Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

  • No events
  • प्रवृत्ती आणि निवृत्ती

    Posted on July 2, 2016

    प्रवृत्ती आणि निवृत्ती

    म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ति। इयें वोझीं  नेघें मती।

    अखंड चित्तवृत्ती। माझ्या ठायी।। ज्ञाने.12-121।।

                    ज्ञानेश्वरमहाराजांची ज्ञानेश्वरीतील ही एक ओवी आहे. ही ओवी भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून अर्जुनाला उपदेश करताना आलेली आहे. या ओवीचा सरळ  अर्थ असा की “अमुक एका कर्मामध्ये प्रवृत्ती व अमुक एका कर्मामध्ये निवृत्ती झालीच पाहिजे अशा आग्रहाची ओझी तू आपल्या बुद्धीच्या डोक्यावर घेऊ नकोस, तू अखंडपणे आपली चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेव’ येथे अर्थ नीटपणे समजण्यासाठी आधी प्रवृत्ती म्हणजे काय व निवृत्ती म्हणजे काय हे समजावून घेणे आवश्यक आहे. प्रवृत्ती म्हणजे प्रपंचासक्ती. प्रपंचाच्या आसक्तीतून बाहेर पडल्याशिवाय मला सुख मिळणार नाही असा जो विचार आहे, त्याला ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती म्हणतात. वास्तविक हा विचार आणि संन्यास हयात फरक नाही. परंतु या ठिकाणी प्रत्यक्ष विधीवत् संन्यासाश्रम स्वीकारणे अपेक्षित नसून  संन्यस्त वृत्तीने प्रपंचात राहणे अपेक्षित आहे. बुद्धीला प्रवृत्तीचे ओझे  वाटणे शक्य आहे. पण ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीलाही ओझे म्हणतात व या निवृत्तीचे ओझेही बुद्धीवर घेऊ नको असे सांगतात. सामान्यतः माणसाला जेव्हा प्रवृत्तीचा त्रास जाणवायला लागतो तेव्हाच तो निवृत्तीचा विचार करू लागतो. अर्थात हा बदलही सर्वांच्या बाबतीत घडत नाही तर ज्यांना मोक्ष हवा आहे, अशांच्या बाबतीतच घडतो. प्रवृत्ती-निवृत्तीचे द्वंद्व मुमुक्षुंनाच त्रास देते.

             परमार्थशास्त्राप्रमाणे साधकाचा प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती ही त्याला मोक्षाकडे नेणारी हवी. आपण  मुमुक्षू आहोत ही पक्की खूणगाठ मनात असणे आवश्यक आहे. हे विसरल्यास परमार्थ हा फक्त छंद होऊन राहतो आणि शास्त्राला हे अभिप्रेत नाही. परमार्थ हा छंद नसून मोक्षासाठीची वाटचाल आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या वर्णाश्रमाला धरून जे जीवन व्यतीत होते, त्याला प्रवृत्तीलक्षण धर्म व संन्यासाश्रम घेतल्यानंतरचे जे जीवन त्याला निवृत्तीलक्षण धर्म असे म्हणतात.

              समर्थ रामदासस्वामींनी आपल्या एका अभंगात साधकाच्या मनातील द्वंद्वाचे नेमके वर्णन केले आहे. त्यांनी तेथे एक फार सुंदर उपमा दिलेली आहे. ते म्हणतात, “प्रवृत्ती सासुर निवृत्ती  माहेर। तेथे निरंतर मन माझे।। माझे मनी सदा माहेर तुटेना। सासर सुटेना काय करू।।’ येथे ते प्रवृत्तीला सासर व निवृत्तीला माहेर म्हणतात. फार पूर्वपासून सासरचा संबंध दुःखाशी व माहेरचा संबंध सुखाशी जोडण्यात आलेला आहे. या अभंगातून समर्थ आपल्याला निवृत्तीपर माहेर हे सुखाचे कारण आहे असे सांगतात पण तरीही प्रवृत्तीपर सासरमधून सुटका होत नाही व माहेरला जाता येत नाही अशी खंत व्यक्त  करतात.  पुढे ते हे द्वंद्व सुटावयास संतसंगेविण उपाय नाही असे सांगतात.

