वाढवता येईल, तिचा दर्जा उंचावता येईल अशा तर्हे चं सातत्याने साधन करणं, ही ज्याने अनुग्रह घेतलेला आहे, त्याची जबाबदारी असते. अनुग्रहाद्वारे शक्ती संक्रमित करणं आणि शक्तिसंक्रमणाद्वारे ज्या वस्तूची आपण कल्पना करू शकत नाही, तिचा क्षणभर का होईना, अनुभव आणून देणं हा एवढाच अनुग्रहाचा भाग सर्वात जास्त महत्त्वाचा आहे असं आपण समजतो. एका अर्थाने ते खरं आहे. खरं या अर्थाने की त्याचा अनुभव आला की आपण मग त्याची कास सोडत नाही. त्याचा पाठलाग सोडत नाही. पण मी जे आताच म्हणालो की त्या अनुभवाची उंची कशी वाढवता येईल, त्या अनुभवाचं सातत्य ज्याला म्हणतात, ते कसं वाढवता येईल, ह्यासाठी आणखी काही गोष्टी सांगाव्या लागतात आणि त्याला म्हणतात एखाद्या प्रक्रियेतून निर्माण झालेलं साधन. एखादी प्रक्रिया सांगायची, त्या प्रक्रियेतून साधन सांगायचं, हा एक भाग. दुसरा भाग आहे नामसाधना आणि तिसरा भाग आहे तत्त्वज्ञान. ध्यान, नाम आणि ज्ञान या तिन्ही मिळून अनुग्रह नावाची गोष्ट पूर्ण होते. हे सर्व एकमेकांना अतिशय पूरक आहेत. ह्या तिन्ही गोष्टी मिळून अनुग्रह नावाची गोष्ट सिद्ध होते. या सर्व गोष्टी एकमेकींना कशा काय पूरक आहेत त्याचा थोडा विचार करू या.
श्रीगुरू एक नाम सांगतात. उदा. ‘श्रीराम जयराम जयजयराम|’ आता नाम सांगितल्यानंतर रामाचं स्वरूप काय आहे हे जर मला समजून घ्यायचं असेल, तर मला तत्त्वज्ञानाची कास धरल्याशिवाय, तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही. रामाचं खरं स्वरूप समजल्याशिवाय ‘श्रीराम जयराम जयजयराम’ हा नामसाधनेला एक उंची मी देऊ शकणार नाही. ती उंची दिल्याशिवाय नामसाधनेचं रूपांतर ध्यानामध्ये होणार नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. नामसाधनेला ध्यानाचा दर्जा आला पाहिजे. नामसाधना ध्यानाच्या उंचीवर गेली पाहिजे. अनेकवेळा असं होतं की खाता-पिता, उठता-बसता नाम घ्या असं सांगितलं जातं. दासबोधातही सांगितलं आहे की नाम केव्हाही घ्यावं. आपत्तीकाळी घ्यावं, विपत्तीकाळी घ्यावं, सुखी असतांना घ्यावं, दुःखी असतांना घ्यावं, पराभवात असतांना घ्यावं, जयामध्ये घ्यावं वगैरे. अशी भली मोठी यादी समर्थांनी लिहून ठेवली आहे हे फार चांगलं आहे. त्याची आवश्यकता आहे पण तेवढ्याने भागतं हा विचार मात्र बरोबर नाही. आपलं साधन एका मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. त्या नामसाधनेला ध्यानाचा दर्जा यायला पाहिजे. ध्यानाचा दर्जा द्यायचा असेल तर ‘राम’ काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. रामाचा व माझा संबंध काय आहे हेही समजून घेतलं पाहिजे. करुणाष्टकांमध्ये एक फार छान विचार समर्थांनी मांडलेला आहे. समर्थ करुणाष्टकात रामाला म्हणतात, ‘तुझिया वियोगे जीवित्व आले’ करुणाष्टकं रोज म्हटली, बारा बारा वर्ष नियमाने म्हटली पण ‘तुझिया वियोगे जीवित्व आले’ हे समर्थांचं म्हणणं जर मला समजलं नाही तर मला करुणाष्टकाचा उपयोग कितीसा झाला हा एक प्रश्नए आहे. म्हणून आपण जे काही करतो, जे बोलतो, जे आपण वाचतो, त्याच्यामागे विचार काय आहे, त्याच्यामागे तत्त्वज्ञान काय आहे, विचाराची बैठक कोणती आहे ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायची अत्यंत आवश्यकता असते. त्यासाठी कोणाची तरी कास धरावी लागते. कोणाचा तरी हात धरून चालावं लागतं. हे हात धरून चालणं आणि त्याने हाताशी धरून चालवणं ह्याला अनुग्र्रह म्हणतात. अनुग्रहाचं हे स्वरूप लक्षात घेतलं तर ज्याला एक विशिष्ट उंची गाठायची आहे तो अनुग्रहाचा टप्पा टाळून पुढे जाऊच शकत नाही.
आपण असा विचार करत होतो की नाम, ध्यान आणि ज्ञान या तीन गोष्टी एकमेकींना अतिशय पूरक आहेत. नामसाधनेला तत्त्वज्ञान पूरक आहे. ‘तुझिया वियोगे जीवित्व आले’ असं समर्थ रामाला म्हणतात. रामाच्या वियोगाने मला जीवदशा प्राप्त झाली असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा कोणत्या रामाचा वियोग अभिप्रेत असतो? दाशरथी रामाच्या वियोगाने जीवित्व प्राप्त झाले का? रामासंबंधी समर्थ जेव्हा जेव्हा बोलतात, तेव्हा प्रत्येक ठिकाणी त्यांना रामाचं कोणतं स्वरूप अभिप्रेत असतं ते समजणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. समर्थांची एक गाथा आहे. त्या गाथेमध्ये सुंदर विचार आहे- ‘एक राम आहे खरा| तिकडे गुरुपरंपरा|’ ‘एक राम आहे खरा’ ह्याचा अर्थ काय होतो? ज्याअर्थी एक राम खरा आहे त्याअर्थी दुसरा राम कसा असेल? पण असं म्हणायची सुद्धा पंचाईत. पण आता समर्थांच्याच गाथेमध्ये हा अभंग आहे म्हणून बोललं पाहिजे. एक जो राम खरा आहे, त्या खर्या रामाकडे माझी गुरुपरंपरा आहे. तो खरा राम माझा श्रीगुरू आहे. आता ज्याअर्थी खरा राम आहे त्या अर्थी खर्याीचा प्रतिद्वंद्वी असलाच पाहिजे. यापैकी कोणाच्या वियोगाने जीवित्व आले असा प्रश्न निर्माण झाला. त्याचं उत्तर आहे- ‘मी वास्तविक आत्मरूप असतांना आत्म्याचा वियोग जेव्हा मला झाला, तेव्हा मी स्वतःला जीव आहे असं समजायला लागतो. ह्याचाच अर्थ असा की त्या आत्मारामाचा मला वियोग झाला. म्हणजे ‘मी आत्माराम आहे’ हे माझ्या लक्षात राहिलं नाही, हे भान मला राहिलं नाही. ‘मी आत्मा आहे, मी आत्माराम आहे’ हे जे ज्ञान असायला पाहिजे ते ज्ञान मला झालं नाही. त्यामुळे ‘मी जीव आहे’ हे अज्ञान मी पकडून बसलो. ह्या अज्ञानातून बाजूला होण्यासाठी समर्थ आर्ततेने म्हणतात -‘तुजवीण रामा मज कंठवेना’
हा जो राम आहे तो राम कोणता? कारण बरेच राम झाले. दोन चार राम एकदम आपल्यासमोर आल्यानंतर तत्त्वज्ञानाची कास धरल्याशिवाय कोणत्या रामाची कोणत्या ठिकाणी काय पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे ते आपल्याला समजणार नाही. कोदंडधारी राम हा सगुण साकार राम आहे. समर्थांनी ‘प्रभाते मनीं राम चिंतीत जावा’ या शब्दात कोदंडधारी रामाचं, सगुण-साकार रामाचं चिंतन सांगितलं. रामाच्या आज्ञेत वागावं असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा ईश्वररूप राम अपेक्षित आहे. जेव्हा आपण रामरूप होण्याची इच्छा करतो तेव्हा तो राम ब्रह्मरूप राम आहे. ज्याच्या आधाराने, ज्याच्या मदतीने आपल्याला रामरूप होता येणार आहे, तो गुरुरूप राम आहे. कोदंडधारी राम, ईश्वररूप राम, श्रीगुरुरूप राम आणि आत्माराम असे चार राम झाले. हे चारही राम जर कळायचे असतील तर वेदान्तशास्त्राची किंवा तत्त्वज्ञानाची कास धरावीच लागेल. चारही रामांचं स्वरूप कळल्याशिवाय समर्थ काय सांगतात त्याचं वर्म कळणार नाही. ते वर्म कळल्याशिवाय अनुग्रहाचा अर्थही कळणार नाही.
अशा पद्धतीने नाम, ध्यान आणि ज्ञान यांची संगती आहे. ही संगती नेमकी लक्षात येण्यासाठी तत्त्वज्ञानाशिवाय भागत नाही. म्हणून अनुग्रह देणारा शब्दज्ञानात पारंगत असला पाहिजे. त्याला तत्त्वज्ञान नेमक्या आणि संुंदर शब्दात समोर मांडता आलं पाहिजे. ज्याचा जसा अधिकार असेल त्या अधिकारानुसार त्याला ते समजावून देता आलं पाहिजे. आमच्याकडे पुष्कळ वारकरी येतात. त्यांचा अतिशय सामान्य हेतू असतो. एखादा माणूस दारू पीत असतो. मग गल्लीतले लोक त्याला पकडून आणतात. त्याला म्हणतात, ‘चल रे, तुला माळ घालू या’ त्याला माळ घालण्याचा उद्देश एकच असतो की त्याने दारू सोडावी. एवढ्या सामान्य कारणासाठी तो अनुग्रह घेतो. आता बघा, अनुग्रह कुठल्या पातळीवर आला? गल्लीतले लोक त्याला पकडून आणतात आणि आणल्यानंतर ‘दहा वर्ष झाली हा दारू पितोय. ते पिण्याचं सोडविण्यासाठी ह्याच्या गळ्यात माळ घाला’ म्हणतात. मग माळ घालावी की नाही? कारण त्याला ब्रह्म नावाचा शब्दही माहीत नाही. त्याला काही ठाऊक नाही. तरी पण या प्रश्नाचं उत्तर ‘होय, घालावी’ असं आहे. खरंच अनुग्रह घेतल्यावर जर त्याची दारू सुटली तर ते चांगलंच आहे. पण ती खरंच सुटली तर हं! पण दिसतं असं की काही लोक पुन्हा प्यायला सुरुवात करतात. काय माळबीळ घातलेली असते ती खुंटीला टांगून ठेऊन देतात. जेव्हा पुन्हा लहर येईल तेव्हा पुन्हा घालू म्हणतात किंवा लोकांनी पुन्हा असंच उचललं, तर पुन्हा घालू या म्हणतात. अनुग्रहाची ही एक पातळी आहे. अत्यंत खालच्या पातळीवरचा हा अनुग्रह आहे. अशाला अनुग्रह द्यावा की नाही? याचं उत्तर ‘होय’ असं आहे कारण येथे पुन्हा प्रश्न आहे तो कर्तव्याचा. हा प्रश्न अनुग्रह देणार्याेच्या प्रतिष्ठेचा नाही. मी मुद्दाम असं सांगतो याचं कारण आहे. ‘असल्या माणसाला आम्ही अनुग्रह देत नसतो’ असं म्हटलं तर पंचाईत होते. दया नावाची गोष्ट अनुग्रह देणारापाशी नाही असा याचा अर्थ होतो. दया जर नसेल तर एक गुणच कमी झाला. एक गुण जरी कमी असला तरी तेथे अनुग्रह देण्याची योग्यताच नसते. हा अगदी सरळ दोन आणि दोन बरोबर चार असा खडे मांडल्यासारखा स्पष्ट विचार आहे.
