ज्या भारताची अंधारी बाजूच सतत जगासमोर आणण्यात ब्रिटिशांनी यश मिळविले त्याची दैदीप्यमान बाजू नव्या जगाला प्रथम स्वामीजींनीच दाखविली.
ईश्वराच्या आज्ञा पाळणे व त्याला शरण राहाणे हेच त्याच्या उपासनेचे रहस्य आहे. त्याने ईशकृपा होते व साधकाच्या कल्याणाचे दरवाजे एकामागून एक उघडत जातात. सगुण साकार श्रीकृष्ण हा ईश्वराचा अवतार आहे. त्याच्या भगवद्गीतेतील आज्ञा पाळाव्या, त्याला शरण राहावे व त्याच्या अनुसंधानात प्रेमाने राहावे.
जिवाभाव जाऊन ब्रह्मभाव स्थिर होण्यासाठी म्हणजे विभक्ताचा भक्त होण्यासाठी देहांच्या उपाधीचा निरास होणे अनिवार्य आहे. सगुण भजनात अत्यंत प्रेमाने तल्लीन झाल्याने देहाचा निरास होतो.
आपले कर्तव्यकर्म चोख पार पाडीत असता जीवनात जे जे घडेल, ते ते ईश्वरी योजनेनुसार घडेल अशा विश्वासाने शांत चित्ताने रहाणे हे शरणागतीचे स्वरूप आहे. अशी शरणागती असेल तर मत्सर, स्पर्धा, तुलना, द्वेष इत्यादी विकार आपोआप दूर राहून समाधान टिकून राहते.
वेदांत गर्जून सांगतो की चैतन्य एकमेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. एक काहीतरी कळते, दुसरे काहीतरी आठवते हे सर्व ज्याच्यामुळे होते तो ज्ञानरूप आत्माच होय. तो असंग आसून अज्ञानाने लिप्त होत नाही.
वेदांत गर्जून सांगतो की चैतन्य एकमेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. एक काहीतरी कळते, दुसरे काहीतरी आठवते हे सर्व ज्याच्यामुळे होते तो ज्ञानरूप आत्माच होय. तो असंग आसून अज्ञानाने लिप्त होत नाही.
आत्मज्ञानाचा कोणताही विधी नाही. ते विधीच्या अधीन नाही. उदा. ‘स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करावा’ असा विधी सांगितला आहे. आत्मा नित्यप्राप्त असल्याने त्याचे ज्ञानही नित्यप्राप्तच आहे.
स्वेच्छा, अनिच्छा व परेच्छा अशा तीन प्रकारचे प्रारब्धकर्म आहे. त्यानुसार ज्ञान्यांचे वर्तन होऊन ते जगदुद्धाराचे कार्य करू शकतात. पण त्यात फळाच्या इच्छेचा मागमूसही नसतो. ही स्थिती येण्यासाठी मुमुक्षूने अखंड आत्मानात्मविचार करावा
परमार्थ हे कृतिपेक्षा विचारांचे शास्त्र आहे. भगवान शंकराचार्यांनी "वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित् कर्मकोटिभिः।' असे सांगितले आहे. माणूस कृतिशील असतो. पण कर्मामागचे वर्म समजून घेऊन कृती घडली तरच विचार बदलतात.
स्वेच्छा, अनिच्छा व परेच्छा अशा तीन प्रकारचे प्रारब्धकर्म आहे. त्यानुसार ज्ञान्यांचे वर्तन होऊन ते जगदुद्धाराचे कार्य करू शकतात. पण त्यात फळाच्या इच्छेचा मागमूसही नसतो. ही स्थिती येण्यासाठी मुमुक्षूने अखंड आत्मानात्मविचार करावा.
Posted on July 4, 2016
श्री समर्थांच्या अफाट वाड्मयातील “जुनाट पुरुष” हे छोटे प्रकरण आहे. या प्रकरणाच्या सर्व ग्रंथांमध्ये प्रामुख्याने वेदान्तशास्त्र त्यांच्या खास शैलीने सांगितले आहे. “जुनाट पुरुष” ह्या शिर्षकातच ती शैली व्यक्त झाली आहे. जुनाट वृक्ष, जुनाट मंदिर, जुनाट वाडा इत्यादि प्रकारे तो शब्द व्यवहारात वापरला जातो. पुरुष हा शब्द आत्मा / ब्रह्मा ह्या अर्थाचा असून अनादि, नित्य, आद्य इत्यादि वेदान्तशास्त्रातील शब्द ‘जुनाट’ हा अर्थ सांगतात. ‘अनादि ब्रह्म’ असे त्याचे थोडक्यात रूपांतर करता येईल.
सर्व साधु संत व श्रोत्यांना वंदन केल्यावर समर्थ ह्या रचनेचे महात्म्य स्वत:च सांगतात.
