Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

  • No events
  • पारिभाषिक शब्दांची सूची :- त ते म

    Posted on July 10, 2016

    ।।श्री।।

    अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची

    तद्रहूपता – तदाकारता. तत् = ब्रहम. ब्रहमतत्त्वाशी साधलेली एकरूपता, सायुज्यता.

    त्त्वचिंतक – ब्रहमतत्त्वाचे चिंतन करणारा (साधकावस्था).

    त्त्वज्ञ – ब्रहमतत्त्वाचा आत्मत्वाने (मी ब्रहम आहे असा) दृढ, अपरोक्ष व अपरिवर्तनीय असा अनुभव घेतलेला (सिद्ध).

    दमन – मूळ धातू दम् = वठणीवर आणणे, ताब्यात आणणे, शांत करणे. इंद्रिये स्वाधीन ठेवण्याला दमन म्हणतात.

    दर्शन – 1) विचार पद्धत 2) मतप्रणाली 3) तत्त्वज्ञानाचा पंथ 4) A  system of Philosophy    5) A doctrine or theory prescribed in a system.

    भारतीय तत्त्वज्ञानात सहा आस्तिक (वेदप्रामाण्य मानणारी) दर्शने प्रसिद्ध आहेत.ती दर्शने व त्यांचे प्रगटकर्ते आचार्य असे – 1) न्याय – गौतम 2) वैशेषिक – कणाद 3) योग – पतंजली 4)सांख्य – कपिल 5) पूर्वमीमांसा – जैमिनी 6) उत्तरमीमांसा – वेदव्यास.

    दिक् – दिशा

    दिव्य – मूळ धातू दिव् = प्रकाशणे. दिव्य = अलौकिक, लोकोत्तर, दैवी, ईश्वरीय.

    देव – दिव् = प्रकाशणे. स्वयंप्रकाश असलेले ज्ञानतत्त्व.

    देश – जागा.

    देह – वेदांतशास्त्राच्या बहुतेक ग्रंथात तीन प्रकारच्या देहांचे (शरीरांचे) वर्णन आहे. हे तीन देह म्हणजे कारणदेह, सूक्ष्मदेह आणि स्थूलदेह होत. काही ग्रंथात (उदा. दासबोध, विवेकसिंधू) महाकारणदेहाचे वर्णन केलेले आहे. कारणदेह – जीवावस्था किंवा ईश्वरावस्था होण्याचे जे कारण त्याला कारणदेह म्हणतात. व्यष्टिअज्ञान (मलिन सत्त्वप्रधान अविद्या) हा जीवाचा कारणदेह तर शुद्ध सत्त्वप्रधान माया ही ईश्वराचा कारणदेह. व्यष्टीच्या कारणदेहाचा अभिमानी प्राज्ञ तर समष्टीच्या कारणदेहाचा अभिमानी शंकर आहे. गाढ झोपेला कारणदेह म्हणतात कारण ती स्वप्न व जागृतीला कारण आहे. सूक्ष्मदेह – (लिंगदेह) पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मद्रिये, पाच प्राण व अंतःकरण मिळून सूक्ष्मदेह बनतो. तैजस व विष्णु हे अनुक्रमे व्यष्टी व समष्टी सूक्ष्म देहांचे अभिमानी आहेत.  स्थूलदेह – पंचमहाभूतांच्या पंचीकरणानंतर स्थूल देह तयार होतो. विश्व व ब्रहमदेव हे अनुक्रमे व्यष्टी आणि समष्टी स्थूलदेहांचे अभिमानी आहेत. महाकारणदेह – महाकारणदेहात सूक्ष्म ‘अहं’ शिल्लक असल्याने व तो स्वतःला वेगळा मानत असल्याने तो ‘देह’ म्हटला जातो. 1) ‘मी ब्रहम आहे’ शिवाय अंतःकरणवृत्तीला जेव्हा अन्य कशाचेही भान नसते तेव्हा त्या सो@हंला घट्ट पकडून ठेवलेल्या अंतःकरणवृत्तीला (सूक्ष्मबुद्धिवृत्तीला) महाकारणदेह म्हणतात. तूर्या ही महाकारणदेहाची अवस्था असून प्रत्यगात्मा हा तिचा अभिमानी आहे. आनंदावभास हा तेथे भोग आहे. 2) नामाकार झालेली वृत्ती. महाकारण देहाच्या अधिक स्पष्टीकरणासाठी पाहा – विवेकसिंधू.