अनुग्रहाची दुसरी पातळी या आधी सांगितली. एखाद्याने बारा-बारा वर्षे फार सुंदर साधन केलं आहे. तो साधनचतुष्टयसंपन्न आहे, अत्यंत सदाचारी आहे. त्याच्या पद्धतीने त्याने नामसाधना केलेली आहे. त्याच्या समजुतीप्रमाणे काही प्रमाणात ध्यानसाधना केलेली आहे, काही तत्त्वज्ञान चिंतनही केलेलं आहे. हे खरं असतं, पण त्याच्या साधनेत एक जागा अशी येते की हे सारं केलं खरं पण समाधान ज्याला म्हणतात, ते काही अजून त्याला मिळालेलं नसतं. ही एक उंची आहे की ज्या उंचीवर अनुग्रह दिला जातो आणि दुसरी आधी सांगितलेली एक खालची उंची आहे. त्याही उंचीवर अनुग्रह दिला जातो. दोन्ही अनुग्रहात देणार्यााच्या दृष्टीने हेतू समान आहे. घेणार्याुच्या दृष्टीत मात्र फार मोठा फरक आहे. ही अनुग्रहाच्या संदर्भात एक तत्त्वज्ञानाची बाजू आहे.
अनुग्रहाच्या संदर्भात दुसरी बाजू नामसाधनेची आहे. ज्याचं नाम मी घेतो, त्या रामाचं स्वरूप लक्षात येण्यासाठी तत्त्वज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे. त्या रामाचा आणि माझा काय संबंध आहे, त्याचं माझं काय नातं आहे हे लक्षात येण्यासाठी सुद्धा तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. हे तत्त्वज्ञान जर एकदा आतमध्ये रुजलं, पचलं, की त्यानंतर घेतलेलं रामाचं नाम आणि तत्त्वज्ञान न समजता घेतलेलं रामाचं नाम या दोन्हीमध्ये जमीनअस्मानाची तफावत पडते. या बाबतीत एक दृष्टांत पाहू या. माझी बसण्याची एक छान खुर्ची आहे. मी हॉस्पिटलमध्ये त्या खुर्चीत बसतो. अतिशय सुंदर खुर्ची आहे. फिरती आहे, मऊ आहे. एकदा मी हॉस्पिटलमध्ये त्या खुर्चीत बसलो होतो. माझ्यासमोर एक चार वर्षांचा मुलगा बसला होता. मी काहीतरी कामानिमित्त त्या खुर्चीवरून उठलो व वॉर्डमध्ये पेशंट तपासायला गेलो. मी आल्यावर बघतो तर तो मुलगा माझ्या खुर्चीत बसलेला होता. चार वर्षांचा मुलगा. त्यानं कानात स्टेथॉस्कोप अडकवला होता. आईला जवळ बोलावलं होतं. तिच्या छातीला, पाठीला, डोक्याला, सगळीकडे तो लावून गंभीरपणे तपासत होता. जसं मी करत होतो, तसंच्या तसं तो करत होता. आता दोघांच्या करण्यामध्ये अंतर किती? खुर्ची तीच आहे, स्टेथॉस्कोप तोच आहे. तो छातीला लावणं, पाठीला लावणं, सगळीकडे लावणं जसंच्या तसंच आहे. पण आतमध्ये काहीही नाही. कोरं करकरीत आहे. स्टेथॉस्कोप म्हणजे काय माहीत नाही. त्याचे आवाज कसले येतात ते माहीत नाही. दुखण्याचं निदान होणार नाही आणि पेशंट बरा होण्याची शक्यता नाही. आता बाहेरून दिसायला मात्र सगळं अगदी तेच आहे. लहान मुलगा म्हणून हा कौतुकाचा विषय आहे ह्यात शंका नाही. सर्व काही अगदी तसंच आहे पण उपयोग कशाचाच नाही. कारण आत ज्ञान नाही. आपण परमार्थाच्या नावाने ज्या काही कृती करतो, त्या जर अशा वरवरच्या असतील तर तो काहीसा कौतुकाचा विषय होऊ शकेल पण चार वर्षांच्या मुलाचं कौतुक करणं ठीक. ते वरवरचं अनुकरण आहे हे सगळ्यांना ठाऊक असतं ज्ञानाची तिथे अपेक्षाच नसते. पण मोठ्यांच्या बाबतीत तसं चालत नाही. म्हणून परमार्थात जी कृती आपण करतो, त्या कृतीला विचाराची, तत्त्वज्ञानाची बैठक असण्याची आवश्यकता आहे. ही बैठक अनिवार्य आहे. त्यामध्ये सुटकेला अवकाश नाही. प्रत्यक्ष भगवंताचं म्हणणं आहे की जे मला शरण येतात, त्यांना मी बुद्धियोग देतो आणि बुद्धियोग दिल्यानंतर ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात.
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्|
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते॥ भ. गी. १०-१०
ह्याचा अर्थ असा आहे की आपण जर भगवंताची भक्ती शास्त्रशुद्ध पद्धतीने, निष्ठेने, भावाने आणि प्रेमाने करत राहिलो तर त्याचा परिणाम असा होतो की आपल्याला बुद्धियोग मिळण्याची व्यवस्था होऊन जाते. भगवंत बुद्धियोग देतो म्हणजे काही जादू करत नाही. एक नीट लक्षात ठेवायचं की अनुग्रहामध्ये जादू नाही. उलट जोपर्यंत त्यात जादू आहे, काही विशेष आहे, काही वेगळं आहे असं वाटतं तोपर्यंत त्या अनुग्रहाचा पुढे जो काही पाठपुरावा करायला पाहिजे, तो पाठपुरावा आपण करणार नाही. जादूच मला पुढे नेईल असं वाटणं स्वाभाविक आहे. श्रीगुरूंनी क्षणमात्र जो अनुभव दिला त्या अनुभवाचं सामर्थ्य मला पुढे घेऊन जाईल. पुढे जाण्यासाठी माझ्यावर काहीच जबाबदारी नाही अशी एक भावना होण्याची शक्यता असते. ती होऊ नये म्हणून अनुग्रहासंबंधी जेवढ्या विपरीत कल्पना असतील तेवढ्या सगळ्या काढून टाकण्याची आवश्यकता आहे.
अनुग्रहाचे तीन भाग आपल्यासमोर आहेत १. क्षणमात्र का होईना पण प्रत्यक्ष अनुभव देणं. २. एखादं नाम सांगणं ३. नामामागचं तत्त्वज्ञान सांगणं. नामसाधना सांगणं, तत्त्वज्ञान सांगणं आणि एखाद्या प्रक्रियेतून ध्यान कसं करावं ते सांगणं. ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असतात. ध्यानाला तत्त्वज्ञान अतिशय पूरक आहे. तत्त्वज्ञानाशिवाय ध्यान कसं करावं, ध्यानामध्ये कोणत्या प्रक्रिया कराव्यात हे कळणार नाही. श्रीगुरूंनी प्रक्रिया सांगितल्या तरी सुद्धा तत्त्वज्ञानाशिवाय त्या प्रक्रियेचा सगळा आवाका आपल्या लक्षात येणार नाही. ध्यानाची एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेतून ध्यानापर्यंत आपण अलगद पोहोचणं फार महत्त्वाचं असतं. बैठक मारली, विशिष्ट पद्धतीने हात ठेवले आणि ध्यान सुरू झालं असं कसं होईल? असं अजिबात शक्य नाही. जसं प्रेमाच्या बाबतीत असतं तसंच हे. ‘आजपासून तुमचं आमचं प्रेम सुरू’ असं होईल का? असं कधीच होण्याची शक्यता नाही. प्रेमाच्या बाबतीत व्यक्ती अगदी अलगद तिथपर्यंत जाऊन पोहोचते – सहवासातून एकमेकांचे स्वभाव जुळल्यामुळे. त्या अलगदपणामध्येही एक जादू असते. निरपेक्ष, निर्विषय आणि विशुद्ध प्रेमाचं तुकाराममहाराजांनी फार छान वर्णन केलं आहे. ते म्हणतात- ‘प्रेम न ये सांगतां बोलतां दावितां| अनुभव चित्तां चित्त जाणे॥ (तु.गा. २७१४)
हा अतिशय सुंदर विचार आहे. ‘प्रेम न ये बोलतां’ – ‘माझं प्रेम आहे’ असं बोलण्याची आवश्यकता नाही. ‘न ये दावतां’ – ते दाखवावं लागत असेल तर ते खरं प्रेम नसण्याची शक्यता जास्त. ‘प्रेम न ये बोलतां, दावतां, सांगतां| अनुभव चित्तां चित्त जाणे’ असंच ध्यानाच्या बाबतील घडतं. धारणा मुद्दाम करावी लागते, ती ठरवून करावी लागते. धारणा परिपक्व झाली, सहज झाली की तिलाच ध्यानाचं स्वरूप येतं. ध्यानाला परिपक्वता व सहजता आली की समाधी सिद्ध होते. समाधीमध्ये तत्त्वाशी अनुसंधान साधायचं असतं. त्या तत्त्वाशी एकरूप व्हायचं असतं. एकरूप होतांना धसमुसळेपणा चालत नाही. ध्यानाच्या अवस्थेत अतिशय अलगद जाऊन बसावं लागतं. तसं अलगद जाऊन बसता यावं यासाठी पुन्हा तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. नामानं एक होतं की सबंध दिवस आपण जेव्हा नामाचा उच्चार करतो तेव्हा चित्तवृत्ती पांगण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. ध्यानसाधना सुरू करण्यापूर्वीपर्यंत दिवसभरात तेवीस तास माझं जीवन जसं चालत आलं आहे तसंच जर आताही चालत राहील तर ध्यानाचा उरलेला चोवीसावाही तास काही वेगळ्या पद्धतीने अचानक जमून जाईल ही गोष्ट कदापिही होणारी नाही. सगळा प्रपंच तसाच चालू ठेवावा आणि बैठकीचा एक तास मात्र एकदम काही वेगळ्या पद्धतीने जावा, एकदम वेगळीच मनःस्थिती यावी, एकदम वेगळ्या पद्धतीने जादूसारखी मनोरचना बदलून जावी, ही गोष्ट होण्याची शक्यता नाही. सबंध दिवसाच्या आपल्या ज्या मनोरचना आहेत, त्या सतत समाहित पाहिजेत. पांगलेल्या नकोत. त्या न पांगण्यासाठी नामसाधनेचा उपयोग होतो. जेव्हा जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा तेव्हा मनाला नामसाधनेची सवय असेल तर अन्तःकरणवृत्ती समाहित राहते. ती समाहित असली तर ध्यानकाळी तिला फार आवरून घ्यावं लागत नाही. ध्यानकाळी अन्तःकरणवृत्ती ओढून घ्यायची असते. समाहित वृत्ती असेल तर ती आत ओढून घ्यायला फार श्रम पडत नाहीत. नामसाधनेचा आपल्याला ह्या दृष्टीने उपयोग आहे. म्हणून या तीनही स्तरांच्या साधनाचा अनुग्रहामध्ये समावेश असतो.
अनुग्रहामध्ये ध्यानाच्या प्रक्रियेचा समावेश असतो, नामाचा समावेश असतो आणि तत्त्वज्ञानाचा समावेश असतो. असे तीनही मिळून अनुग्रह होतो. ह्या तिन्ही मिळून जे अपेक्षित आहे, त्याला ‘आत्मज्ञान’ म्हणतात.