जुनाट पुरुषाची हे कथा |
नेमस्त मेळवी परमार्था |
जे समागमे महत्तीर्था |
पाविजेत आहे || 3 ||
ब्रह्म स्वरुपाच्या यथार्थ श्रवणाने मोक्ष निश्चितपणे मिळून साधकाचा जीवभाव ब्रहमतीर्थाशी एकरूप होतो. त्या श्रवणाच्या धारेबरोबर वाहत गेले तर सर्व श्रेष्ठ ब्रह्मतीर्थात अवगाहन करता येते. अनुकुल वारा मिळाला नाही तर शीड असलेली नौका समुद्र तरून जाते. त्याप्रमाणे हे समजावे. यथार्थ श्रवण करणारा अहंकाररहित असेल तरच शंका, कुशंका इत्यादि स्वबुद्धिच्या भरवशांवर आधारलेले प्रश्न न विचारता मार्गक्रमण होते. ‘परिप्रश्न’ विचारावेत असे भगवान श्रीकृष्ण म्हणत असले तरी ते स्वत:ला आकलन न झाल्याच्या स्वरूपाचे असावेत. स्वत:चे ज्ञान मिरवण्याच्या हेतूने विचारलेले नसावेत. खरी भूक लागलेला माणूस भोजनासंबंधी प्रश्न न विचारता जेवण्यास सुरुवात करतो . जीवनात मोठमोठी संकटे आल्याने किंवा चौकस तीक्ष्ण बुद्धिची मिजास दाखविण्यासाठी परमार्थ मार्गाला लागणार्यामला तो लाभत नाही. काही प्रसंगी गोंधळासारख्या कार्यक्रमात एखादी पौराणिक कथा लावतात. ऐकणारे मारून मुटकून ती ऐकतात. श्रोत्यांचे येणे जाणे चालू असते. वक्ता ‘ठ’ ला ‘ठ’, ‘म’ ला ‘म’ जुळवून, कित्येक तास कथा सांगतो. ह्या प्रकारचे श्रवण मोक्षासाठी कधीच उपयोगी पडत नाही. बुद्धिमान, चाणाक्ष व एकाग्र बुद्धीच्या साधकालासुद्धा ज्या ब्रह्मवस्तूचे यथार्थ आकलन होत नाही ते ह्या प्रकारच्या श्रवणाने कसे होईल? रत्नजडित अंगठी जर गढूळ व खोल पाण्यात पडली तर ती कशी दिसेल? शांत व स्वच्छ पाण्यातच ती दिसेल. त्याप्रमाणे स्वच्छ सी शांत अंत:करणाने अधिकारी वक्त्याकडून श्रवण घडले तरच आत्मज्ञान होते. (ओव्या १ ते ११ )
अद्वैताचे निरूपण ऐकता ऐकताच देहबुद्धी विसरणे हे एकाग्र चित्ताचे श्रवण करण्याचे लक्षण आहे. जेव्हा श्रोत्याची अंत:करण वृत्ती स्वरूपाकार होते तेव्हा ती स्वत:ला देहासह विसरते. आत्मा एकमेव असल्याने त्याशिवाय असणारे द्वैत अनुभवाला येईलच कसे? यथार्थ श्रवणाने मी व माझे असा लागलेला ध्यास संपून सर्व शंका निरसन होऊन आत्मतृप्तीचे समाधान जणू सक्तीने अनुभवता येते. श्रवण करणारा शब्दांना मागे सारून त्यांच्या अर्थाशी एकरूप होतो व त्या व्यतिरिक्त सर्व संग सोडून देतो. शब्दात न रमता ते सांगतात त्या तत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. ‘मी’ व ‘मी आत्मा’ ह्या अभ्यासापलिकडील ‘आत्मरूप मी’ हा अनुभवरूपाने वेगळाच आहे. हा अनुभवसुद्धा अनुभव ह्या स्वरुपात न उरल्याची खूण वेगळीच आहे. व्यावहारीक अहं व साधना काळातील सोsहं मधील अहं हे दोन्ही मावळल्यावर खर्यात समाधानाचे वर्म हाती येते. त्या अवस्थेत वेदांतशास्त्र पुर्णपणे विस्मृतीत जाते. ‘ यो बुद्धे: परतस्तु स: ’ ह्या गीतवचनानुसार बुद्धी जेथे पोहोचू शकत नाही तेथे बुद्धीला उमजणारे वेदांतशास्त्र काय करील? येथे केवळ गुरुकृपाच प्रभावी आहे. ज्याला स्वरूपानुभव आला नाही तो बंधनातुन सुटत नाही व त्याला समाधान मिळणे शक्य नाही. (१२ ते १९)