    दृश्य – जाणीवेचा प्रांत. देहसापेक्ष आणि मन-बुद्धिसापेक्ष जाणीव, वृत्तिज्ञानाचा विषय.

    द्रष्ट – पाहणारा. लोहचुंबकाच्या सान्निध्यामुळे जशी लोखंडाची सुई हालचाल करते त्याप्रमाणे परमात्म्याच्या आश्रयाने त्रिगुणमयी प्रकृतीच्या हालचाली सृष्टीत चालू असतात. जीवात्मा हा परमात्म्याचा अंश असल्यामुळे खरोखर तोही परमात्म्याप्रमाणे अकर्ता आहे आणि सृष्टीत वा देहात चाललेल्या सर्व हालचाली तो फक्त पाहत असतो. परंतु त्या जडाशी तन्मय झाल्याने स्वतःला कर्ता समजू लागतो. प्रत्यक्षात तो त्यांचा द्रष्टा म्हणजे पाहणारा किंवा साक्षी आहे.

    धर्म – 1) मूळ धातू धृ= धारण करणे, पोषण करणे, आधार देणे. जो धारण करतो, पोषण करतो, आधार देतो तो धर्म. 2) स्थायीभाव – दृढ, अपरिवर्तनीय गुण. उदा. थंडपणा हा बर्फाचा धर्म आहे. 3) कर्तव्यकर्म – मातृधर्म, पितृधर्म, पुत्रधर्म इत्यादी ठिकाणी धर्म हा शब्द ‘कर्तव्य’ अशा अर्थ वापरला आहे. 4) नीती 5) वस्तूचा अपरिवर्तनीय गुण.

    निर्गुण – गुणातीत, गुणरहित.

    निमित्तकारण – कार्य पूर्ण होण्यास आवश्यक असते परंतु कार्य पूर्ण झाले की ज्याचे काम संपते ते कारण. उदा. घटाच्या निर्मितीत कुंभार, त्याचा दंड, चक्र ही निमित्तकारणे आहेत.

    जगाच्या निर्मितीत ब्रहम हे सत्त्वगुणप्रधान ईश्वराच्या रूपाने निमित्तकारण असून तेच त्रिगुणात्मक मायेच्या रूपाने उपादानकारण आहे. त्यामुळे त्याला जगताचे अभिन्न निमित्तोपादानकारण म्हणतात.

    निरंजन – निर्दोष.

    निरुपाधिक – उपाधिशिवाय.

    निष्क – अंशरहित, निरंश.

    निष्काम – फळाची इच्छा नसणे.

    निष्ठ – झालेल्या निश्चयाच्या ठिकाणी असलेली बुद्धीची अविचल स्थिरता.

    निवृत्ती – संन्यास मार्ग, मोक्षमार्ग. आत्यंतिक निवृत्ती – कारणासह कार्याची निवृत्ती. ज्याचा नाश झाल्यावर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशास आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. जेव्हा सर्व दुःखांना कारण असणार्‍या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा आत्मज्ञानाने नाश होतो तेव्हा सर्व दुःखे आणि त्यांची साधने यांची आत्यंतिक निवृत्ती होते. लयरूप निवृत्ती – अधिष्ठानज्ञानाने अध्यस्ताची अधिष्ठानातच निवृत्ती होते. रज्जज्जूवर भासणार्‍या सर्पाची रज्जज्जूच्या ज्ञानाने रज्जज्जूमध्ये निवृत्ती होते. अशा रीतीने कारणाच्या ठिकाणी कार्याची निवृत्ती होणे याला लयरूप निवृत्ती म्हणतात. निवृत्ती हा शब्द प्रवृत्तीच्या विरुद्ध अर्थानेही वापरला जातो. प्रवृत्तीचे फल अभ्युदय आहे तर निवृत्ती मोक्षाकडे घेऊन जाते.

    निर्विकल्प – विकल्परहित, विकल्पशून्य, कोणत्याही विशेष जाणीवेशिवाय असलेले.

    निःश्रेयस – मोक्ष, कल्याण, ज्ञान.

    पंचकोश – पहा – कोश

    पंचमहाभूते – तन्मात्रारूप गुण जेथे राहतात ती तत्त्वे. आकाश, वायू, तेज, जल व पृथ्वी. ती तन्मात्रांच्या स्वरूपात असेपर्यन्त (सूक्ष्म) त्यांचे ज्ञान होऊ शकत नाही. पंचीकरणानंतर ती इंद्रियांनी ज्ञान होण्यास योग्य होतात.

