Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

  • No events
  • मोक्षेच्छा-१

    Posted on July 12, 2016

    मोक्षेच्छा

     

    मानवी जीवनाचे परम उद्दिष्ट चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती हे आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या  चार पुरुषार्थांच्या चौकटीत जीवनाची यशस्विता सामावली आहे. “धर्म’ हा आद्य पुरुषार्थ असून “मोक्ष’ हे अंतिम प्राप्तव्य आहे. धर्माच्या बंदिस्तीत मिळविलेले काम व अर्थ मोक्षाकडील प्रवास सुकर करतात. साधनचतुष्टयसंपन्न जीवच मोक्षाचा अधिकारी असतो. आतापर्यंत आपण विवेक, वैराग्य व शमादिषट्क या तिघांचा विचार केला. मोक्षेच्छा किंवा मुमुक्षुत्व हा यातील चौथा घटक आहे. मोक्षाची इच्छा असणे म्हणजे मुमुक्षूत्व होय. अशालाच ब्रहमज्ञान सांगावे असे श्रीशंकराचार्य उपदेशसाहस्रीत म्हणतात.

    मोक्ष म्हणजे काय? बंधन म्हणजे काय? मुमुक्षुत्वाची आवश्यकता कशासाठी? ज्ञान कशाला म्हणतात? इत्यादी प्रकारे आपल्या मनात प्रश्न उठवतात. आपल्याला मोक्षाची आवश्यकता नाही असे ज्यांना वाटते, त्यांना हे प्रश्न पडतच नाहीत परंतु साधकावस्थेतील साधनचतुष्टयांतील या शेवटच्या टप्यापर्यंत जो साधक पोहोचलेला आहे, त्याला पुढचा प्रवास निःसंदिग्ध होण्यासाठी त्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. त्याशिवाय साधकाला निश्चित व शांत मनाने आणि परिपूर्ण श्रद्धेने मोक्षाचा अनुभव घेता येणार नाही.

    “सुख पाहता जवापाडे। दुःख पर्वताएवढे।’ असे त्या संसाराचे स्वरूपच असल्याचे श्रीतुकाराममहाराज म्हणतात. संसार सुखाचा होण्यासाठी आयुष्यभर सर्व व्यवधाने सांभाळून, अनेक पद्धतीने प्रयत्न करून, उलटसुलट आघात सोसून, बरीवाईट फलप्राप्ती मिळून शेवटी अनेक दुःखे वाटयाला येतातच व चटके बसतातच. कोणत्याही प्रकारे कायम सुखाची सोय होत नाही. तेव्हा मनात असा विचार येतो की  जीवन असेच असेल तर त्यातून मुक्त व्हावे व पुन्हा जन्माला येऊ नये. ज्याच्या मनात असे विचार येतात व त्या विचारांचे निश्चयात रूपांतर होते, त्याला “मुमुक्षू’ असे म्हणतात. दुसरा मुख्य भाग असा की जे ज्ञान प्राप्त झाल्यावर जीवनात पुन्हा तडाखे, दुःखे इत्यादींचा त्रास होणार नाही, त्यांचा शीण परत वाट्याला येणार नाही,  ते ज्ञान मिळविण्यासाठी जो प्रयत्नशील असतो, त्याच्या जवळ मुमुक्षुत्व आहे असे म्हणण्यात येते.

    काही लोकांचा असा प्रश्न असतो की जीवनात थोडेबहुत सुखही मिळतेच. मग पुन्हा जन्माला न येण्याचा एवढा हट्ट का?

    मानवी जीवनात क्लेश, शारीरिक यातना, मानसिक आंदोलने असे अनेक विपरीत प्रसंग येतात. वारंवार जन्माला येऊन दुःखाचे आघात सहन करीत जीवन कसेबसे घालविणे यात पुरुषार्थ नाही. पण अनेकजण हे दुःखाचे आघात सहन करण्यातच पराक्रम मानतात. अशा लोकांसाठी परमार्थ नाही. हात पोळणे, स्कूटर घसरून जखमी होणे अशासारख्या दुःखांच्या फारच किरकोळ बाबी आहेत. पण मानवी जीवनात अनुभवाला येणार्‍या यापेक्षाही फार मेाठे नुकसान, क्लेश,  इत्यादी दुःख देणार्‍या अनंत घटना आहेत. त्या नाईलाजाने सोसण्यात व अनंत जन्म तेच करीत राहण्यात जर अभिमान, पराक्रम वाटत असेल तर अशा लोकांनी परमार्थाच्या वाटयाला न जाणे योग्य. अशांना परमार्थात कोणतेही स्वारस्य  नसते.  या संदर्भात तुकाराममहाराजांचा एक अभंग लक्षात घेण्यासारखा आहे. ते म्हणतात, “किती वेळा जन्मा यावे। किती व्हावे फजित।’ त्याच त्या चुका सारख्या करून परत परत त्रास व नुकसान सोसणे हे फजितखोराचे लक्षण आहे. इतकी युगे जन्म घेत राहून मोठी चूक केली. आता तरी शहाणे होणे जरूर आहे.