‘जेचि क्षणीं अनुग्रह केला| तेचि क्षणीं मोक्ष जाला| बंधन काही आत्मयाला बोलोंचि नये|’ ह्या ओवीच्या शेवटी म्हटले आहे की ‘बंधन काही आत्मयाला बोलोचि नये’. हा आत्मा बंधनात आहे असं आपल्याला जे वाटतं, असा जो आपल्याला भ्रम आहे, त्या भ्रमातून मुक्त होण्यासाठी, तो भ्रम नाहीसा होण्यासाठी ह्या तीन प्रकारच्या साधनांचा आपल्याला उपयोग होत असतो. ज्ञानदेवांची एक फार सुंदर ओवी आहे-
‘जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें| गुरुवाक्यें मन धुतलें|
मग आत्मस्वरूपीं घातलें| रोऊनियां॥ ज्ञाने. ५-३४
ह्यामध्ये ‘गुरुवाक्य’ असा शब्द आलेला आहे. ह्या गुरुवाक्याचा तत्त्वज्ञानाशी व ध्यानाशी संबंध आहे. गुरुवाक्य म्हणजे गुरूंच्या मुखातून आलेलं वाक्य आणि हे जे विशिष्ट वाक्य आहे त्याला ‘महावाक्य’ म्हणतात. गुरूंच्या मुखातून आलेलं वाक्य ते महावाक्य असलंच पाहिजे. अन्य कुठल्याही वाक्याला ‘गुरुवाक्य’ ही संज्ञा नाही किंवा गुरुवाक्याचा दर्जा नाही. श्रीगुरू पुष्कळ बोलतील, अनेक गोष्टी समजावून सांगतील, अनेक बारकावे समजावून सांगतील, तपशील समजावून सांगतील. ह्या सगळ्या गोष्टी होतील पण ज्याला गुरुवाक्य म्हणतात, त्या गुरुवाक्यामध्ये महावाक्याचा समावेश असलाच पाहिजे. ‘ते तू आहेस’ हे ते महावाक्य आहे. चार उपनिषदांमध्ये चार महावाक्ये आहेत. फक्त महावाक्य म्हणजे गुरुवाक्य एवढं जर लक्षात घेतलं तर गुरुवाक्य शब्दाचा नेमका व नेटका अर्थ आपल्यासमोर उभा राहतो. मी अनेक वेळा हा विचार मांडत असतो की परमार्थामध्ये जास्तीत जास्त आवश्यकता कशाची असेल तर ती नेमकेपणाची व नेटकेपणाची, विचारांच्या स्पष्टतेची. विचारांची स्पष्टता नसेल, तर आधीच परमार्थामध्ये गोंधळ पुष्कळ आहेत, त्यात भर पडेल. गोंधळ आपणच घातलेले असतात. त्यासाठी बाहेरच्या दुसर्याळ माणसांची काही गरज नाही. पारमार्थिक म्हणवणार्याल माणसांनीच पारमार्थिक क्षेत्रात भरपूर गोंधळ घातलेले आहेत. ह्या गोंधळातून बाजूला होण्याचा एकच उपाय आहे. विचारांची स्पष्टता, नेमकेपणा आणि नेटकेपणा ठेवणं. महावाक्य महत्त्वाचं आहे. ‘ते तू आहेस’ हे वाक्य श्रीगुरुमुखातून आलं की त्याला गुरुवाक्याचा दर्जा प्राप्त होतो. आपल्याला उपनिषदात महावाक्य वाचायला मिळतं, अनेकांकडून ऐकायला मिळतं पण वाचणं किंवा अनेकांच्या मुखातून ते ऐकणं आणि गुरुमुखातून ऐकणं ह्यामध्ये निश्चित खूप अंतर आहे. ते अंतर परिणामांच्या दृष्टीने आहे. गुरुमुखातून आलेलं महावाक्य परिणामाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं, मोलाचं आहे. व्यवहारातला एक अनुभव पहा. एक डॉक्टर रुग्णाला सांगतो की तू सिगरेट ओढू नकोस. पण डॉक्टरच्या स्वतःच्याच तोंडात सिगरेट असते! आता सिगरेट ओढू नको असं सांगितलं खरं डॉक्टरनी. पेशंट आरोग्याच्या दृष्टीने ते मान्यही करील. पण त्याच्या मनात मात्र विचार आल्याशिवाय राहणार नाही की ‘ज्याच्या तोंडामध्ये सिगरेट आहे तोच मला सांगतोय की तू सिगरेट ओढू नकोस. हे काही ठीक नाही’ याचा अर्थ असा की ‘सिगरेट ओढू नकोस’ असं सांगतांना तरी डॉक्टरच्या तोंडात सिगरेट नसली पाहिजे. निदान एवढं तरी पथ्य पाळण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ते वाक्य परिणामकारक होणार नाही. सांगणारा स्वतःच जर तसा वागत नसेल, त्याचे विचार तसे नसतील तर त्याच्या शब्दांचा परिणाम फार कमी होतो. म्हणून ज्याने अनुभव घेतलेला आहे, जो अनुभवसंपन्न आहे त्याच्या मुखातून ऐकलेला शब्द आणि जो अनुभवसंपन्न नाही, त्याचप्रमाणे ज्याचं स्वतःचं आचरण त्या उपदेशानुसार नाही, त्याच्या मुखातून आलेला शब्द ह्यामध्ये जमीनअस्मानाची तफावत असते. ही तफावत आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे गुरुवाक्य म्हणजे नेमकं काय आणि वाक्य गुरुमुखातूनच का आलं पाहिजे हे आमचं आम्हाला समजत नाही. याचं कारण एकच आहे की; अशी जी महावाक्य असतात ती पुस्तकात वाचूनही अनुभव येऊन जाईल, अनेक प्रवचने ऐकून त्यांची एखादी गोधडी तयार केली म्हणजे काम होऊन जाईल असं आपल्याला वाटत असतं. शे-दोनशे प्रवचनं ऐकली की ठिगळांची एक छान गोधडी तयार होते आणि ती गोधडी तयार झाल्यावर असं वाटतं की आता आपल्याला चांगलं आकलन झालेलं आहे. आपल्याला विषय चांगला समजलेला आहे. समजलेला असतो पण तो एका हद्दीपर्यंतच समजलेला असतो. समजलेला नसतो असं कोणीच म्हणणार नाही. पण त्या समजलेल्या विचारांचं रूपांतर साधनेमध्ये करून प्रत्यक्ष अनुभवापर्यंत पोहोचण्याची जी किमया आहे, जी क्षमता आहे, ती मात्र या शे-दोनशे प्रवचनांच्या गोधडीमध्ये कधीच असत नाही. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत गुरुवाक्य म्हणजे काय, गुरुवाक्याचं महत्त्व काय, हे लक्षात येणं फार कठीण आहे. म्हणून ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, ‘जेणें भ्रांतीपासून हिरतलें| गुरुवाक्यें मन धुतलें| मग आत्मस्वरूपीं घातले| रोऊनियां॥
आपण अनुग्रहाचा विचार करतो आहोत. अनुग्रहामध्ये गुरुवाक्याचा समावेश आहे. श्रीगुरूंनी जिथे महावाक्य सांगितलं नाही, तिथे अनुग्रह दिलेलाच नाही. ज्या क्षणी अनुग्रह मिळतो त्याक्षणी श्रीगुरुमुखातून महावाक्य आलेलं असलं पाहिजे ही एकच अट आहे. आणि ते महावाक्य आहे ‘तत्त्वमसि|’ ‘ते तू आहेस’. ह्या महावाक्याचा आशय फार मोठा आहे. आशय समजून घेतल्याशिवाय त्या महावाक्याचं स्वरूप आपल्याला समजणं कठीण आहे. महावाक्य समजावून सांगणारे अनेक ग्रंथ आहेत. ‘पंचदशी’ या ग्रंथात ‘महावाक्यविवेक’ नावाचे एक स्वतंत्र प्रकरण आहे. आद्य शंकराचार्यांच्या ‘उपदेशसाहस्री’ नावाच्या ग्रंथातही ‘तत्त्वमसि’चा फार सुंदर आणि सविस्तर विचार केलेला सापडेल. या विचारांची बैठक जर तयार असेल, तर गुरुवाक्य म्हणजे काय, त्याचं महात्म्य काय ते नेमकं आपल्याला कळेल आणि त्याच्या अनुरोधाने जे साध्य आहे तेही स्पष्ट होईल. आत्मा बंधनात सापडलेला आहे असं आपल्याला वाटतं, पण हे वाटणंच मिथ्या असल्याचं कळेल.
समर्थांच्या ओवीच्या शेवटच्या चरणाचे थोडे विवेचन करू. ‘बंधन काही आत्मयाला| बोलोचि नये॥ आत्मा नावाची वस्तू कायमची स्वतंत्र आहे, मुक्त आहे. आत्मा बंधनात कधीच नव्हता आणि नाही. पण अविद्येमुळे, अज्ञानामुळे, मायेच्या प्रभावामुळे आपण आत्म्याला नसलेलं बंधन त्याच्यावर लादतो. हे जे लादलेलं बंधन आहे, त्याला भ्रांति असं म्हणतात.
भ्रांती म्हणजे नेमकं काय? भ्रम म्हणजे नेमकं काय? एखादा मनुष्य भ्रमिष्ट आहे असं आपण चटकन् म्हणून जातो. आपण दुसर्यामला भ्रमिष्ट म्हणतो पण परमार्थाच्या दृष्टीने आपण सगळेच भ्रमिष्ट असतो, हे थोडंसं लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. चटकन् दुसर्या ला भ्रमिष्ट म्हणायला बरं वाटतं पण परमार्थाच्या आणि संतांच्या दृष्टीने विचार केला तर ते आम्हाला सगळ्यांनाच ‘भ्रमिष्ट’ म्हणतात. मनावरील भ्रमाचा मळ धुवून काढायचा आहे. ‘जेणें भ्रांतीपासून हिरतलें| गुरुवाक्यें मन धुतलें|’ भ्रांतीच्या मळापासून सोडवलेलं मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतं. ओवीचा हा अर्थ जर समजून घेतला तर अनुग्रहाच्या संदर्भामध्ये विचारासाठी घेतलेली समर्थांची ओवी समजायला फार मोठी मदत होईल. भ्रांती म्हणजे भ्रम. भ्रमाचे दोन प्रकार आहेत. ‘असतं एक आणि दिसतं भलतंच’ हा एक प्रकार. म्हणजे सर्वत्र आहे ब्रह्म पण दिसते जग हा तो भ्रम आहे. ‘वस्तू असते एका ठिकाणी आणि शोध दुसर्या भलत्याच ठिकाणी चालतो’ हा भ्रमाचा दुसरा प्रकार. म्हणजे ब्रह्म इथेच स्वतःच्या जवळ, स्वतःच्या आतच आहे पण त्याचा शोध बाहेर जगात घेतला जातो तेव्हा तो भ्रम असतो. ज्ञानदेव म्हणतात, –
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे| आणि हृदयीं स्वयंभचि असें|
प्रत्यक्ष फावों लागे तैसें| आपैसयाचि॥ ज्ञाने. ९-४९
फार सुंदर विचार या ओवीत आहे. ह्याचा अर्थ असा की सबंध जगभर जे आपण शोधतो, बाहेर कुठेतरी शोधायला जातो, ते आत्मा नावाचं तत्त्व बाहेर-आत, आत-बाहेर या नेहमीच्या भाषेत कुठे बसत नाही. ते सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे. ते जितकं आत आहे तितकंच बाहेर आहे आणि जितकं बाहेर आहे तितकंच आत आहे. जसं बाहेर तसं आत, जसं आत तसं बाहेर. मुद्दाम दोन्ही बाजूंनी सांगतो आहे. कारण आपल्याला आत-बाहेरच्या भाषेची सवय जडली आहे. आत एक असतं आणि बाहेर एक असतं. ही आपली व्यवहारातली विचाराची सवय आहे. यापूर्वी मी एक विधान केलं होतं की व्यवहारातील सर्व सवयी घेऊन जेव्हा आपण परमार्थाच्या क्षेत्रात उतरतो तेव्हा फार मोठी पंचाईत होऊन जाते. म्हणून व्यवहारातल्या सगळ्या सवयी क्रमाक्रमाने बाजूला कराव्या. त्या बाजूला करता याव्यात यासाठी आमच्याकडे आश्रमांची व्यवस्था सांगितली आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम असे चार आश्रम सांगितलेले आहेत. आमच्या संस्कृतीमध्ये ह्या ज्या व्यवस्था आहेत, त्यांचा हेतूच हा आहे की साधकाला मोक्षप्राप्तीपर्यंत अभ्यास करता यावा. वास्तविक या परमार्थप्रांतामध्ये आत-बाहेर काही नाही. ‘ओतप्रोतभाव’ आहे. ‘ओतप्रोतभाव’ हा फार चांगला शब्द आहे. ओतप्रोतभाव शब्दाचा अर्थ आहे, जसं बाहेर तसं आत, जितकं बाहेर तितकं आत. ज्ञानदेवांची ओवी आहे –
जे सर्वत्र सदा सम| तेथ विभाग अधमोत्तम|
मतिवेशें संभ्रम| विवंचिती॥ ज्ञाने. ४-७९
‘जे सर्वत्र सदा सम’ ते ब्रह्मतत्त्व सर्वत्र आहे म्हणजे एकही जागा अशी नाही की जिथे ते नाही. अशा या ब्रह्मतत्त्वाला ‘विभु’ म्हणतात. ते सदा आहे म्हणजे कायमचं आहे. समर्थांच्या शब्दात सांगायचं तर ते तत्त्व ‘जे असतचि असे’ असं आहे. म्हणजे शास्त्रीय भाषेत ‘अनादि-नित्य-सत्य’ असं ते तत्त्व आहे. जे सर्वत्र आहे, सदा आहे, ते सर्वत्र समत्वाने आहे. कोणात कमी अगर कोणात जास्त नाही. असं जे एक ब्रह्मतत्त्व आहे, त्या तत्त्वाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. परमार्थाचे हेच ध्येय आहे. हा विचार लक्षात घेणं, लक्षात घेतल्यानंतर त्याचं साधनेत रूपांतर करणं, साधनेत ‘ते मी आहे’ असं रूपांतर केल्यानंतर प्रत्यक्ष ‘ते मी आहे’ असा अनुभव घेणं हे परमार्थसाधनेचं स्वरूप आहे. श्रीगुरू आपल्याला महावाक्यातून नेमकं तेच समजाऊन सांगतात की ‘ते तू आहेस’ म्हणजे ‘तत्त्वमसि’ हे महावाक्य हा अनुग्रहाचा एक आवश्यक भाग आहे.