    परावाणी – स्फुरद्रहूप मूळ वाणी.

    परिच्छेद – तुकडा, भाग, अंश, अवयव. व्यापक ब्रहमवस्तूला वास्तविक परिच्छेद नाही. पण भेदभ्रांतीमुळे तो आहे असे वाटते. परिच्छेदाचे देश, वस्तू व काल हे तीन मुख्य प्रकार आहेत. 1) देशपरिच्छेद – सावयव वस्तू ठराविक जागाच व्यापते. त्यापलिकडे तिची व्याप्ती नसते. 2) कालपरिच्छेद – एका विशिष्ट कालापुरती ती मर्यादित असते. 3) वस्तुपरिच्छेद – एका विशिष्ट ठिकाणी सुरू होते व तशीच संपते. ती व्यापक नसते.

    परिच्छिन्न – मर्यादित, सीमित, ज्याला देश-काल-वस्तू यांची मर्यादा आहे असा.

    परिणाम – उपादान कारण असलेल्या पदार्थाचे मूळ रूप जाऊन त्याला अन्य रूप येणे. एका अवस्थेचे किंवा रूपाचे दुसर्‍या पदार्थात अवस्थांतर किंवा रूपांतर होणे. नवीन पदार्थ सारख्या स्वभावाचा (समान स्वभाववान) पण वेगळ्या रूपाचा (अन्यथारूप) असतो. दोघांची सत्ता मात्र एकच असते. दुधाचे दही होणे हे परिणामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

    परोक्ष – अप्रत्यक्ष.

    प्रकाश – उजेड, ज्ञान, उघड करणे.

    प्रकृती – 1) सांख्य तत्त्वज्ञानानुसार सत्त्व, रज, तम गुणांची साम्यावस्था, स्वतंत्र आणि सत्यस्वरूप. अद्वैत वेदांतात अधिष्ठान ब्रहमाच्या सत्तेने प्रकृतीला अस्तित्व आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी सृष्टी उत्पन्न करण्यासाठी योग्य झालेल्या तमोगुणप्रधान स्वरूपालाही प्रकृती म्हटले आहे. 2) समवायी किंवा उपादानकारण.

    परा प्रकृती – जिने संपूर्ण जग धारण केले आहे अशी ईश्वररूप चेतन प्रकृती. अपरा प्रकृती – अष्टधा प्रकृती – पंचमहाभूते, मन, बुद्धी आणि अहंकार अशी आठ प्रकारचे भेद असलेली ज्ञेयरूप आणि जड प्रकृती. परा आणि अपरा प्रकृतींच्या संयोगाने समस्त प्राणीमात्रांची उत्पत्ती, स्थिती आणि वृद्धी होते.

    प्रत्यगात्मा – 1) प्रत्येक जीवात राहहून त्याला व्यापणारा आत्मा. हा इच्छा, संकल्प इत्यादी सर्व अंतःकरणधर्मांचा साक्षी असतो. तो असत्-जड-दुःखात्मक अशा अहंकारादिकांहहून वेगळ्या प्रकाराने म्हणजे सद्रहूप, चिद्रहूप आणि आनंदरूपाने प्रकाशित होतो. 2) प्रत्यक् – परत, मागे, विरुद्ध दिशेने  म्हणजेच आत. इंद्रिये बाहेर धावतात. त्याना मागे वळवून आत शोध घेतला असता ह्याची जाणीव होते.

    प्रत्यभिज्ञा – 1) ज्या वस्तूचे एकदा ज्ञान झाले त्याच वस्तूचे स्थल, काल, परिस्थिती इ. बदलूनही पुन्हा ज्ञान होणे. 2) ओळखणे 3) माहिती.

    प्रतियोगी – विरोधी.

    प्रभू – स्वामी, ईश्वर.

    प्रमाता – सामान्यतः प्रमाता म्हणजे जीव. शास्त्रीय भाषेत प्रमाता म्हणजे अंतःकरणवृत्तीने मर्यादित केलेले चैतन्य. अंतःकरणवृत्तिद्वारा बाह्य पदार्थांचे ज्ञान करून घेणार्‍या जीवास प्रमाता म्हणतात.