    भगवद्गीतेतील सोळाव्या अध्यायातील “र्‍ही’ या शब्दावर ज्ञानेश्वरमहाराजांनी फार सुंदर भाष्य केले आहे. ते म्हणतात,

    हे बहु असो देहपणे। नावारूपासि येणे।

                    नाही लाजिरवाणे। याहूनि।।

    या संसारात वारंवार जन्माला येणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. श्रीसमर्थ म्हणतात,

    तैसा संसारें दुःखवला। त्रिविधतापें पोळला।

                    तोचि येक अधिकारी जाला। परमार्थासि।। (दास.3-6-7)

    त्रिविधताप ज्याने आयुष्यभर सोसले आहेत, त्याला परत तेच सारे सोसायची लाज वाटते व अक्षय आनंदाची खरी ओढ लागते. यामुळे  तो परमार्थाचा अधिकारी होऊ शकतो. जन्माला पुन्हा पुन्हा न येण्याचा आग्रह केवळ संतांचा नाही. विचाराने हे स्वतःलाच पटले पाहिजे. अक्षय आनंदासाठी मला मोक्ष हवाच, हा आपला स्वतःचा आग्रह झाला पाहिजे.

    मोक्ष म्हणजे मुक्तता. बंधन असेल तरच मुक्त होता येते. यासाठी बंधनाचा विचार करताना बंधनाचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे. मुळात आपण बंधनात आहोत ही जाणीव सामान्य माणसाला नसते. संत ते आपल्या लक्षात आणून देतात. त्याचे स्वरूप सांगतात. बंधन जर सत्य असते तर ते कधीच सुटले नसते. ज्या अर्थ बंधन सुटते त्या अर्थ ते त्रिकालाबाधित सत्य नाही. म्हणजेच ते कल्पित आहे. बंधन ही मोक्षसापेक्ष कल्पना आहे. ही कल्पनाच जर विचाराने निघून गेली तर मुक्ती ही कल्पनादेखील शिल्लक राहणार नाही. सहज आनंदाची स्थिती प्राप्त होईल. परंतु सामान्य जीवाला याची यत्किंचितही जाणीव नसते. संयुक्त कुटुंबातून निघून विभक्त होणे, स्वतंत्र व्यवसाय सुरू करणे यासारख्या केवळ आर्थिक व भौतिक वस्तूंपुरतीच त्यांची स्वातंत्र्याची कल्पना मर्यादित असते. परंतु हे स्वातंत्र्य  अगदीच किरकोळ आहे. अचूक विचार केला तर या व्यवहारात देखील आपण खर्‍या अर्थाने स्वतंत्र नसतो. आपले स्वातंत्र्य अनेकांवर अवलंबून असते. आपले पारतंत्र्यही आपल्याला कळत नाही ही मुख्य अडचण आहे.

    उत्तरेकडे “महामंडलेश्वर’ अशी एक पदवी आहे. त्या पदवीच्या आधी “सर्वतंत्रस्वतंत्र’ हे विशेषण लावतात. कारण ही पदवी ज्याला दिली जाते, ती व्यक्ती ब्रहमविद् असल्याने ब्रहमच असते. “ब्रहमविद् ब्रहमैव भवति ‘ हे उपनिषदात सांगितलेले वचन त्यांना लागू पडते. “ब्रहमानंदे सदा डुल्लतु’ अशी त्या व्यक्तीची स्थिती व्यक्त करण्यासाठी ही बिरुदावली लावतात. सर्व सृष्टीचे व्यवहार ब्रहमाच्या अधिष्ठानावर चालतात. “ब्रहमाच्या भीतीने वायू वाहतो, सूर्य प्रकाशतो, यमदेव आपले काम करतो, योग्य वेळ येताच जीव पंचभौतिक शरीर त्यागतो. म्हणजेच सर्व सृष्टीची नियामक सत्ता ब्रहम आहे. ते कोणाच्याही तंत्राने चालत नाही तर त्याच्या तंत्रानुसार सर्व सृष्टीचक्र फिरते. म्हणून ते खर्‍या अर्थाने स्वतंत्र आहे. जो ब्रहम जाणतो तोही तसाच स्वतंत्र असतो. त्याला वेद कोणताही अमुक एका पद्धतीने वागण्याविषयी विधी सांगत नाहीत. खर्‍या अर्थाने तो बंधनातून मुक्त असतो. तो मुक्त असतो पण स्वैर नसतो हेही लक्षात ठेवावयास हवे.