झाले हे बोलणे पुरे झाले आता जुनाट पुरुषासंबंधी सांगेन ते लक्ष देऊन ऐका. तो सर्व दृश्याचे मुळ आहे. (जे दिसते, कळते, आठवते, सुचते व सर्व दृश्य ) ब्रह्मदेव, विष्णू व महेशांचाही तो स्वामी आहे. हे तिन्ही त्याचे अंश असून त्याला स्वत:ला नाव नाही. नाव हे स्वरूपासहच असते. तो अरुप असल्याने त्याला नाम नाही. सर्व सृष्टीत तोच अधिष्ठान रूपाने भरून राहिला आहे. (अध्यस्त सृष्टीत अधिष्ठान ब्रह्म व्यापून रहाते). ज्या मुळे मायेपासून दृश्य तयार झाले असे म्हणतात ती त्याचीच अध्यस्तरूप निर्मिती आहे. तो पुरुष मात्र आदिरहित व अनंतकालापासून सत् रूपाने आहे. त्याच्या सत्तेवरच सूर्य, चंद्रही त्यांच्या त्यांच्या कक्षेत फिरत राहतात. जुनाट पुरुष ‘अक्रीड म्हणजे क्रियशून्य असून त्याच्या केवळ सत्तेवर हे सर्व घडते. पृथ्वी, ढग, समुद्र इत्यादि त्याच्याच नियंत्रणाखाली असतात. (ही भाषा ईश्वररूप पुरुषाशी निगडित आहे.) एवढे सर्व घडूनही तो पुरुष एकमेव अद्वितीय असाच राहतो. (२० ते २५ )
ब्रह्मरूप जुनाट पुरुष एकमेव अद्वितीय असून त्याची कथित कन्या असलेली माया सर्व अवाढव्य पसारा भासविते. ती तिच्या छंदानुसार खेळ खेळते. पित्याला गलका, गोंधळ खपत नसल्याने आजुबाजुला जाऊन तिचा खेळ मांडते. ब्रह्मदेवसारख्या देवांनाही त्य खेळात भाग घ्यावाच लागतो. ती अनंतकोटी ब्रह्मांडाच्या उतरंडी रचते. तिचा काळ नावाचा पुत्र त्यास पाडून टाकतो. ही माया खेळून खेळून कंटाळल्यावर काही काळ खेळ थांबविते. (प्रलय व उत्पत्तीतील मधला काळ ) ह्या खेळकर कन्येला तिच्या पित्यावरून जराही करमत नाही. मात्र तिचा पिता निर्गुण, निराकार असून तिला माता मुळातूनच नाही. पुन्हा तिला उत्साह आल्यावर मोडलेला खेळ पुन्हा मांडू लागते. निरवयव, निराकार, ब्रहमस्वरूपातच ती न कंटाळता दीर्घ काळ खेळतच राहते हे दिसणारे ब्रह्मांड तिच्या खेळातील प्रचंड उतरंडीतील केवळ एक लहान भांडे आहे. अनंत जड, चेतन सृष्टीला ती त्य खेळात गुंतवून ठेवते. मायेची सूक्ष्मता भल्या भल्या बुद्धिमंताना चक्रावून टाकते. पृथ्वीसारख्या अतीलहान भांडयात ती कोट्यवधी जीवांना साठवून ठेवते. जीवसृष्टीला ती अनेक इच्छा आकांक्षात अडकवून टाकते व स्वत:चा खेळाचा हव्यास पूर्ण करते. अनेक जीवांना उत्पन्न करून त्यांच्या मागे पंचविषयांना जबर ओढीचे भूत मानगुटीवर बसवून त्यांना पुन्हा पुन्हा जन्माला येणे भाग पाडते . ह्या मायेच्या तडाख्यातून कोणी क्वचितच भाग्यवान साधक सुटतो. ह्या मायेच्या पोटी लक्षावधी जीव जन्माला येत असले तरी तिचे कौमार्य जराही भांगत नाही. तिचे माया हे नाव ठेवणारा तिचा पिता तिच्याच पोटी जन्माला येतो. (तोही मायीकच ) ती स्वत:च स्वत:चा पती बनून व जणू पतीला जन्माला घालून ती त्याची पत्नी झाली. हे सर्व विपरीत वर्णन माया कल्पित आहे हे सांगण्यासाठी लक्षावधी पद्धतीने केले आहे. (२६ ते ४३ )
वायूने फुंकर घालून मायेत अग्नि निर्माण केला. त्यात पाणी मिसळले असे जिचे स्वयंपाकाचे अद् भुत कौशल्य आहे. ह्या खेळात ती ब्रह्म या स्वत:च्या अधिष्ठानास विसरली. हे लक्षात येता क्षणी ती अधिष्ठानाकडे परत फिरली. ‘बाबा’ अशी तिने हाक मारली तरी तिला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिला मोठे दु:ख होऊन ती भिरभिरत्या नजरेने त्याला सर्वत्र शोधू लागली. ह्या प्रकारे पित्याचा वेध लागल्याच्या नादात सर्व खेळ विस्कटुन गेला, काळाने तो खेळ गिळून टाकला. पित्याचे दर्शन होताच खेळ मोडतो. हे लक्षात येताच तिने पित्याकडे जाणे पसंत केल्याने खेळ मोडलेलाच राहिला. ती पित्याकडे जाताच पित्यामध्ये गडपच झाली. व तिला सर्वत्र तोच दिसू लागला. आपली कन्या नष्ट झाल्याचे लक्षात येताच त्याने थोडा विलाप करून स्वत:मध्ये पुन्हा माया उत्पन्न केली.( उत्पत्ती, स्थिति व लयाचा खेळ असाच चालू रहातो). दोघांना आनंद झाला व मायेने पुन्हा उतरंडी रचण्यास सुरुवात केली. असा हा जुनाट पुरुष असून तो सर्वांचा स्वामी व सर्वश्रेष्ठ आत्मा आहे.