               ज्ञानेश्वरमहाराज श्रीकृष्णमुखातून अर्जुनाला सांगतात की “स्वतःच्या बुद्धीवर प्रवृत्ती किंवा निवृत्ती यांचे ओझे घेऊ नको’. येथे या दोन्हीचे ओझे वाटण्याची मुळात काय कारणे आहेत हे पाहणे संयुक्तिक  ठरेल. प्रवृत्तीचे म्हणजेच प्रपंचाचे ओझे का वाटते हे पाहताना प्रपंचामध्ये कशाकशाचा समावेश होतो हे पाहणेही आवश्यक आहे. आपला व्यवसाय, घर दार, कुटुंब, समाज या सर्वांचाच प्रपंचामध्ये समावेश होतो. आपल्या विचारासाठी आपण प्रपंचाची विस्तृत कल्पना स्वीकारली आहे. केवळ चार भिंतींमध्ये होणारा प्रपंच यात अभिप्रेत नाही. समाजकारण, राजकारण व इतर सर्व व्यापार, यांना येथे प्रपंच म्हटले आहे. प्रपंचाचे ओझे वाटण्याचे पहिले कारण “मी कर्ता आहे’ ही भूमिका आहे. परमार्थाची वाटचाल करताना “मी कर्ता नाही’ हे वाक्य सर्वांनी पाठ केलेले असते परंतु ते खोलवर रुजले नसल्याने वारंवार सांगावे लागते. “आत्मरूप मी कर्ता नाही तर जीवरूप मी कर्ता आहे’ हा फरक लक्षात ठेवणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी जीव कशाला म्हणतात आणि आत्मा कशाला म्हणतात हेही जाणून घेणे गरजेचे आहे. शास्त्र असे सांगते की जीव हा जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीनही अवस्थांचा भोक्ता आहे व आत्मा हा तीनही अवस्थांचा साक्षी आहे ( त्वं अवस्थात्रयातीतः – श्री गणपती अथर्वशीर्ष). आत्मा या तीनही अवस्थांच्या पलिकडचा आहे व मी आत्मा असल्याने मीही तिन्ही अवस्थांच्या पलिकडचा असणे आवश्यक आहे. आपल्यामध्ये “मी कर्ता, मी भोक्ता’ ही भूमिका खोलवर रुजलेली असते व त्यामुळेच आपण सर्व दुःख व ओझी स्वतःवर लादून घेतो.

             शास्त्र  सांगते, की साक्षी असणारा खरा मी कर्ताही नाही व भोक्ताही नाही. शास्त्र जे सांगते ते प्रमाण आहे ही श्रद्धा बाळगून त्यानुसार आचरण करणे याला विवेक म्हणतात. हया विवेकाचा विचार सतत जपणे हा साधनेचा महत्वाचा भाग आहे. हा विचार सुटला तर साधना ठोकळेबाज होते. सकाळ संध्याकाळ माळ जपणे, पोथ्या वाचणे, तीर्थयात्रा करणे अशी साधना चालू राहते. अर्थात ही साधना नाही असे नाही. या सर्व गोष्टी जर निष्कामपणे केल्या तर चित्त शुद्ध होईल हे नक्कीच, पण वस्तूची प्राप्ती होणार नाही. ही सर्व साधने काही एक मर्यादेपुरतीच उपयोगी आहेत. आचार्यांनी त्यांच्या विवेकचूडामणी या ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे की “वस्तुसिद्धीर्विचारेण न किंचित् कर्मकोटिभिः।’ वस्तू म्हणजे सत् तÎव, ब्रहम. मी ब्रहम आहे हा अनुभव केवळ विचाराने येणारा आहे. कोटी कोटी कर्म करूनही तो कधी येणार नाही. आणि या ठिकाणीच साधकांची फार अडचण होते. एखादे व्रत-वैकल्य, उपासना, जप असे काहीतरी करावयाची साधकांची तयारी असते. फक्त विचार करावयाची व तो जपण्याची तयारी नसते. वस्तुतः विवेकाचा विचार सतत जपला तर प्रपंचाचे ओझे वाटणार नाही. जीव कर्ता असल्याने कर्माचे कर्तृत्व जीवाचे आहे व मी आत्मा असल्याने ते माझे नाही, हे सतत लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा वारंवार पाठांतर करूनही जर कर्माचे कर्तृत्व घेतले तर माझा प्रपंच चांगला झाला, बिघडला, वाईट झाला, इत्यादी यशापयशाचे ओझे तयार होते किंवा प्रपंच असाच करेन, असा करणार नाही इत्यादी प्रकारचा आग्रह तयार होतो. हे कर्तृत्व जीव स्वतःवर लादून घेतो. साक्षित्व राखले तर प्रपंचाचे ओझे वाटण्याचे कारण उरणार नाही.