महावाक्याचा उपयोग काय? महावाक्य काय करतं? याबाबत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें| गुरुवाक्यें मन धुतलें|
मग आत्मस्वरूपीं घातले| रोऊनियां॥
मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा मनाचे अनेक मळ घालविण्यासाठी समर्थांनी उपदेश केला आहे. ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे’ अशी सुरवात केली आहे आणि मग ‘हे नसू दे, ते नसू दे’ अशा पद्धतीचे पुष्कळ विचार मांडलेले आहेत. हेतू एकच आहे की मन स्वच्छ व्हावं. पण कर्माच्या दृष्टीने, आचरणाच्या दृष्टीने आणि विचारांच्या दृष्टीने जरी मन स्वच्छ झालं तरी भ्रम नावाची गोष्ट तशीच राहते. भ्रमाचा मळ तसाच राहतो हे आमच्या लक्षात येत नाही. कोणीतरी ती गोष्ट लक्षात आणून द्यावी लागते. संत, शास्त्रवेत्ते, श्रीगुरू ही गोष्ट लक्षात आणून देतात. ते सांगतात की तुमचं मन जरी स्वच्छ असलं, तुमचं आचरण जरी शुद्ध असलं, तरी तुमच्या मनाला आणखी एक मळ आहे जो तुम्हाला ठाऊक नाही. मुळात तो ‘मळ’ आहे हेच आम्हाला ठाऊक नसतं. हा अत्यंत सूक्ष्म असलेला मनोमळ कळल्यानंतर, तो घालवण्यासाठी काहीतरी वेगळे प्रयत्न करावे लागतात, वेगळ्या दिशेने साधन करावं लागतं. हे साधन लक्षात आणून देण्याचं काम श्रीगुरू त्यांच्या अनुग्रहाच्या द्वारे करत असतात. ‘जगत् सत्यत्व भ्रांती’ नावाची एक भ्रांती आहे. जगत्सत्यत्वाची भ्रांती म्हणजे जग जसं दिसतं तसंच आहे आणि ते खरं आहे असं वाटणं. हा एक भ्रम आहे. हा भ्रम लक्षात कोण आणून देणार? आम्ही मनाने, आचरणाने कितीही शुद्ध असलो तरी त्यामुळे आमच्या मनात फार तर पापवासना येणार नाहीत, चुकीची कर्मे आम्ही करणार नाही. ह्या गोष्टींपासून आम्ही दूर राहू पण जग खरं आहे असं जे आम्हाला वाटतं, तो आमचा भ्रम आहे असं श्रीगुरूंनी लक्षात आणून दिल्याशिवाय आम्हाला कळत नाही. ‘जग सत्य आहे’ असं वाटणं हा मळ आहे हे आमच्या लक्षातच येत नाही. म्हणून श्रीगुरू नेमकं तेच सांगतात ‘हे जग जसं दिसतं तसं नाही. ते खरं नाही, ते मायिक आहे’
लगेच पुढचा विचार मनात येतो – मायिक कशाला म्हणतात? ‘सदसद्विलक्षण अनिर्वचनीय’ म्हणजे मायिक. जरा मोठे शब्द आहेत म्हणून समजावून घेणं आवश्यक आहे. जे सत्हून विलक्षण आणि असत्हूनही विलक्षण आहे त्याला म्हणतात सदसद्विलक्षण. आता विलक्षण शब्दाचा अर्थ आहे लक्षणाशी न जुळणारं. व्यवहारामध्ये एखादा मनुष्य विलक्षण आहे असं आपण म्हणतो. म्हणजे सर्वसाधारणपणे माणसाकडून आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत, तदनुसार तो वागत नाही. माणसानी असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे वगैरे आमच्या अपेक्षेतली जी लक्षणं आहेत, त्या अपेक्षित लक्षणांशी जर एखाद्या माणसाचं वागणं जुळत नसलं तर आपण म्हणतो, तो माणूस विलक्षण आहे’ तसंच हे जग सत्हून विलक्षण आहे आणि असत्हूनही विलक्षण आहे. म्हणून ते सदसद्विलक्षण आहे. असे ते अनिर्वचनीय आहे म्हणजे मिथ्या आहे.
‘सत्विलक्षण आहे’ म्हणजे काय? सत् म्हणजे सत्य. जे त्रिकालाबाधित असतं त्याला ‘सत्य’ असं म्हणतात. पूर्वी आहे, आज आहे आणि पुढे आहे असं जे लक्षण आहे, ते सत्याचं लक्षण आहे. ह्या सत्याच्या लक्षणात जे बसतं, जुळतं त्यालाच सत्य असं म्हणतात. जग पूर्वी नव्हतं, आज दिसतं आहे पण पुढे असणार नाही. ह्याचा अर्थ जग त्रिकालाबाधित नाही. म्हणजेच ते सत्विलक्षण आहे. कोणी म्हणतात, हा विचार मांडण्याचा का प्रयत्न करता? उगीच डोक्याला त्रास कशाला? आम्हाला सुखाने जगू द्या की! पण परमार्थाचा हा सगळा विषय माणसाला सुखाने जगता यावं यासाठीच आहे. परमार्थ हा जीवन आनंदरूप होण्यासाठी, आनंदमय होण्यासाठी आहे. परमार्थाचा हा हेतूच जेव्हा लक्षात राहत नाही तेव्हा मग असे विपरीत प्रश्नर विचारले जातात. जग सदसद्विलक्षण आहे हे सांगण्याचा हेतू काय? जे जग दिसतं ते सत्य नाही हे जर मला कळलं तर त्या जगाच्या ठिकाणी असलेली माझी आसक्ती कमी व्हायला मदत होईल. जग शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. म्हणून प्रत्येक वेळी एवढ्या मोठ्या जगाचा विचार करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाचं जग हे त्याच्यापुरतं सीमित असतं. माझं जग म्हणजे माझे नातेवाईक, घर, प्रपंच, व्यवसाय, मित्र एवढ्यापुरतंच माझं जग सीमित आहे. माझ्या जगात मी वावरतो. त्या जगाविषयी मला आसक्ती असते, ममत्व असतं. ही आसक्ती आणि ममत्व राहू नये, त्यातून मी सुटावं, मी अगदी मुक्त व्हावं. ह्या सगळ्याच्या आसक्तीतून, ह्या ममत्वातून मला मुक्त व्हायचं आहे. ज्यावेळेस मी ह्यातून मुक्त होईन त्यावेळेस; ह्यापूर्वी माझ्या मनाला आसक्तीमुळे ज्या व्यथा होत होत्या, ममत्वामुळे ज्या वेदना होत होत्या, त्या व्यथा आणि वेदना अजिबात उरणार नाहीत. मग मी सुखरूप होईन, मी आनंदरूप होईन अशी व्यवस्था या विचारांच्या मागे आहे. या तत्त्वज्ञानाचा हा हेतू जर लक्षात घेतला तर तत्त्वज्ञानाची आपण फार चिकित्सा करणार नाही. त्याच्या चिंध्या उडवणार नाही. ते श्रद्धेने स्वीकारू.
तत्त्वज्ञान सांगण्याचा हेतू निश्चित आहे. हे जग अनित्य आहे, मिथ्या आहे हे जर मला कळलं तर जगात जे जे माझं म्हणून मी म्हणतो त्या त्या विषयीच्या आसक्तीपासून आणि ममत्वातून मी मुक्त होईन आणि माझा जो आनंद आहे, तो टिकून राहील. त्या आनंदापासून मी वंचित राहणार नाही. अशा तर्हेनची व्यवस्था अध्यात्मशास्त्राने, परमार्थशास्त्राने केलेली आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आसक्तीमध्ये, ममत्वामध्ये फार दुःख आहे. कारण ज्यांच्याविषयी आपण आसक्ती बाळगतो, त्यांच्या आपल्याविषयी आणि आपल्या त्यांच्याविषयी काही अपेक्षा निर्माण होतात. या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला दुःख होतं. हे दुःख होऊ नये अशी व्यवस्था परमार्थशास्त्रात आहे. म्हणून परमार्थशास्त्राचा अभ्यास करतांना साधनाची जी दृष्टी आहे ती सतत सांभाळली पाहिजे. अन्यथा त्या तत्त्वज्ञानाला केवळ पोपटपंचीचं स्वरूप येतं. सैद्धांतिक चर्चेचं, सैद्धांतिक विचारांच्या देवाणघेवाणीचं स्वरूप येतं. या पलीकडे त्याच्यात काही राम उरत नाही. उदाहरणार्थ, ‘आम्ही गीतेचा अभ्यास केलेला नाही, दासबोधाला हात लावलेला नाही. तुम्ही मात्र दासबोधाची दोनशे पारायणं केली आहेत, गीता तुम्हाला मुखोद्गत आहे, उपनिषदांचा सांगोपांग अभ्यास तुम्ही केलेला आहे. तरीही तुमच्यात आणि आमच्यात काहीच फरक दिसत नाही! जसे तुम्ही तसे आम्ही. जसे आम्ही तसे तुम्ही. मग ह्यातलं सगळं न करून आम्ही काय गमावलं आणि एवढं सगळं करून तुम्ही काय कमावलं?’ अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेला तर आमच्याजवळ त्याचं उत्तर नसतं. ह्याला कारण असं आहे की आम्ही जे वाचतो, जो अभ्यास करतो, त्याचं आम्ही साधनात रूपांतर केलेलं नसतं. आमच्या बोलण्यात केवळ आग्रह असतो. आग्रह सिद्धांताचा असतो. पूर्वोत्तर पक्षांचा, खंडनमंडणाचा आग्रह असतो. केवळ मोठे मोठे शब्द वापरण्याचा आग्रह असतो. पण ह्यातून निष्पत्ती काहीच होत नाही. मग अशा प्रकारचे प्रश्नब जेव्हा समाजाकडून आम्हाला विचारले जातात तेव्हा आमच्याजवळ त्या प्रश्नांचं काहीही उत्तर नसतं. केवळ त्यांचं तोंड बंद करणारं उत्तर मात्र आम्ही देतो. ‘आमच्यात आतून जो बदल झाला आहे तो तुम्हास समजण्याची शक्यता नाही.’ पण तुमच्या मते तुमच्यात जो बदल झालेला असतो तो बाहेरही दिसला पाहिजे ना? तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने तुमच्या स्वभावात, तुमच्या वर्तनात बदल होणं अपेक्षित आहे. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला आहे –
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव|
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्॥ भ. गी. २-५४
त्याने तीन प्रश्न विचारलेत. जो स्थितप्रज्ञ आहे तो कसा वागतो? कसा बोलतो? कसा चालतो? एकंदरीत काय की त्याचं जीवन कशा पद्धतीचं असतं? मग भगवंतांनी उत्तर दिलं आहे की तो ‘असा असा असतो.’ ह्याचा अर्थ असा आहे की पूर्वी तो असा नव्हता पण स्थितप्रज्ञ झाल्यानंतर तो असा झाला. ह्याचाच अर्थ असा की त्याच्या वर्तनात बदल झाला, त्याच्या स्वभावामध्ये बदल झाला, जगाकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टीमध्ये बदल झाला. एकूण तो मनुष्य अंतर्बाह्य बदलून गेला. साधकाने असं बदलावे हीच अपेक्षा आहे. ही अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा मग जग असा प्रश्न. विचारते व उत्तर देताना आमची पंचाईत होऊन जाते.