    प्रमाण – प्रमाज्ञानास साह्यभूत असणार्‍या साधनांना प्रमाण असे म्हणतात. ते सहा प्रकारचे आहे. 1) प्रत्यक्ष प्रमाण – पंच ज्ञानेंद्रियांनी ज्ञान होणे. 2) अनुमान प्रमाण – धूर दिसल्यावर  ‘अग्नी असल्याशिवाय धूर निर्माण होत नाही’  या अग्नी व धूर यांच्यातील संबंधाच्या ज्ञानामुळे ‘तेथे अग्नी असला पाहिजे’ अशा पद्धतीने ज्ञान होणे. 3) शब्द प्रमाण – लौकिक व वैदिक आप्तवाक्य (सज्जन व वेद). 4) उपमान प्रमाण – उपमा देऊन ‘याच्या सारखा तो असतो’ असे सांगितल्यावर कधी तो प्रत्यक्ष दिसला तर ‘तोच तो’ म्हणून उपमेमुळे प्रत्यक्ष ज्ञान होणे. 5) अर्थापत्ती प्रमाण – कार्यज्ञानाने त्याच्या कारणाची कल्पना करणे. एखाद्या पदार्थाविषयी होणार्‍या विशिष्ट ज्ञानाची उपलब्ध माहितीने संगती लागत नसली तर त्या कार्यावरून त्याच्या कारणाची कल्पना करावी लागते. हे कारणाचे ज्ञान अर्थापत्ती प्रमाणाने होते. 6) अनुपलब्धी प्रमाण – न दिसण्यामुळे, उपलब्ध नसल्यामुळे होणारे अभावाचे ज्ञान.

    प्रमेय – बाह्यवस्तुज्ञानात ज्या वस्तूचे ज्ञान करून घ्यावयाचे त्याला प्रमेय म्हणतात. उदा. घट, टेबल, खुर्च वगैरे.

    प्रयोजन – 1) हेतू (कारण) 2) फल.

    प्रवृत्ती – बंधन करणारा हेतुपूर्ण (सकाम) कर्ममार्ग. प्रवृत्तीमुळे अभ्युदयाची (व्यावहारिक वैभवाची) प्राप्ती होते.

    प्रातिभासिक -1) फक्त प्रतीतीच्या काळातच अस्तित्व असणे (प्रतीतीमात्र सत्तावान) 2) आभासिक. उदा. स्वप्नस्थ पदार्थ. त्यांची फक्त स्वप्नाच्या काळातच प्रतीती असते.

    प्राण – 1) इंद्रियांना कार्यक्षम करणारी ऊर्जा 2) पंचप्राणांचा समूह 3) पंचप्राणांपैकी  एक(प्राण, अपान, व्यान, उदान, समान)  4) संपूर्ण चराचर सृष्टीचा आधार तथा पालनकर्ता.

    प्राज्ञ – प्रायेण अज्ञ = जवळ जवळ अज्ञानी. सुषुप्ती अवस्थेमध्ये जीव हा कारण शरीराशी तादात्म्य पावलेला असतो. या अवस्थेत त्याला फक्त ‘मला काही माहीत नाही’  अशी स्थिती असते. या अवस्थेतील अभिमानी जीवाला प्राज्ञ म्हणजे जवळ जवळ अज्ञानी असे म्हटले आहे.

    प्रेयस – इंद्रियांना प्रिय असे ऐहिक सुख.

    ब्रहम – व्यापक, भेदरहित, निराकार ब्रहम कसे आहे हे निश्चितपणे सांगणे शःय नसल्याने त्याचे वर्णन ‘ते असे आहे, तसे आहे, असे नाही, तसे नाही’ अशा पद्धतीने केले जाते. खालील विशेषणे तेच दाखवतात. प्रत्येक विशेषण, जीवाला असलेल्या पदार्थज्ञानावरून ब्रहमस्वरूपाचा अंदाज करायला शिकवितात. 1) नित्य – अनित्य अशा पदार्थांशी असलेल्या भ्रांतिजन्य तादात्म्याची निवृत्ती 2) शुद्ध – कार्यरूप प्रपंचाच्या धर्मांशी असलेल्या तादात्म्याची निवृत्ती करण्यासाठी, रागद्वेषरहित. 3) बुद्ध – सर्वदा ज्ञान या एका अखंड रसाने युक्त असलेले. कारणभूत अज्ञानाची निवृत्ती. 4) मुक्त – अज्ञानकृत आवरणादिकांच्या तादात्म्याची निवृत्ती. 5) सत्य – मिथ्यात्वाची व्यावृत्ती. भूत, भविष्य, वर्तमान, उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही काळी बाधित न होणारे. 6) अद्वय – दुसरे नसलेले. अखंड, एकरस, पाच प्रकारच्या भेदांशिवाय असलेले. 7) अनंत – ज्याला शेवट नाही असे. परिच्छिन्नतेची निवृत्ती. 8) स्वसंवेद्य – ज्ञानरूप. ज्ञानेंद्रिये व प्रमाणांनी न जाणले जाणारे. प्रमा-प्रमेय-प्रमाण (त्रिपुटी) निवृत्ती.9) सƒिदानंदरूप – सत्- वस्तुनिरपेक्ष अस्तित्व, चित् – ज्ञेयनिरपेक्ष ज्ञान, आनंद – विषयनिरपेक्ष सुख हेच स्वरूप असलेले. 10) अनादी – ज्याला आदी म्हणजे सुरुवात नाही असे 11) चिरंतन – अंतरहित. इत्यादी इत्यादी.