             “आत्मा कर्ता नाही आणि जो अकर्ता असतो तो कधीच भोक्ता नसतो’ असे शास्त्र सांगते. शास्त्रावर परिपूर्ण श्रद्धा ठेवणे नेहमी हिताचे असते कारण शास्त्र आपल्या हिताचाच उपदेश करते. शास्त्राला आव्हान दिल्याने परमार्थ थांबतो. शास्त्र म्हणजे परोक्षज्ञान. त्याची पूर्णपणे माहिती करून घेणे आवश्यक आहे व फळ मिळाल्यानंतर शास्त्र विसरणेही आवश्यक आहे. वेदान्तशास्त्र, गीताशास्त्र, ब्रहमसूत्र, उपनिषदे, संतवाड्ग्मय वगैरे सर्व ग्रंथ विचार कसा करावा ते शिकवितात. ती मोक्षाची साधने आहेत, मोक्ष नाहीत. शास्त्र विसरले नाही तर मनुष्य शास्त्री बनून राहतो. शास्त्राचा नियम आहे की शास्त्राचे फळ मिळाल्यावर ते विसरले पाहिजे, कारण फळ मिळेपर्यंतच त्याचा उपयोग आहे. अर्थात फळ मिळाल्यानंतर साधकाला शास्त्राचा उपयोग नसला तरी मागून येणार्‍यांसाठी ते जतन करून ठेवणे आवश्यक आहे, हेही तितकेच खरे आहे.  शास्त्र सांगते की आत्मा कर्ता नाही व तू आत्मा आहेस.  शास्त्रावर शंभरटक्के श्रद्धा ठेऊन आपण निर्णय करावयास हवा की मी कर्ता नाही. जोपर्यंत अनुभवाने आत्म्याची झलक मिळत नाही तोपर्यंत शास्त्रावरील शंभर टक्के श्रद्धेशिवाय  आपल्याजवळ दुसरा उपाय नाही. श्रीज्ञानेश्वरमहाराज ग्वाही देतात की कर्तेपणाच्या भावनेतून निर्माण झालेले हे प्रपंचाचे ओझे उतरवून टाकले, की अखंड चित्तवृत्ती त्या परमात्म्याच्या ठिकाणी ठेवण्यास निश्चित मदत होईल.