जग मिथ्या आहे असं शास्त्र सांगतं. या सांगण्याच्या पाठीमागे काही एक सैद्धांतिक विचारसरणी मांडून ठेवलेली आहे. जगाला मिथ्या का म्हणायचं? ते सत्हून विलक्षण आहे आणि असत्हूनही विलक्षण आहे म्हणून त्याला मिथ्या म्हणायचं. सत्हून कसं विलक्षण आहे ते आपण पाहिलं. आता असत्हून विलक्षण आहे म्हणजे काय ते पाहू या.
असत् म्हणजे काय? जे मुळात नाहीच त्याला ‘असत्’ म्हणतात. असत्य म्हणजे खोटे अशा अर्थाने आपण व्यवहारात हा शब्द वापरतो. पण परमार्थामध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे. असत् म्हणजे जे मुळात नाहीच, जे कधीच कोणाला दिसत नाही, ज्याला अस्तित्वच नसतं, त्याला असत् म्हणतात. असत् शब्द समजावण्यासाठी दोन-तीन उदाहरणे नेहमी दिली जातात. एक ‘खपुष्प’ नावाचं उदाहरण आहे. ‘खपुष्प’ म्हणजे आकाशाला लागलेलं फूल. हे फूल आजपर्यंत कोणीही पाहिलेलं नाही. दुसरं उदाहरण शशशृंगाचं म्हणजे सशाच्या शिंगाचे दिले जाते. सशाचे शिंग आजपर्यंत कोणीही पाहिलेले नाही कारण ते अस्तित्वातच नाही. म्हणून ते असत् आहे. तिसरं उदाहरण देतात ते वंध्यापुत्राचं. एखादी स्त्री वंध्या आहे, मग तिचा पुत्र असेलच कसा? म्हणून वंध्यापुत्र असत् आहे. तिन्ही उदाहरणं परमार्थशास्त्रामध्ये वारंवार येतात. या उदाहरणांवरून जग कसं असत् विलक्षण आहे ते समजून घेता येतं. जगाला असत् म्हणावं तरी पंचाईत होते कारण ते डोळ्याना प्रत्यक्ष दिसते. म्हणून ते असत्च्या लक्षणांशी जुळत नाही. याप्रमाणे जग सत्च्या लक्षणांशी जुळत नाही म्हणून सत्विलक्षण आणि असत्च्या लक्षणांशीही जुळत नाही म्हणून असत्विलक्षण म्हणजेच मिथ्या म्हणजेच अनिर्वचनीय आहे. अशा मिथ्या जगासंबंधी माझ्या मनात आसक्ती असू नये, ममत्व असू नये या उद्देशाने विचारांची ही मांडणी आहे. या दोन गोष्टी जर जीवनातून निघून गेल्या तर माणूस विरक्त होतो. याबाबत श्रीसंत ज्ञानदेव म्हणतात –
आणि मी माझें ऐसी आठवण| विसरलें जयाचें अन्तःकरण|
पार्था तो संन्यासी जाण| निरंतर॥ ज्ञाने. ५-२०
या ओवीत ज्ञानेश्वरमहाराजांनी संन्यासाची व्याख्याच केलेली आहे. ते आम्हाला संन्यासदीक्षा घ्यायला सांगत नाहीत. ते सांगतात की ‘मी आणि माझं’ अशी आठवण देखील ठेऊ नका. ही आठवण ज्या क्षणी जाईल त्या क्षणी तुम्ही संन्यस्तच आहात, निरंतर संन्यासीच आहात. ज्ञानेश्वरमहाराजांनी आपल्याला एवढं सांगून ठेवल्यानंतर आता आणखी दुसरं काय सांगायचं शिल्लक राहिलं?
‘मी आणि माझं’ ह्या दोनमध्ये जी आसक्ती आहे, ममत्व आहे, त्यातून आपली सुटका केव्हा होईल? ‘जेणें भ्रांतिपासून हिरतले| गुरुवाक्यें मन धुतले’ असे झाले तर सुटका होईल. श्रीगुरू म्हणतात, ‘तू कोण आहेस?’ तर ‘तू ब्रह्म आहेस.’ ‘तत्त्वमसि’ हे महावाक्य आहे. त्या महावाक्याचा तपशील आपण पाहतो आहोत. भ्रमाच्या निवृत्तीमुळे महावाक्याचा अभ्यास करण्याची पूर्वतयारी होते. या महावाक्यात तत् (ते) त्वं (तू) आणि असि (आहेस) अशी तीन पदं आहेत म्हणून तत्त्वमसि या महावाक्याचा अर्थ आहे ‘ते तू आहेस’. या वाक्यातील ‘ते’ म्हणजे कोण? ‘ते’ जे आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. ते ब्रह्म कसं आहे? ते व्यापक आहे, अनादी आहे, अनंंत आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. पण ब्रह्म जर निराकार असेल आणि सगळं जग जर ब्रह्मरूप असेल तर जगाच्या आकाराची व्यवस्था काय? ताबडतोब असा तर्कसंगत प्रश्न निर्माण होतो. तुम्ही सगळं जग ब्रह्मरूप आहे असं म्हणता आणि ब्रह्म निराकार आहे असंही सांगता. आमच्या समोर तर नामरूपाने भरलेलं सगळं जग दिसतं आहे. हे जग कितीतरी आकारांनी भरलेलं दिसतं आहे. अशा स्थितीत हे तुमचं जगासंबंधीचं म्हणणं आणि प्रत्यक्ष आमच्या डोळ्यांनी जे दिसतं ते जग, ह्या दोन्हीमध्ये इतकी विसंगती असतांना हे तुमचं म्हणणं आम्ही मानावं कसं? या संबंधीचा विचार तत् पदाच्या विचारामध्ये मोडतो. म्हणून परमार्थ आम्ही फास्टफूडसारखा घेऊ शकत नाही. रात्री बाराला गेलो, पावभाजी खाल्ली आणि परत आलो. अशा पद्धतीने कुठेतरी गेलो आणि परमार्थ साध्य करून परत आलो असं होण्याची अजिबात शक्यता नाही. ‘फास्ट परमार्थ’ नावाची गोष्ट आजपर्यंत तरी कोणाच्या आवाक्यात आलेली नाही. ह्यापुढेही येण्याची मुळीच शक्यता नाही. याचं कारण असं आहे की परमार्थात फार मोठ्या बदलातून जावं लागतं. त्या बदलाचा विचार करताना तुकाराम महाराज म्हणतात, ‘चणे खावे लोखंडाचे| तेव्हां ब्रह्मपदीं नाचे|’ तुम्हाला लोखंडाचे चणे जेव्हा खाता येतील म्हणजे ते खाण्याइतके तुमचे दात मजबूत असतील तेव्हाच तुम्हाला ब्रह्मपदावर नाचता येईल. म्हणजे ब्रह्मानुभव घेता येईल. येथे लोखंडाचे चणे खाणं ह्याचा अर्थ अनेक प्रक्रियांतून जाणं असा होतो. परमार्थसाधनेत आपल्या मनाविरुद्ध होणार्या अनेक गोष्टीतून जावं लागतं. परमार्थसाधना सुरू करण्यापूर्वी आपण एका विशिष्ट पद्धतीने आयुष्य घालवलेलं असतं. त्याच्या एकदम विरुद्ध पद्धतीने ते जगण्याचा प्रसंग साधना सुरू केल्यावर येतो. अशा प्रसंगी आपला आपल्याशीच झगडा होतो. आपलं अंतर्मन आपल्याला पूर्वीपासून पडलेली आपली वळणं सोडू देत नाही. साधनकाळात एक नवीन मन तयार होत असतं. त्या अभ्यास करणार्याो नवीन मनाचा, नवीन संस्कार घेऊन येणार्याळ मनाचा, साधनेच्या आधी असलेल्या मनाशी झगडा होतो. त्याच्या संदर्भात तुकाराम महाराज म्हणतात, ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग| अंतर्बाह्म जग आणि मन|’ (तु. गा. ३१५१) दोन मनांचं हे युद्ध जिंकायचं असेल तर लोखंडाचे चणे खायची तयारी पाहिजे. ज्याची लोखंडाचे चणे खायची तयारी असेल त्याला ब्रह्मपदावर नाचायला मग वेळ लागत नाही. पण ही गोष्ट अवघड मात्र नाही हं. नाहीतर अशी कल्पना होऊन बसेल की हे सगळं भलतंच काहीतरी दिसतंय. हे काही आपल्या आवाक्यातलं नाही. पण असं अजिबात नाही. हे काम अगदी थोडंसंच आहे असंही तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. ते म्हणतात, ‘थोडें आहे थोडें आहे| चित्त साह्य झालिया|’(तु. गा. ८५) फारच चांगला विचार आहे हा. तुकाराम महाराज म्हणतात, अहो, इतका तुम्ही त्याचा बाऊ करू नका. काही भयंकर आहे असं समजू नका. अगदी थोडं आहे, पण एक मोठी अट आहे – चित्त साह्य झालिया! परमार्थ अगदी थोडा आहे पण केव्हा? आपल्या मनाने आपल्याला मदत केली तर! इथेच तर सगळा गोंधळ आहे. आमचं मन आम्हाला मदत करत नाही हीच तर मोठी अडचण आहे. त्याला मदतीला सातत्याने साद घालण्याचे काम जर आम्ही करीत राहिलो तर साधना सोपी होईल. असा रीतीने बुद्धीवर असणारे अविद्या व अज्ञानाचे जुने संस्कार पुसून टाकून ‘तत्त्वमसि’च्या ‘सोऽहं’मध्ये केलेल्या रूपांतराने नवे संस्कार करीत राहणे ह्याला साधना म्हणतात. साधना हा काही दिवसातून घटका दोन घटका करण्याचा प्रकार नाही. सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, दुपारी दहा मिनिटं नामात व ध्यानात घालवणं आणि गावात कुठे प्रवचन, भजन, कीर्तन, पारायण असेल तर तिथे जाणं – केवळ एवढंच करणं म्हणजे काही साधना नव्हे. साधना नावाची गोष्ट अशा पद्धतीने होण्याची शक्यता नाही. पण त्याचबरोबर श्रवणाशिवाय साधना म्हणजे काय ते समजण्याचीही शक्यता नाही. श्रवणाचा फार मोठा उपयोग आहे. श्रवण हा साधनेचा पाया आहे. पण श्रवण झालं म्हणजे सर्व झालं असंही नाही तर दोन्हींचा समतोल नीट साधला गेला पाहिजे. आपण विचार करीत होतो ‘जेणें भ्रांतिपासून हिरतलें’. जगत्सत्यत्वाचा जो भ्रम आहे तो गुरुवाक्याच्या साह्याने धुवून टाकायचा आणि जगत् मिथ्या आहे असा निश्चय करून घ्यायचा. पक्का निश्चय होईपर्यंत अभ्यास करीत राहायचं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जगन्मिथ्यत्व जितक्या अधिक प्रकारांनी कळेल तितकं ते अधिक उपयुक्त ठरेल. जगाचे मिथ्यत्व, मायिकत्व समजून घेण्याचे पुष्कळ प्रकार आहेत. प्रतीतिमात्रसत्तावान्, ज्ञाननिवर्त्य इत्यादी पाच-सात प्रकारे मायेचं वर्णन करतात. मायेचा विचार आमच्या वेदान्तशास्त्राने जेवढा केलेला आहे तेवढा जगामध्ये कुठल्याही तत्त्वज्ञानामध्ये केलेला नाही.