    बद्ध – मूळ अविद्येच्या आवरण आणि विक्षेप शक्तीमुळे ‘मी ब्रहम आहे’ हे विसरलेला, जगत्सत्यत्व, कर्तृत्व-भोक्तृत्व, भोग, संग आणि विकारभ्रांती असलेला, व्यवहारासक्त.

    भ्रम– भ्रम, अध्यास, विवर्त एकच. भ्रमाचे प्रकार – 1) निरुपाधिक भ्रम – ‘मी अज्ञ आहे, मी ब्रहमाला जाणत नाही’ हा आंतर निरुपाधिक भ्रम तर रज्जज्जूवर साप दिसणे हा बाह्य निरुपाधिक भ्रम. यात भ्रम गेल्यावर भासणारी उपाधी राहत नाही (सर्प ही दोरीची उपाधी आहे). 2) सोपाधिक भ्रम – उपाधीच्या सान्निध्याने जिच्यात बदल (क्षोभ) झाला आहे अशा अविद्येपासून उप्तन्न होणारा आणि उपाधीच्या निवृत्तीने बाधित होणारा भ्रम. मातीचे घटात रूपांतर होते व घट ही मातीची उपाधी होते. भ्रम गेल्यावर घटबुद्धी नष्ट होते पण घट ही उपाधी तशीच राहते. बुद्धी या आंतर उपाधीमुळे ‘मी कर्ता, मी भोक्ता’ इत्यादी प्रकारची जी प्रतीति येते त्याला आंतर सोपाधिक भ्रम म्हणतात. स्वप्नातील वस्तूचे ज्ञान सुद्धा याच प्रकारच्या भ्रमात समाविष्ट आहे. आत्मज्ञानी पुरुषाला आकाशादी बाह्य प्रपंचाचा जो अनुभव येतो तो विक्षेपशक्तियुक्त अज्ञानामुळे येतो. ह्या भ्रमाला बाह्य सोपाधिक भ्रम म्हणतात. ह्या ही ठिकाणी आत्मज्ञाची प्रपंचविषयीची सत्यत्वबुद्धी नाहीशी होते, प्रपंच तसाच राहतो. 3) संवादी भ्रम – भ्रम असूनही अनुकूल फल देणारा. 4) विसंवादी भ्रम – निष्फल भ्रम.

    भक्ती – 1) सगुण परमात्मा व जीव यामधील सकाम व निष्काम प्रेमसंबंध. 2) निर्गुण परमात्म्याशी असलेली तदाकारता/एकरूपता.

    भूमा – भूमन् 1) ब्रहम 2) वैपुल्य 3) व्यापक.

    भान –  भा म्हणजे प्रकाशणे, शोभणे, दिसणे. भान म्हणजे वस्तू असण्याची जाणीव.

    भावरूप – काही काळ ज्याला अस्तित्व आहे असा.

    भेद – विभागणी, भिन्नभाव. मायिक पदार्थात स्वगत, सजातीय, विजातीय असे तीन भेद आहेत. भेद हे सावयव पदार्थात असतात. 1) स्वगत भेद – पदार्थाच्या स्वरूपातील अंतर्गत भेद. झाडाची पाने, फुले, फांद्या इ. झाडातील स्वगत भेद आहे. 2) सजातीय भेद – एकाच जातीच्या दोन पदार्थातीत भेद हा सजातीय भेद. उदा. एका आंब्याच्या झाडासारखे दुसरे आंब्याचे झाड असणे. 3) विजातीय भेद – भिन्न जातीच्या पदार्थातील भेद. उदा. झाड आणि दगड यांच्यातील भेद.