            प्रपंचाचे ओझे वाटण्याचे दुसरे कारण म्हणजे “हे जग सत्य आहे’ ही धारणा. परमार्थ असे सांगतो की जग कल्पित आहे, मायिक आहे. जगात घडणारी प्रत्येक घटना जर सत्य वाटत असेल तर जग सत्य वाटते असे समजावयास हरकत नाही. घटनेची सत्यता वाटते किंवा नाही हे स्वतःच्या त्याविषयी होणार्‍या प्रतिक्रियेवरून ठरवावयाचे असते. प्रतिक्रिया तीव्र असेल तर जग सत्य वाटते असे समजावयाचे. घटनेची सत्यता वाटेनाशी झाली की तीव्रता क्षीण होत जाते व तीव्रता कमी झाली की चित्तवृत्ती भगवंताच्या ठायी ठेवण्यास मदत होते. जग फार निष्ठुर आहे, कठोर आहे असे वाटणे म्हणजेच जग सत्य वाटणे होय. जग मिथ्या आहे असे पटले तर जगातील सर्व व्यवहार मिथ्या ठरतात. पण प्रश्न येतो की जग प्रत्यक्ष समोर दिसत असताना ते मिथ्या कसे? याला शास्त्र उत्तर देते की ते सत्-असत्-विलक्षण अनिर्वचनीय असे आहे. म्हणजे, ते सत्य म्हणावे तर ते सत्य नाही कारण जे त्रिकालाबाधित असते त्यालाच फक्त सत्य म्हणतात. जग काही कोटी वर्षांपूर्व नव्हते, आज ते दिसते व पुढे काही कोटी वर्षांनी ते नसणार आहे. म्हणजे जग हे त्रिकालाबाधित नाही. जग जर असत् म्हणावे तर ते प्रत्यक्ष अनुभवाला येते. असत् म्हणजे जे कधीच अस्तित्वात नसते ते. जग आज आपल्याला दिसत आहे, म्हणजे ते  असत्ही नाही. ते सत्पेक्षा वेगळे व असत्पेक्षा वेगळे असे  सत्-असत्- विलक्षण व म्हणून अनिर्वचनीय आहे, म्हणजेच मिथ्या आहे. अशा प्रकारे शास्त्राचा आधार घेऊन हे जग मिथ्या आहे हा विचार आपण अंगी बाणवला तर प्रपंचाचे ओझे वाटणार नाही. याचा अर्थ प्रपंचात आपल्या वाटçाला आलेल्या जबाबदार्‍या टाकून पळायचे, असा नाही. संत असे सांगतात की जगासंबंधी मिथ्यात्वबुद्धी ठेऊन जबाबदार्‍या पार पाडता येतात. आपल्या संस्कृतीनुसार आपल्यावर कुटुंबाचे, समाजाचे, जगाचे इत्यादी सर्वांचे ऋण असते व ते फेडणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ऋणाची कल्पना सेवेच्या कल्पनेपेक्षा अधिक योग्य आहे. कारण सेवा म्हटले की त्यात मोबदल्याची अपेक्षा असते. ऋण फेडण्यामध्ये परतीची अपेक्षा नसते, ती आपली जबाबदारी असते.

            प्रपंचाचे ओझे वाटण्याचे तिसरे कारण, “मी देह आहे’ ही भूमिका आहे. “मी देह आहे’ या विचाराला इतकी सहजता आलेली आहे की साधुसंतांनी सांगितल्याशिवाय “मी देह नाही’ असे आपल्याला कळतही नाही. आपण “मी देह आहे’ या अज्ञानात जगत असतो.  वस्तुतः “मी ब्रहम आहे’ हे देखील ठसवून घेऊन विसरावयास हवे. याला ज्ञानाची सहजता म्हणतात. अज्ञानाच्या सहजतेतून ज्ञानाच्या सहजतेकडे जाण्याचा जो प्रवास आहे, त्याला साधना म्हणतात. साधनेची ही विस्तृत व्याख्या आहे. साधनेची ही विशिष्ट व्याख्या नीट लक्षात घेतली नाही तर आपण आपल्या समजुतीनुसार साधन करीत राहतो व तेच बरोबर आहे अशा गोड गैरसमजुतीत राहतो.

            आपण प्रवृत्तीच्या ओझ्याची तीन प्रमुख कारणे पाहिली. ती अनुक्रमाने मी कर्ता आहे, जग सत्य आहे व मी देह आहे, अशी आहेत. ओझे उतरविण्यासाठी ही सर्व कारणे हळूहळू दूर करणे आवश्यक आहे. या कारणांमुळेच पुनर्जन्माचा रोग होतो. ही ओझी उतरवणे हे या रोगावर औषध आहे पण त्याचा परिणाम सावकाश होतो.