जग जसं दिसतं तसं आहे असं वाटणं हा भ्रम आहे. कारण त्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि नाश आहे. जे जे परिवर्तनशील असतं ते ते मिथ्या असतं. एनर्जीचं मॅटरमध्ये रूपांतर होतं आणि मॅटरचं एनर्जीमध्ये रूपांतर होतं म्हणून तिथे मिथ्यत्व आहे. माणसं परिवर्तनशील असतात की नाही? काल एक कबूल केलेलं असतं आणि आज नाही म्हणतो. ह्याचा अर्थ काल एक जबाबदारी स्वीकारलेली असते आणि दुसर्या दिवशी ती मी सोडून देत असतो. नाही असं म्हणतो. ह्याचा अर्थ मी आतून परिवर्तनशील आहे तसाच बाहेरूनही परिवर्तनशील आहे. असाच जर निश्चय जगासंबंधी केला तर जगातलं जे माझं आहे तेही परिवर्तनशील आहे. ज्याच्याविषयी मला ममत्व आहे, तेही परिवर्तनशील आहे आणि जे परिवर्तनशील आहे, त्याच्याविषयी ममत्व ठेवण्यात, आसक्ती ठेवण्यात अर्थ नाही. हे जर कळलं तर ह्या सगळ्या तत्त्वज्ञानाचा उपयोग होईल म्हणून लक्षात घ्यावे की ‘जेणे भ्रांतीपासून हिरतले| गुरुवाक्यें मन धुतलें|’
‘मी म्हणजे माझे शरीर आहे’ हा आणखी एक भ्रम आहे. आता ह्याही भ्रमातून बाजूला व्हायचं आहे. ह्याचा अर्थ शरीर सोडावं असा नाही. ह्या शरीराशी असलेलं जे आपलं तादात्म्य आहे, ते तादात्म्य म्हणजे ‘हे शरीर म्हणजेच मी आहे’ असा जो आपला भ्रम आहे, तो भ्रम सोडून द्यायचा आहे. हा भ्रम सोडता यावा म्हणून श्रीगुरू सांगतात, ‘तत्त्वमसि’ अर्थात, ‘ते तू आहेस. ते ब्रह्म तू आहेस. तू शरीर नाहीस.’ हे जर आपल्याला अभ्यासानं पटलं तर भ्रम दूर होईल. त्यासाठी ‘पंचकोशविवेक’ नावाचा जो एक विवेक आहे तो केला पाहिजे. अन्नमयकोश, मनोमयकोश, प्राणमयकोश, विज्ञानमयकोश आणि आनंदमयकोश असे पाच कोश आहेत. तसेच चार देहांच्या अभ्यासाचा आणखी एक विचार आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे चार देह आहेत. हा जो पंचकोशांचा व चत्वार देहांचा अभ्यास आहे, त्यांच्या अभ्यासातून ‘मी शरीर नाही’ अशा तर्हेाच्या अनुभवाची व्यवस्था होते.
हा अभ्यास ध्यानाशिवाय करता येत नाही. ‘तत्त्वमसि’ ह्या महावाक्यातील तत् म्हणजे ब्रह्म हे आपल्याला समजलं. ते ब्रह्म मी आहे असंही समजलं. म्हणजे मी ब्रह्मरूप आहे हे मला तत्त्वज्ञानाने कळलं, पण जे तत्त्वज्ञानाने कळलं त्याचं अभ्यासात रूपांतर करायचं असेल, साधनात रूपांतर करायचं असेल तर त्यासाठी काही प्रक्रिया वापरण्याची आवश्यकता असते. ह्या प्रक्रिया कोणत्या आहेत? पंचकोशांची प्रक्रिया आहे, चार देहांची एक प्रक्रिया आहे. ह्या माणसाने बसवलेल्या प्रक्रिया आहेत. कोणी येऊन एखाद्या जादूसारख्या आमच्या समोर आणून ठेवलेल्या नाहीत. माणसाने बसविलेल्या ह्या प्रक्रियांचा वापर करायचा आणि नंतर त्या सोडून द्यायच्या. साधनापुरताच त्यांचा विचार! असं जर केलं नाही तर आम्ही प्रक्रियेचीच तपासणी करीत बसू. कुठेशी आहेत ही पाच शरीरं? मी डॉक्टर असल्याने हे चिकित्सक मला विचारतात, ‘तुम्ही डिसेक्शन केलंय ना डॉक्टर? सापडले का तुम्हाला पाच कोश?’ आता आली पंचाईत! ह्या प्रश्नांचे उत्तर काय देणार? अर्थातच ‘नाही सापडले’. पण मग आम्ही वेदांती अनेक डॉक्टरांना नेहमी प्रश्न विचारतो, ‘काय हो, तुम्ही मेंदूचं डिसेक्शन केलं तेव्हा मन नावाचं तत्त्व तुम्हाला सापडलं का?’ ह्याचं उत्तरही नाही असं आहे. मन नावाचं जे तत्त्व आहे, ते तुम्हाला मायक्रोस्कोपखाली दिसलं का? नाही दिसलं. मग मन आहे की नाही? मन आहे पण दिसत नाही. मग तसंच आत्म्याचं. आत्मा आहे पण कळत नाही. आता हे थोडंसं ह्या पद्धतीने बोलावं लागतं त्याशिवाय प्रश्नकर्त्याची समजूत पटविता येत नाही. डिसेक्शन केल्यानंतर मन नाही सापडलं बुद्धी नावाची गोष्ट नाही सापडली, तरी सुद्धा मन नावाचं तत्त्व आहे ह्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसते.
पंचकोशांच्या प्रक्रिया पाहिल्यानंतर पाच कोश म्हणजे ‘मी’ नाही तर त्या पंचकोशांच्या पलीकडे ‘मी’ आहे हे कळतं. ह्याला ध्यानाची एक प्रक्रिया म्हणतात. चार देहांच्या पलीकडे ‘मी’ आहे असं समजणं ही सुद्धा ध्यानाची आणखी एक प्रक्रिया आहे. ही जी ध्यानाची बसविलेली प्रक्रिया आहे ती नीट समजावून घ्यायची, त्या प्रक्रियेचा वापर करायचा. ह्या प्रक्रियेतून येणारा जो अनुभव आहे तो घ्यायचा आणि प्रक्रिया शांतपणे पाठीमागे सोडून द्यायची. एवढा जर आपल्याला धीर असेल, समजुतदारपणा असेल तर हे ध्यान फार सोपं होऊन जातं. एरव्ही आपल्याला व्यवहारात समजुतदारपणा असतो हं! डॉक्टर सांगतात की शरीराच्या अमुक भागाचा ‘एक्स रे’ काढून आणा. एक जण गेला रेडिऑलॉजिस्टकडे आणि म्हणाला, ‘एक्स रे’ काढायचा आहे. रेडिऑलॉजिस्ट म्हणतो, ‘जरा आपण या मशीनसमोर उभे राहा’. तर हा म्हणतो, ‘झोपायचं कां नाही? उभं का राहायचं इथे?’ आली अडचण! हा पुन्हा म्हणतो, ‘ह्याच्या पाठीमागे असलेली सगळी यंत्रणा तपासून पाहिल्याशिवाय मी एक्स रे काढून घेणार नाही’ असं जर हा म्हणेल तर ते सर्व समजून येईपर्यंत हा स्वर्गात जायची शक्यता आहे! हे साधं गणित आहे. ह्याचा अर्थ आहे की ही बसवलेली सिस्टिम आहे. एक्सरेचं मशीन असतं आणि त्यामध्ये ठराविक सिस्टिम बसवून दिलेली असते. त्या सिस्टिमचा वापर केला की ‘एक्स रे चित्र’ नावाची गोष्ट आपल्यासमोर उभी राहते. आता आपण जसे त्या मशीनची तपासणी करीत नाही, का? कसे? हे प्रश्न विचारीत नाही, निमूटपणे उभे राहतो, एक्स रे घेतो आणि मागतील तेवढे पैसे देतो. तसंच इथे करायचं आहे. शास्त्र सांगतं की पंचकोश असे आहेत. चार देह असे असे आहेत. ते जसे आहेत तसे स्वीकारायचे आणि ध्यानामध्ये एक एक कोश मागे टाकत पुढच्या कोशांमध्ये प्रवेश करायचा. पाचही कोश मागे पडल्यानंतर जे शिल्लक राहतं, ‘ते तू आहेस’. ‘तत्त्वमसि’ या श्रीगुरूंच्या बोधाचा अनुभव घ्यायचा. असा बोध श्रीगुरूंनी करणं ह्याला अनुग्रह म्हणतात. तत्त्वमसि महावाक्य हा अनुग्रहाचा एक अपरिहार्य भाग आहे तो यासाठीच. ‘तत्त्वमसि’ महावाक्य समजावून सांगतांना, ‘ते तू आहेस’ असा अनुभव येण्यासाठी ज्या काही प्रक्रिया सांगितल्या जातात त्या सगळ्या या अनुग्रहाचाच एक भाग असतो. अनुग्रह दिलेला आहे पण एकही प्रक्रिया सांगितलेली नाही. ‘तत्त्वमसि’ महावाक्य सांगितलेलं नाही, तत् पदाचं स्पष्टीकरण केलेलं नाही, त्वं पदाचं स्पष्टीकरण केलेलं नाही, असि पदाचं स्पष्टीकरण केलेलं नाही, तत्पदवाच्य असलेले ब्रह्म आणि त्वंपदवाच्य असलेला तू जीव एक आहात असं स्पष्टीकरण केलेलं नाही. असं जर असेल तो अनुग्रह अस्पष्ट म्हणावा लागेल. अनुग्रह देणार्यामची ही जबाबदारी आहे की त्याने ह्या गोष्टी हळुहळु समजतील अशी व्यवस्था करून दिली पाहिजे. ध्यानाच्या प्रक्रियेतून क्रमाक्रमाने हे पाचही कोश मागे टाकल्यानंतर जे तत्त्व शिल्लक राहतं तेच ‘सत्’ तत्त्व आहे. त्याला समर्थ ‘असतचि असे’ असे म्हणतात. हे जे ‘असतचि असे’ तत्त्व आहे ते पंचकोशांच्या अतीत आहे. चार देहांच्या पलीकडे आहे, नित्यप्राप्त आहे, चार देह व पाच कोशांचे प्रकाशक आहे. ‘बंधन काही आत्मयाला| बोलोचि नये|’ असा हा ओवीचा उत्तरार्ध आहे. आत्म्याला पंचकोशाचे बंधन नाही. आत्म्याला चार देहांचे बंधन नाही. पण ‘मी देह आहे’ अशी जी माझी भ्रांत समजूत आहे, त्या समजुतीतून बाहेर पडण्यासाठी चार देह आपल्यासमोर मांडले. क्रमाक्रमाने एक एक मागे टाकत ध्यान प्रक्रियेने तिथपर्यंत जावं आणि असं गेलं की ‘जेणे भ्रांतिपासून हिरतले| गुरुवाक्यें मन धुतलें|’ असं होऊन जातं.
तिसरा एक भ्रम आहे जो गुरुवाक्याने निवृत्त होतो. ‘कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती’ असं त्याचं नाव आहे. मी कर्ता आहे असं प्रत्येकाला वाटतं. वास्तविक मी कर्ता नसताना मी कर्ता आहे असं वाटणं हा तो भ्रम आहे. मी कर्ता आहे का? काही वाक्यं आपली ठरलेली असतात. उदा. मी एक डॉक्टर आहे. माझं कर्तृत्व दाखविण्यासाठी मी सांगतो, ‘मी होतो म्हणून पेशंट जगला. मी नसतो तर काय झालं असतं कोणास ठाऊक!’ एवढ्याने भागत नाही. मी आणखी म्हणतो, ‘दुसर्याअ कोणाच्या तरी तडाख्यात सापडला असता तर काय झालं असतं कोणास ठाऊक!’ आता ह्या तीन गोष्टी झाल्या. माझ्या या बोलण्यात, माझ्या या विचार करण्यातच माझा कर्तृत्वाचा भ्रम दिसतो. ‘मी कर्ता, मी कर्ता’ ही आमची भूमिका भ्रामक असल्याने ती अत्यंत दुःख देणारी आहे. भ्रमाचं रूपांतर जेव्हा दुःखात होतं तेव्हा त्या दुःखापासून सोडवणूक करणं हा परमार्थाचा हेतू आहे, हे सातत्याने मनात बिंबवलेलं असायला पाहिजे. हे दुःख मी स्वतःच स्वतःवर ओढवून घेतलेलं आहे.