    माया – माया ही ब्रहमाची कल्पित शक्ती आहे. युक्तीपुढे ती टिकत नाही. शक्ती असल्याने ती ब्रहमाहहून वेगळी नाही. ती ईश्वराच्या आधीन आहे, जगाचे उपादान कारण आहे. माया सतासताहहून विलक्षण, अनादी परंतु सांत (अंत असलेली) आहे. माया म्हणजे मा या – मा(जी नाही) या (ती).

    मायेला तिच्या कार्यानुसार निरनिराळी नावे आहेत – 1)प्रकृती – तमोगुणप्रधान, जगाचे उपादान कारण 2) शक्ती – निर्मितीसाठी व नंतरही आवश्यक . अघटित करून दाखविणारी, स्वतंत्र न राहता ब्रहमाच्या आश्रयाने राहणारी. 3)अज्ञान – ब्रहमावर आवरण घालून त्याचे ज्ञान न होऊ देणारी. 4) अविद्या – ब्रहमज्ञानाने नाश पावणारी, ज्ञानाला विरोधी. मी म्हणजे देह असे जिच्यामुळे वाटते ती. 5) प्रधान – अव्यक्त. प्रलयकाली ब्रहमात बीजरूपाने राहणारे.

    मायेची लक्षणे – 1) स्वाश्रया – स्व म्हणजे ब्रहमाला धरून राहणारी, स्वतंत्र अस्तित्व नसलेली. 2) स्वविषया – जी ब्रहमाविषयी सांगते ती. 3) स्वनिर्वाहक –  स्व(ब्रहम)चा निर्वाह करणारी. ब्रहमाविषयी कल्पना करण्यास प्रवृत्त करणारी. माया नसती तर ब्रहमाविषयी कोण बोलले असते? ब्रहम आहे हे तिच्यामुळेच कळते. 4) परनिर्वाहक – स्व हहून पर जे जग त्याची निर्मिती करणारी, देहतादात्म्य, जगत्सत्यत्व, कर्तृत्व-भोक्तृत्व या भ्रांतींची जननी.

    5) प्रतीतीमात्रसत्तावान – जेवढा वेळ अध्यासाचा (जगताच्या) अनुभव असतो तेवढा वेळच सत्ता असणारी. 6) बाधयोग्य – अधिष्ठान ब्रहमाच्या ज्ञानाने बाधित होणारी.

    मीमांसा – निर्णय होईपर्यंत केलेला सखोल विचार, चिकित्सा, षड्दर्शनांपैकी दोन दर्शने – पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा (वेदांत). पहिल्यामध्ये कर्मकांड व दुसर्‍यामध्ये ज्ञानकांडाचे विवेचन आहे.

    मुक्ती – साधक परमेश्वराची ज्या रूपात उपासना करतो, त्या रूपाला तो प्राप्त होतो. साधक भक्ती करतांना स्वतःच्या वेगळ्या अस्तित्वाला जेवढे विसरेल तेवढा तो देवतारूप होईल. कनिष्ठ दर्जाच्या भक्ताला सलोकता म्हणजे आराध्य देवतेच्या लोकात जाऊन राहण्यास मिळते. त्याहहून श्रेष्ठाला समीपता म्हणजे ईश्वराच्या अत्यंत जवळ जाणे ही मुक्ती मिळते. मृत्यूनंतर आराध्य देवतेसारखे रूप होणे ही सरूपता मुक्ती. जगाची उत्पत्ती इत्यादी व्यापार सोडून बाकी सर्व ऐश्वर्य अशा उपासकास प्राप्त होते. स्वतःला विसरून उपास्य देवतारूप होणे ही सायुज्य मुक्ती होय. ह्या चार मुक्तीशिवाय पाचवी सार्ष्ट मुक्तीही कोणी कोणी मानतात.

    मुनी – मननशील असणारा.

    मिथ्या – 1) जे त्रिकालाबाधित नाही ते (सान्त) 2) ज्याच्या ठिकाणी जे नाही ते दिसणे. 3) बाधयोग्य 4) फसवे.

    मोक्ष – कारणासहवर्तमान सकलदुःखनिवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सुखरूप होणे, सुखाने जगणे आणि सुखाने देहत्याग करणे. पुन्हा जन्माला न येणे.

    क्रमश: …..


    हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

    Blog Search