             “प्रवृत्तीतून बाहेर पडल्याशिवाय माझी साधना होणार नाही’ असे वाटणे हे निवृत्तीचे ओझे आहे. हे ओझे घालवायला फार प्रयत्न लागत नाहीत. प्रवृत्तीचे ओझे कमी झाले की निवृत्तीचे ओझे आपोआपच कमी होते. पण ही निवृत्ती विवेकासह  येणे आवश्यक आहे. “मी कर्ता नाही’, “जग सत्य नाही’ व “मी देह नाही’ हा विवेक आहे. तसेच “मी साक्षी आहे’, “हे जग मिथ्या आहे’ व “मी ब्रहम आहे’ हा विवेक आहे. विवेकाने जी निवृत्ती येईल ती सहज सुखाची, शुद्ध, शांत निवृत्ती असेल व त्या निवृत्तीचे ओझे वाटणार नाही. विवेकाशिवाय आणलेल्या निवृत्तीचे ओझे होते. कारण तेथे जगतसत्यत्व व देहतादात्म्य गेलेले नसते. साधनेची व मोक्षाच्या आनंदाची ओढ तर निर्माण झालेली असते व त्यामुळे प्रवृत्तीतून बाहेर पडावेसे वाटते. जबाबदार्‍यातून बाहेर पडणे शःय नसते, पण हया बाहेर पडण्याच्या इच्छेचेच ओझे होऊन बसते. त्यामुळे प्रवृत्तीतून विवेकाने बाहेर पडले की निवृत्तीचे ओझे आपोआपच उतरते. प्रवृत्ती आणि निवृत्ती ही दोन्ही ओझी  जर उतरवून ठेवली तर आपण प्रपंचात असूनही आपली चित्तवृत्ती प्रपंचातून मोकळी झाली असल्याने परमार्थासाठी उपलब्ध असते. याला संगत्याग म्हणतात. त्यासाठी व्यवहार सोडण्याची गरज राहत नाही. व्यवहारात काहीही बदल न करता आपल्या वाट्याला आलेली सर्व प्रकारची कर्तव्ये व्यवस्थित पार पाडून चित्तवृत्ती अखंडपणे भगवंताच्या ठिकाणी ठेवता येते.

           ज्याच्या ठिकाणी चित्तवृत्ती अखंड ठेवायची त्याचे स्वरूप ओळखणेही आवश्यक आहे. स्वरूपाची ओळख पटली नाही तर त्याच्याच ठिकाणी चित्तवृत्ती का ठेवायची असा प्रश्न पडू शकतो. कारण कळल्याशिवाय कुठलीही गोष्ट करणे कठीण जाते. म्हणून ज्याच्या ठिकाणी चित्तवृत्ती ठेवायची, त्याचे  स्वरूप कळणे, त्याचे व आपले नाते कळणे व नाते कळल्यानंतर पुढे त्यादृष्टीने केलेल्या साधनेचा काय परिणाम होणार आहे, हे देखील माहित असणे आवश्यक असते. हे नाते असे आहे की वास्तविक ज्याच्या ठिकाणी अखंड चित्तवृत्ती ठेवावयाची, ते नित्य निवृत्त ब्रहमच मी म्हणजे जीव आहे, परंतु अज्ञानामुळे  त्या स्वरूपाचे विस्मरण होते. या विस्मरणातून बाहेर पडावयाचा एकच उपाय आहे व तो म्हणजे स्मरण.  मुळचा तोच  मी असताना मी स्वतःला शरीर समजतो आहे. हा भ्रम जावा म्हणून चित्तवृत्ती त्याच्या पायी ठेवायची. तो श्रीकृष्ण ब्रहमरूप आहे व हा जीव त्या ब्रहमाचा अंश आहे. त्याचा अंश असल्याने जर जीवाला ब्रहमस्वरूपात जाऊन मिसळायचे असेल तर त्या श्रीकृष्णाच्या अनुसंधानात राहिले पाहिजे. आपण पूर्व कसे होतो, कोण्या कारणाने काय बिघडले व बिघडण्याचे परिणाम काय झाले हे सर्व जाणून घेतले तर भगवान श्रीकृष्णाशी नाते जोडल्याशिवाय मी आनंदरूप होणार नाही याची खात्री होते. म्हणून अखंड त्याच्या अनुसंधानात  राहायचे.

             ही सर्व कारणमीमांसा शास्त्रकार, सद्ग्रंथ आणि श्रीगुरू आपल्याला समजावून सांगत असतात. माझा मूळचा ब्रहमभाव सोडून मी जीवभाव पत्करला हेच मूळ बिघडणे आहे. याला अधःपतन म्हणतात. मूळचा मी जो आहे (श्रीकृष्ण) त्याचे स्मरण राहावे आणि माझी चित्तवृत्ती अखंड त्याच्या ठायी राहावी यासाठी श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात,

    म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती। इये ओझी ने घे मती।

    अखंड चित्तवृत्ती । माझ्या ठायी।।


    हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

    Blog Search