Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

  • No events
  • भक्ती एक परीपूर्ण शास्त्र होय

    Posted on October 12, 2016

    भक्ति हे एक परिपूर्ण शास्त्र आहे हे अनेक उपासक लक्षात घेत नाही. त्यांच्या मताने त्यांना झेपेल व जशी जमेल तशी उपासना ते करतात. त्यामुळे उपासनेचे रूपांतर भक्तीत होऊन त्यापासून मिळणारा आनंद दूर रहातो निर्भयता, तृप्ती, शांती इत्यादीचा अनुभव येत नाही. ह्यामुळे उपासनेला बहुतेकवेळा यांत्रिक कृतीचे किंवा कर्मकांडाचे स्वरूप येते. श्रवणापासून सुरू झालेल्या उपासनेची, आत्मनिवेदनरूप भक्तीत जाणीवपूर्वक परिणती झाली पाहिजे असा सहसा कोणाचाच आग्रह नसतो. भावना व प्रेम हे दोन भक्तीचे आधार असून त्यांना शास्त्राच्या चोकटीत कोंडून ठेवणे व त्यातील अकृत्रिमपणा गमावून बसणे काहींना रुचत नाही. अशा तर्हेरची विधाने ऐकली किंवा वाचली तर प्रामाणिक साधकसुद्धा भक्तीशास्त्राकडे दुर्लक्ष करू शकतो.
    “माझे देवावर प्रेम आहे” असे वाटणे व प्रत्यक्ष प्रेम असणे ह्यात फार तफावत असू शकते. भक्तिशास्त्रात सांगितलेल्या प्रेमाच्या निकषांवर स्वत:चे प्रेम घासून घ्यावयास नको का? ‘मी देवाला शरणागत आहे’ असे समजणे व खरोखर शरणागत असणे ह्यात प्रचंड अंतर असू शकते.
    प्रापंचिक अडचण, दु:खे, अपूर्णता व आशाआकांक्षा ह्यांच्या निमित्ताने सुरू झालेली उपासना ह्याच चक्रव्यूहात अडकून पडते. घरात परंपरेने चालत आलेल्या उपासना भयापोटी चालू ठेवल्या जातात. पुण्यसंचय हाही उपासनेचा हेतू असू शकतो. ह्या सर्वांना भक्तीशास्त्राची जोड नसेल तर त्यांना प्रासंगिक उत्सवाचे व त्या निमित्ताने सर्व कुटुंबिय एकत्र जमण्याचे स्वरूप येते. भक्तीसाठी सर्व काही सोडावे लागते व असा त्याग केलेल्यांच्या कथा वाचून किंवा ऐकून तसेच आपल्याला जमेपर्येंत भक्ति करणे शक्य नाही आसाही निर्णय होऊन जातो. भक्तीचा आचार्य असलेला महान भक्त श्रीहनुमान अत्यंत क्रियाशील होता. ‘खळे गांजिल्या ध्यान सोडून धावे.’ असा त्याचा बाणा आहे. समर्थ रामदास हे महान रमभक्त पूर्णत: कृतीशील होते. महाभक्त श्रीनारदही देवकार्यासाठी त्रिभुवनात संचार करतात. सर्व संतांनी समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले हे का विसरावे? वस्तुत्याग व वस्तूचा संगत्याग ह्यातील फरक शास्त्राशिवाय कोण सांगणार !
    देवावर सामान्य श्रद्धा असणे एवढे तोटके भांडवल भक्तीला पुरत नाही. सामान्य श्रद्धा, प्रेम, निष्ठा, अनन्यता, शरणागती व ऐक्य असा प्रवास व्हावा लागतो. त्यासाठी उपासकाला दृष्य जगतातील अनावश्यक भावनिक गुंतवणूक काढून घ्यावी लागते. हे सांगण्यासाठी भक्तिशास्त्र मार्गदर्शन करते. प्रारब्ध ही जीवसृष्टीचे नियमन करणारी ईश्वरी योजना किंवा व्यवस्था आहे. त्यानुसार जीवन जगत असताना सुखदु:खाचे द्वंद्व अनिवारपणे जीवावर येऊन आदळते. हे प्रहार नगण्य करण्याचे सामर्थ्य अस्सल भक्तीत आहे. ते भक्तिशास्त्राच्या अभ्यासाशिवाय कमाविता येत नाही.
    सगुणोपासना, शक्तीची उपासना व ज्ञानोपासना फलत: एकाच उंचीवर साधकाला घेऊन जातात. त्यामुळे उपासना व परिणामत: भक्ति हे साधन जराही कमी प्रतीचे नाही.
    ज्ञानिये म्हणती स्वयंवित्ती |
    शैव म्हणती शक्ती |