ह्या तीन भ्रमातून आणि दुःखातून माझी सुटका झाली तर मी आनंदमय जीवन जगेन अशी सुंदर व्यवस्था ह्या वेदांतशास्त्रामध्ये, ह्या परमार्थशास्त्रामध्ये आहे. ‘मी कर्ता ऐसें म्हणसी| तेणें तू कष्टी होसी|’ समर्थांचं हे प्रसिद्ध वचन आपणा सर्वांना माहीत आहे. मी कर्ता नाही हे जेव्हा मला कळेल तेव्हा मग ‘कोण कर्ता आहे’ असा प्रश्न पुढे येईल. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर मिळालं तर कर्तृत्व नावाची गोष्ट आपल्याला आपल्यापासून दोन हात लांब ठेवता येईल. नंतर भोक्तृत्व नावाची गोेष्ट आपोआप निघून जाते. कर्तृत्व-भोक्तृत्व निघून गेलं की सगळा व्याप संपतो. मी भोक्ता आहे असं वाटण्याचे परिणाम कसे होतात पहा. मी भोक्ता आहे असं जेव्हा मला वाटतं तेव्हा भोगाची आवश्यकता आहे असं ठरतं. मला भोगाची आवश्यकता आहे असं ठरतं त्यावेळेला ते भोग संपादन करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असंही ठरतं. भोगाच्या साधनासाठी संपत्ती लागते. ती मिळाली पाहिजे असंही ठरतं. ती कशीही मिळवली पाहिजे असंही ठरतं. अशी एक एक गोष्ट एकापुढे एक ठरत जाते. कर्तृत्व-भोक्तृत्व भ्रांतीसंबंधीचा हा विचार वेदान्तशास्त्राने अगदी तर्कशुद्ध पद्धतीने बसवून दिलेला आहे. आता प्रश्न आहे की मी कर्ता नाही तर मग कर्ता कोण आहे? आत्मा निष्क्रिय आहे. तो काही करत नाही पण त्याच्या सत्तेशिवाय मात्र काही घडत नाही हे एक मोठं सत्य आहे आणि हे सत्य लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आत्मा अकर्ता आहे आणि अकर्ता असलेल्या आत्म्याच्या सत्तेशिवाय मात्र काही घडत नाही. आत्म्याच्या साक्षीने सगळं काही घडतं. ‘साक्षी’ शब्द मोठा मजेदार आहे. आत्मा हा निष्क्रिय साक्षी आहे. सक्रिय साक्षी आणि निष्क्रिय साक्षी ह्यात काही फरक आहे का? कोर्टामध्ये साक्ष द्यायला बोलावतात. कोर्टामध्ये बोलावलेला साक्षीदार त्या गुन्ह्यामध्ये सहभागी नसतो पण त्याने गुन्हा घडतांना पाहिलेला असतो. म्हणजे पाहण्याची क्रिया त्याने केलेली असते. म्हणून तो सक्रिय साक्षी आहे. आत्मा मात्र निष्क्रिय साक्षी आहे. सक्रिय व निष्क्रिय साक्षी यातला एवढा बारकावा जर आपण बरोबर लक्षात घेतला तर आत्म्याला साक्षी कोणत्या दृष्टीने म्हणतात ते आपल्याला कळेल. आत्मा हा साक्षी आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो निष्क्रिय साक्षी आहे असा त्याचा अर्थ असतो. हा अर्थ जर लक्षात घेतला तर त्याचं खरं साक्षित्व आपल्याला कळेल. व्यवहारामध्ये आपण ‘साक्षी’ असा शब्द वापरतो तेव्हा त्या साक्षीने ती घडलेली गोष्ट पाहिलेली असते, पाहण्याची क्रिया त्याने केलेली असते. पाहण्याच्या बाबतीत तो सक्रिय असतो. पण आत्मा काही पाहत नाही कारण आत्म्याला डोळे नाहीत. म्हणून आत्मा साक्षी आहे ह्याचा अर्थ असा आहे की आत्म्याच्या सत्तेवर सर्व काही घडतं. आत्मा काही पाहत नाही. आत्म्याच्या साक्षित्वात त्याची काही क्रिया नाही. आत्म्याच्या साक्षित्वाबाबत ‘साक्षी’ शब्द असा व्यवस्थित कळला की मग ‘मी म्हणजेच आत्मा साक्षी आहे’ म्हणजे नेमकं काय हे कळेल. असं साक्षित्व आपल्याला करता आलं की आपला आतला जो आनंद आहे त्या आनंदाला धक्का लागत नाही. आपल्या समाधानाला धक्का लागत नाही. तृप्तीला धक्का लागत नाही. पण जर साक्षित्व करता आलं नाही तर मग मात्र समाधान बिघडून जातं. घरातल्या गोष्टींकडे साक्षित्वानं पाहणं ज्याला जमलं त्याचं जीवन आनंदमय होऊन जातं.
घर शब्दाची व्याप्ती जरा वाढवून म्हणू या की ज्या जगामध्ये आपण वावरतो, त्या जगातील घटनांकडे जर आपल्याला निष्क्रिय साक्षित्वाने पाहता आलं तर आनंदाचे निधान आपल्या हाती लागतं. निष्क्रिय साक्षित्व जिथे असतं तिथे आसक्ती नसते आणि जिथे आसक्ती नसते तिथे आनंदाला धक्का लागत नाही. तृप्तीला धक्का लागतो तिथे दुःख असतं अशी साधी सरळ विचारसरणी वेदान्ताची आहे.
आपण एक उदाहरण घेऊ या. समजा एकुलता एक मुलगा गेला, जाऊ नये पण गेला. ही घटना साक्षित्वाने जर पाहायची झाली तर त्या मुलावरचं माझं ममत्व गेलेलं असलं पाहिजे ही पहिली गोष्ट. त्याच्या ठिकाणी असलेली माझी जी आसक्ती आहे ती गेलेली असली पाहिजे. गेला शब्दाचा अर्थ बर्या्च पद्धतीने होऊ शकतो. घर सोडून गेला तरी गेला. दुसरं घर मांडलं तरी गेला. भांडून गेला तरी गेला आणि प्रत्यक्षात मेला तरी गेलाच. इतक्या पद्धतीने ‘गेला’ शब्दाचा अर्थ आहे. कोणत्याही अर्थाने का होईना पण समजा तो गेला. आता ही जी घटना घडली ती मी साक्षी म्हणून पाहिली. सक्रिय साक्षी म्हणून पाहिली की सक्रियता आली व म्हणून पाठोपाठ दुःख आलंच. इथे निष्क्रिय साक्षी आहे. आणि जो निष्क्रिय साक्षी आहे तो मी आहे आणि ‘तत्त्वमसि-ते तू आहेस’ या महावाक्यानुसार मी आत्मा आहे. या यथार्थ श्रवणातून माझ्या ठिकाणी विपरीत भ्रांतीचा जो मळ आहे तो धुऊन टाकण्याची व्यवस्था अनुग्रहामध्ये आहे. अनुग्रहामध्ये ही व्यवस्था नसेल तर अनुग्रह हा नुसता औपचारिक विधी होऊन जातो. अनुग्रह हा नुसता विधी असता कामा नये, त्या अनुग्रहाचा उभयपक्षी सतत पाठपुरावा होण्याची आवश्यकता आहे. ज्यानी अनुग्रह दिला त्यांच्याकडून आणि ज्याने घेतला त्याच्याकडूनही सतत पाठपुरावा झाला पाहिजे. असा पाठपुरावा झाला तर त्या अनुग्रहाला काही मूल्य आहे. ‘जेचि क्षणीं अनुग्रह केला| तेचि क्षणीं मोक्ष जाला|’ समर्थांच्या या म्हणण्याचा अर्थ असा की अनुग्रहाच्या त्या क्षणी अनुग्रह देणारा व घेणारा या दोघांनीही जर आपापली जबाबदारी स्वीकारलेली असेल तर मग भ्रमातून मुक्त व्हायला काही फारसा वेळ लागत नाही. मोक्षाची व्यवस्था त्याक्षणी झालीच म्हणून समजायला हरकत नाही. म्हणून ‘तत्त्वमसि|’ हे महावाक्य त्या अनुग्रहाचा एक भाग बनते. या बोधामुळे जगत्सत्यत्वभ्रांतीतून आपली सुटका होते. देहतादात्म्यातून आपली सुटका होते आणि तिसरी सुटका आहे ‘मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे’ या समजुतीतून. मग कर्ता कोण आहे? याचं उत्तर आहे की जीव कर्ता आहे. आत्मा कर्ता नाही. जीव नावाचं तत्त्व तुमच्या आमच्यात आहे ते कर्ता आहे. पण मी जीव नाही. मी जीव नसल्यामुळे आणि मी आत्मा असल्यामुळे मी प्रत्येक घटनेचा निष्क्रिय साक्षी आहे. जे काही घडतंय ते जीवाकडून घडतंय आणि जे जीवाकडून घडतंय ते प्रारब्धवशात घडतंय. पण ते वाटेल तसं घडतंय ही कल्पना बरोबर नाही तर ‘विधीते पाळीत| निषेधाते गाळीत|’ अशी मर्यादा आहे. काहीतरी कसंतरी घडलं आणि ते प्रारब्धानी घडलं असं समजण्यास हरकत नाही पण मुख्य गोष्ट म्हणजे माझा त्याच्याशी काहीही संंबंध नाही. प्रारब्ध निर्माण झालं ते कर्म जीवाने केलं, मी नाही. हीच अलिप्तता. अशा अलिप्ततेचा अभ्यास सातत्याने करीत राहणे ही साधना आहे. ह्या साधनेची सामुग्री आपल्याला त्या महावाक्यातून म्हणजे पर्यायाने त्या अनुग्रहातून मिळत असते. म्हणून तिन्ही भ्रमातून निवृत्ती हे अनुग्रहाचं एक फळ असलं पाहिजे. आणखी एक बारकावा आपल्यापुढे मांडतो. बारकावा फार चांगला आहे.
विषयव्याळें मिठी| दिधलिया नुठी ताठी|
ते तुझिये कृपादृष्टी| निर्विष होय॥ ज्ञाने. १२-२
ज्ञानेश्व रमहाराजांची ही फार सुंदर ओवी आहे. तिचा महावाक्याशी संबंध आहे. अनुग्रहाशी संबंध आहे. ज्यावेळी विषय नावाचा साप आम्हाला विळखा घालतो आणि तो ती मिठी आवळतो, तेव्हा तिच्यातून आमची सुटका होऊ शकत नाही. ‘मिठी ताठी’ म्हणजे त्या विषयरूपी सापाच्या मिठीतून ती अधिकाधिक घट्ट होत असल्याने सुटका होत नाही. अशी ती घट्ट मिठी ‘ते तुझिये कृपादृष्टी| निर्विष होय|’ निर्विष होय म्हणजे त्या विषयामधलं जे विषत्व आहे ते निघून जातं. हे थोडं अधिक स्पष्ट करतो. उदाहरणादाखल रूप हा विषय घेऊ. रूप हा डोळ्यांचा विषय आहे. ‘विषयव्याळे मिठी’ ह्याचा अर्थ असा आहे की ज्या क्षणी मी डोळे उघडतो त्या क्षणी मला रूप दिसतंच. रूप शब्दाचा अर्थ ‘आकार’ असा आहे. मी जरा गमतीने म्हणत असतो की नटी आणि गेंडा दोघंजणं सारखेच रूपवान आहेत. परमार्थाच्या दृष्टीने तिलाही रूप आहे आणि त्यालाही रूप आहे. म्हणून रूपत्वाच्या दृष्टीने दोघेही सारखेच आहेत. रूप शब्दाचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी ही जोडी मुद्दाम घेतली आहे. दोन्हींना आकार आहे. या रूपाचा सौंदर्याशी काहीही संबंध नाही. रूप म्हणजे आकार. विशिष्ट वस्तूला असलेली आकृती किंवा रूप दिसतंच पण जे रूप दिसतं ते सत्यत्वानं दिसतं ही खरी अडचण आहे. रूप दिसणं हा डोळ्यांचा धर्म आहे पण त्या रूपामध्ये ते ‘सत्यत्वाने दिसणं’ हेच विष आहे. एवढं जर लक्षात आलं तर गुरुकृपादृष्टीने नेमकं काय होतं ते आपल्याला कळेल. मग अनुग्रहाचा परिणाम काय असतो ते देखील आपल्याला कळेल. तोपर्यंत मात्र अनुग्रहाचा परिणाम म्हणजे काय ही गोष्ट लक्षात येणं मोठं कठीणच आहे. अनुग्रह दिलाही जातो, घेतलाही जातो. सगळे व्यवहार तसेच चालू राहतात पण मग नेमकं काय झालं पाहिजे? डोळ्यांना रूप दिसण्यात काहीच दोष नाही कारण डोळ्यांचं ते कामच आहे. आपलं काम ते करणारच. पण डोळ्यांनी जे रूप पाहिलं ते सत्य आहे असं वाटणं हे त्यातले विष आहे. हे विषत्व निघून गेलं की ‘ते तुझिये कृपादृष्टी| निर्विष होय|’ असं घडतं. डोळा उघडला की रूप दिसणं हे डोळ्यांवर बंधन आहे. तीच त्या व्याळाची मिठी आहे. त्या विषयाच्या व्याळाची मिठी इतकी घट्ट आहे की ज्या क्षणी मी डोळा उघडतो त्याक्षणी रूप दिसलंच पाहिजे. पण गुरुकृपादृष्टी जर असेल तर डोळा उघडल्यावर मला विषय दिसला तरी त्यामध्ये असणारं सत्यत्वाचं विष निघून जाईल. तो दिसणारा पदार्थ पूर्वी विषारी होता पण आता बिनविषारी झाला. पदार्थ तोच दिसणार आहे. डोळे डोळ्यांचं काम करणार आहेत. मन त्या पदार्थाचा आकार पकडणार आहे. त्या पदार्थाचं नाव पाहणार्यादच्या लक्षात येणार आहे, त्या पदार्थाचा उपयोग काय आहे हेही त्याला कळणार आहे. तो माझा आहे की नाही हेही कळणार आहे. त्याच्या बरेवाईटपणाचं चिंतनही होणार आहे. पण या सगळ्या चिंतनाच्या ठोकाठोकीमध्ये त्याचं विषत्व मात्र असणार नाही. गुरुकृपादृष्टी जर प्राप्त झाली तर त्यातलं सत्यत्वाचं विष जातं. सत्यत्व गेलं की मग तत्त्वतः तो विषयच राहणार नाही.