    बंधनाच्या स्वरूपाची चर्चा करताना ते बंधन सत्य की असत्य असा व्यावहारिक भाषेत शब्दप्रयोग करतात. शास्त्रीय भाषेत ते “वास्तव की कल्पित असा विचार असतो. संत तुकाराम महाराज “सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। ‘ असे म्हणतात. कारण विठ्ठल ब्रहमरूप असल्यामुळे तो त्रिकालातीत आहे, सद्रूप आहे. संतही असेच असतात. गीतेत म्हटले आहे,

    नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः।

                    उभयोरपि दृष्टोन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः।। 2-16।।

    बंधन जर त्रिकालाबाधित असते तर ते सुटणे शःयच झाले नसते. ज्या अर्थ संत, शास्त्र,  भगवंत, सद्गुरू हे सगळे सांगतात की बंधन सुटणे शःय आहे, व तसा अनेकांचा अनुभव आहे, त्या अर्थी त्यांचे सांगणे खरे आहे व बंधन हे कल्पितच आहे. जर बंधन सुटण्यासारखे नसते तर परमार्थशास्त्रच कुचकामी ठरले असते. समर्थांची या बंधनाबद्दल एक फार सुंदर ओवी आहे

    हस्त बांधिजे उर्णतंते। लोभे मृत्य भ्रमराते।

                    ऐसा जो प्रपंची गुंते। तो येक पढतमूर्ख।। दा.बो. 2-10-16।।

    कोण्याच्या धाग्याने हत्तीला बांधले तर तो बांधला गेला असे होणार नाही. कारण बलाढ्यहत्तीला कोण्याच्या धाग्यासारख्या नाजून धाग्याने बांधणे शःयच नाही.  हे बंधन जसे निरर्थक आहे त्याचप्रमाणे जीव जन्ममरणाच्या चक्रात बांधला गेला आहे असे म्हणणे निरर्थक आहे. हत्तीच्या नुसत्या अंग हलविण्याने जसे कोळ्याचे जाळे तुटून जाते त्याप्रमाणे माणसाने केवळ बंधन कल्पित असल्याचा निश्चय करण्याचाच अवकाश, तो मायेच्या बंधनातून सहज सुटतो. तुकाराममहाराज सांगतात, “थोडे आहे थोडे आहे। चित्त सात्य जालिया।’ हे साहायय घेणे माणसाच्या स्वाधीन आहे. शास्त्र , संत व श्रीगुरू वारंवार हे अवलक्षणी पारतंत्र्य टाकून मूळ “सुखरूप’ स्वरूप प्राप्त करून घ्यावे असे मार्गदर्शन करीत असतात परंतु भ्रमाने जीवाला ते कल्पित बंधनसुद्धा सत्य वाटते. माणूस अनेक जन्मांच्या संस्कारांमुळे मी म्हणजे देह, मी म्हणजे प्राण यासारख्या कल्पना करून नसलेले बंधन स्वतःवर लादून घेतो. या कल्पनांमुळे अनेक वासनांचे जाळे तयार होते व त्यात तो अडकतो. त्या वासना सदाचाराने, सद्विचाराने व सत्संगाने क्षीण होऊ लागतात. असे वागण्याचे व मुक्त होण्याचे स्वातंत्र्य नरदेहात आहे. त्यासाठी योग्य दिशेने विचार मात्र करावा लागतो. परमार्थ हे विचाराचे शास्त्र आहे. विचारानेच बंधनातून सुटता येते. याची प्रचिती अनेकांनी घेतली व ते बंधनमुक्त झाले. संतांनी हे हर प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हा उपदेश सामान्य लोकांना आकलन होत नाही कारण शास्त्र  जाणून घेण्याची त्यांच्या बुद्धीची झेप नसते. शास्त्र कळत नसेल तर संत, सद्गुरू यांच्या वचनांचा आधार घेता येतो. पण हे सर्व सतत उपलब्ध असूनही सामान्य माणसाला मुक्त होण्याची इच्छा तर होतच नाही उलट बंधनातच राहावेसे वाटते. इतकेच नव्हे तर माझ्यासारखा श्रीमंत मीच, मी बुद्धिमान, मी ज्ञानी, प्रतिष्ठित, सत्ताधीश इत्यादी स्वतःविषयी अनेक प्रतिमा दुसर्‍यासमोर उभी करण्याच्या दांभिकपणात स्वतःच्या नगण्य अस्तित्वाला माणूस कुरवाळीत बसतो आणि आनंदाऐवजी दुःख मिळवतो. यासारखी केविलवाणी अवस्था दुसरी नाही असा परमार्थशास्त्राचा विचार सांगतो.

    क्रमश: ….


    हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

    Blog Search