    आम्ही तियेते पराभक्ती |
    आमुची म्हणो || ज्ञानेश्वर.
    साधकाला हे भक्तिशास्त्राने लक्षात आणून दिले असता . तो पूर्ण आत्मविश्वासाने भक्तिसाधना करील. म्हणून फलरूप असलेली भक्ति सर्वश्रेष्ठ साधन आहे असे नारदमुनी म्हणतात.
    सकामतेतून निष्कामता, सगुणाकडून निर्गुण व गौणीकडून पराभक्तीचा प्रवास होणे भक्तीच्या यशासाठी अनिवार्य आहे, हे भक्तिशास्त्राच्या अभ्यासाशिवाय कसे लक्षात येणार म्हणून भागवतशास्त्र, नारद व शांडिल्य भक्तीसूत्र, भक्तिरसायन, गीतेतील भक्तिशास्त्र व संत नामदेवदिकांनी प्रगट केलेले भक्तिवैभव ह्यांच्या सूक्ष्म अभ्यासाने उपासकाला देवापासून विभक्त न राहता भक्त होण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन मिळते. खोगीर, लगाम व रिकिब नसलेल्या भावनेच्या घोडयावर स्वार होणारा सैरभैर पळतो व भक्तिशास्त्राने नियंत्रित भावना हमखास भक्तीकडे घेऊन जातो. त्या भावनेचे रूपांतर स्थिर भावात किंवा प्रेमात होते.
    प्रेम हा शब्द खूपच व्यापक असून त्याला अनेक आयाम किंवा पैलू आहेत. भक्तीची सर्व मदार प्रेमावर असून महत भाग्याशिवाय देवाविषयी प्रेम व नंतर देवाचे प्रेम लाभत नाही. संतांनी देवाकडे सतत प्रेमाची मागणी केली आहे. नाम, रूप, चरित्र, गुण, पराक्रम, भक्तवत्सलता, दया, कृपा इ. देवाच्या संदर्भातील सर्व बाबींविषयी भक्ताचे प्रेम विकसित होणे आवश्यक आहे. अगणित पूर्व सुकृत किंवा चालू जन्मात जाणीवपूर्वक केलेले अथक प्रयत्न हयातून प्रेम निर्माण होते. खुलते व शेवटी ऐक्यात परिणित होते. स्मरण दर्शनादींनी व सतत सहवासाने प्रेम वृद्धिंगत होते. भक्तांच्या सहवासात प्रेमाचं प्रवाह टिकून रहातो. त्याची खोली व वेग वाढून तो देवाच्या स्वरूपसागरापर्येंत लीलया पोहचतो. हीच आत्मनिवेदन भक्ति होय.
    ज्या नारदमुनींच्या नावाने ही सूत्रे ओळखली जातात ते ऐतिहासिकदृष्ट्या ‘अमक्या कुळातील अमुक पुरुष’ अशा रीतीने ओळखता येत नाहीत. ‘देवर्षी’ ही पदवी असलेले श्रीनारद सज्जन व सत्यच्या रक्षणासाठी आणि दुष्ट व असत्याच्या परिपत्यासाठी कळी लावणारे म्हणूनही पुरणग्रंथात प्रसिद्ध आहेत. दुष्टाना अधिक दुर्बुद्धि देऊन त्यांच्या विनाशाची वेळ जवळ आणण्याची त्यांची कामगिरी अजबच म्हटली पाहिजे. नारायणचा अखंड जप प्रसन्न चित्ताने करणारे नारद, महान भक्त आहेत. कोणाही सामान्य माणसाप्रमाणे विषय भोगांकडे मधून मधून प्रवृत्त होऊनही ते भक्तीपासून ढळले नाहीत. ही त्यांची प्रवृत्तीही लोकशिक्षणासाठीच आहे. ब्रहमदेवाचा पुत्र मानले गेलेल्या श्रीनारदांनी वसनांचे निमित्ताने युगायुगात गंधर्वादीकांचे जन्म भोगले. कश्यप व मरीची ह्यांचा पुत्र म्हणूनही श्रीनारद ओळखले जातात. वीणा धारण करणारे, इच्छे प्रमाणे कोठेही प्रगट होऊन गुप्त होणारे, प्रसन्नवदन, चतुर असे हे बहुरंगी व्यक्तिमत्व भारतीयांचे लाडके व्यक्तिमत्व आहे. स्वत: नारद महान विष्णुभक्त असल्याने त्यांच्या भक्तीसूत्रांना अधिकाराचे व अनुभवाचे वजन आहे. प्रत्यक्ष भगवान व्यासांनाही भक्तीचे महत्व समजावून सांगून त्यांच्याकडून भागवत हा महान ग्रंथ लिहून घेण्याचे श्रेय श्रीनारदांकडे जाते.


    हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

    Blog Search