‘दत्तभार्गव संवाद’ नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे. त्यामध्ये पत्नी गुरु आहे आणि पती शिष्य आहे. गुरुशिष्याच्या जोडीतला शिष्य असलेला पती उंच मनोर्याावर जाऊन बसला. त्याच्यासाठी खालून पाळण्याच्या साह्याने अन्न वगैरे वर पोहोचवले जायचे. हा अजिबात बाहेर बघायचा नाही. त्याने स्वतःला मनोर्या्त सहा महिनेपर्यंत कोंडून घेतलं होतं. डोळे मिटून बसायचा. कारण काय, तर जग दिसता कामा नये. त्याचा विचार असा की मिथ्या असलेलं जग मला दिसायला नको असेल तर माझ्याजवळ एकच उपाय आहे की ते मी बघायचंच नाही. पत्नीने सहा महिने हा प्रकार चालू दिला. सहा महिन्यानंतर त्या गुरू असलेल्या पत्नीने त्याला खाली बोलावलं आणि एक फार सुंदर प्रश्न विचारला, ‘अहो असं काय आहे की जे डोळे मिटल्यानंतर येतं आणि उघडल्यानंतर जातं? डोळे मिटल्यानंतर तुमचा आत्मा येतो का? आणि डोळे उघडल्यानंतर तो जातो का? तो आत्मा जाऊ नये म्हणून तुम्ही डोळे घट्ट मिटून बसता? जग दिसू नये म्हणून मनोर्याात कोंडून घेतलं पण मनोर्याहमध्ये मनोर्याीचे दगड दिसलेच ना! हे जे मनोर्यानचे दगड आहेत ते जगापेक्षा वेगळे आहेत का? मनोर्यातच्या भिंतीचे ते दगड जगातूनच आणले आहेत. दगड जर दिसत असतील तर दगडाच्या रूपाने जग दिसतंच. म्हणून डोळे मिटून घेऊन भागणार नाही.’ ते जे दिसतंय, विषयांच्या व्याळाने जी मिठी मारलेली आहे, त्यातलं जे सत्यत्वाचं विष आहे, तेव्हढं फक्त घालवून टाका आणि मग जग दिसायचं तसं दिसू दे. कारण जग दिसणारच आहे. ते दूर सारताच येणार नाही. आणि जग दूर सारणं हा परमार्थाचा हेतूही नाही. जगातून पळून जाणं हाही परमार्थाचा हेतू नाही. तर जगाकडे बघण्याची नजर बदलणं हा परमार्थाचा उद्देश आहे. ही नजर बदलण्याची गोष्ट जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत परमार्थ ही गोष्ट मोठी गूढ वाटत राहते. परमार्थ ही आपल्याला न समजणारी, आपल्या आवाक्यात नसणारी गोष्ट आहे असं आपण ठरवून टाकतो. आमच्या मनाचा तसा कायमचा गैरसमज होऊन जातो. यावर एकच उपाय आहे- अखंड श्रवण, यथाशास्त्र श्रवण, यथार्थ श्रवण. असं असेल तर परमार्थासंबंधी असलेले आमचे सगळेच्या सगळे गैरसमज नष्ट होतील. नंतरच ज्ञानेश्वरमहाराजांच्या या ओवीचं रहस्य आपल्याला कळेल. दुसरा विषय आहे शब्द. कानांनी शब्द ऐकू येणारच आहे. ऐकणं हा कानांचा धर्म आहे. पण ऐकलेला तो शब्द सत्य आहे असं वाटणं हा त्यातला विखार आहे. शब्द मिथ्या आहे हे जर मला कळलं तर शब्दातला विखार निघून जातो. मग निंदा आणि स्तुती माझ्या दृष्टीने समान! याच अर्थाने संत म्हणतात, ‘कोणी वंदा कोणी निंदा| आमुचा स्वहिताचा धंदा|’ निंदेचा शब्द असो की स्तुतीचा शब्द असो. दोन्ही शब्द कान ऐकणारच आहेत. कान आपलं ऐकण्याचं काम करणार कारण शब्द हा कानांचा विषय आहे. त्यामुळे त्या विषयाची मिठी मी टाळू शकणार नाही. पण शब्द मिथ्या आहेत हे जेव्हा मला कळतं, तेव्हा त्या शब्दाचा अर्थही मिथ्या होऊन जातो. शब्दाचा अर्थ मिथ्या झाला की अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया होत नाहीत आणि मग समाधान, शांती, सुख, तृप्ती यापैकी कशातच व्यत्यय येत नाही.
शब्दांच्या संदर्भात आता एक शेवटचा विचार सांगतो. आपल्या संबंधात येणारी माणसं आपल्याशी काही तरी बोलत असतात. आपण काय बोललो याचा विचार बोलणारा मनुष्य करतोच असे नाही. तो त्याच्या पद्धतीने बोलतो आणि निघून जातो. एक उदाहरण देतो म्हणजे लवकर समजेल. एक शांत सरोवर आहे. त्या सरोवरावर एकसुद्धा तरंग नाही. ते अत्यंत शांत आहे. एक उपद्व्यापी मुलगा आला. त्याने एक दगड घेतला आणि त्या सरोवरात टाकला. दगड टाकला आणि निघून गेला कुठेतरी. आता उपद्व्याप करणं हा त्याचा धर्म आहे. एक उपद्व्याप संपला की पुढच्या उपद्व्यापाकडे तो निघून जातो. मागे आपण काय केलंय ह्याचं त्याला भान राहात नाही. तसं आमचं होतं. कोणीतरी येतो, आमच्या कानावाटे एखादा शब्द टाकतो आणि निघून जातो. दगड पडल्यानंतर त्या सरोवरावर तरंगांची वलयं दिसतात. खळबळ दिसते. दगड तळाशी गेल्यावर खळबळ हळूहळू शांत होते. तसंच आपल्या मनाचंही होतं. पण सरोवरात आणि आमच्यात एक फरक आहे. तो दगड एकदा तळाशी पोहोचल्यानंतर सरोवर त्याला पुन्हा वर आणीत नाही. तुमचं आमचं मात्र तसं नाही. कोणीतरी बोललेला जो शब्द आहे, ज्या शब्दाने मूळचं शांत असलेलं सरोवर ढवळून निघालं आहे, तो शब्द आपण पुन्हा पुन्हा आठवत राहतो. म्हणजे पुन्हा पुन्हा तो शब्दरूपी दगड आम्ही आमच्यावर टाकून घेतो आणि पुन्हा अशांत होतो. दगड टाकण्याचे काम स्वभावधर्मानुसार करणारा तो कोणी एक निघून गेला आहे. आपण दगड टाकलाय हे त्याच्या लक्षातही नाही. पण आम्ही मात्र तो टाकलेला दगड आठवायचा, वर आणायचा, पुन्हा आपला आपल्यावर टाकून घ्यायचा, पुन्हा सगळं ढवळून घ्यायचं अशा पद्धतीची विचित्र कर्तबगारी करीत असतो. हे दगड दोन प्रकारचे आहेत हं! एक हवेसे वाटणारे आणि दुसरे नकोसे वाटणारे. दगड टाकल्यानंतर जे घडतं ते अगदी जसंच्या तसं दगडाएवढा डिंकाचा लाडू जरी टाकला तरी घडतं. लाडूचं उदाहरण देण्याचंही एक कारण आहे. दगड हा प्रतिकूल आहे आणि लाडू हा आपल्याला अनुकूल आहे असं समजू या. पण अनुकूल असला तरी तो टाकल्यानेही मन ढवळतेच. अशांतपणा नको असेल तर जसा निंदेचा शब्द ऐकल्यानंतर अन्तःकरण ढवळून घेऊ नये तसंच स्तुतीचा शब्द ऐकल्यावरही तो पुन्हा पुन्हा आठवून अन्तःकरण ढवळून घेऊ नये. तत्त्वतः लाडू आणि दगड या दोघांचं म्हणजे स्तुतीचा शब्द आणि निंदेचा शब्द या दोघांचंही मूल्य इथे सारखंच आहे. याच अर्थाने ज्ञानदेव म्हणतात,
सुखीं संतोषा न यावें| दुःखीं विषादा न भजावें|
आणि लाभालाभ न धरावें| मनामाजीं॥ ज्ञाने.२-२२६
आपल्याला ज्ञानेश्वरी अगदी पाठ असते. पण आपण त्याचा व्यवस्थित अर्थ समजावून घेतलेला नसतो. एक दगड आहे आणि एक लाडू आहे पण दोघांचाही परिणाम मात्र आमचं अन्तःकरण ढवळणे हा एकच आहे. यापैकी कशानेही का होईना पण माझ्या अन्तःकरणाची स्वस्थता, शांतता, तरंगरहित अवस्था बिघडून जाणे हेच दुःख आहे. ही दुःखाची अतिशय नेमकी व्याख्या आहे. मुळात अत्यंत शांत, स्थिर नि तृप्त असलेलं अन्तःकरण ज्याक्षणी त्यावर सुखाचा किंवा दुःखाचा तरंग उठतो त्या क्षणी दुःखी होतं. सुखाचा किंवा दुःखाचा तरंग उठणं हेच दुःख आहे. आम्हाला सुखाचे तरंग हवेसे वाटतात आणि दुःखाचे तरंग नकोसे वाटतात. वेदान्तशास्त्राच्या दृष्टीने दुःखाचा उमटलेला तरंग हाही दुःखरूप आहे आणि सुखाचा उमटलेला तरंग हाही दुःखरूपच आहे. म्हणून त्यांना तळाशी स्थिरावू द्यावेत आणि नंतर ते पुन्हा पुन्हा वर काढून आपण क्षुब्ध होऊ नये. किमान एवढं तरी पथ्य आपल्याला पाळता आलं तर ‘विषयव्याळें मिठी| दिधलिया नुठी ताठी| तें तुझियें कृपादृष्टी| निर्विष होय|’ ह्या ओवीचा अनुभव येईल. ही जी गुरुकृपादृष्टी आहे ती आपल्याला अनुग्रहातून प्राप्त होत असते. सद्गुरूंच्या कृपेतून आपल्याला जगाकडे पाहण्याची अलिप्त दृष्टी (साक्षीभाव) प्राप्त झालेली असते. तीच गुरुकृपादृष्टी. ही साक्षीभावाची अलिप्त नजर कमावणं आणि आपल्यापाशी स्थिर ठेवणं हा अनुग्रहाचा हेतू असतो.
अनुग्रहाचं एकूण स्वरूप अशा प्रकारचं असतं. अनुग्रहामध्ये महावाक्याचा समावेश असतो, ध्यानाचा समावेश असतो, ध्यानातून आपल्याला त्या तत्त्वाचा अनुभव येण्याची व्यवस्था असते, त्याला सहाय्यक म्हणून नामचिंतनाची व्यवस्था असते आणि ह्या सगळ्याला तत्त्वज्ञानाची जोड असते. असं सगळं त्या गुरुकृपेमध्ये असतं. हे सारं जर अनुग्रहामध्ये समाविष्ट असेल आणि यथार्थ पद्धतीने ते दिलं गेलं असेल आणि त्याच पद्धतीने ते स्वीकारलेलं असेल तर त्यातून ‘आनंदाचे डोही आनंदतरंग| आनंदचि अंग आनंदाचे|’ अशा तर्हेेची तुकोबारायांची जी अवस्था आहे ती अवस्था तुम्हाला-आम्हाला देखील मिळू शकते.

धन्यवाद!


हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

Blog Search