Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

 • No events
 • मोक्षेच्छा-२

  Posted on July 11, 2016

  मोक्षेच्छा

  परमार्थ हे कृतिपेक्षा विचारांचे शास्त्र आहे. भगवान शंकराचार्यांनी “वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित् कर्मकोटिभिः।’ असे सांगितले आहे. माणूस कृतिशील असतो. पण कर्मामागचे वर्म समजून घेऊन कृती घडली तरच विचार बदलतात. आत्मानुभूती घेण्यास अंतःकरण सक्षम होते. ही संस्कारक्षमता प्राप्त करून घेण्यासाठी तीर्थयात्रा, व्रते, पारायणे, पूजा, नामस्मरण इत्यादी साधने आहेत. परंतु त्यांचे चित्तशुद्धी व चित्तशांती एवढेच फळ आहे. ज्ञानाच्या विचारासाठी अंतःकरण परिपक्व करणे हा त्यांचा उपयोग आहे. “तीर्थव्रती भाव धरी रे’ असे हरिपाठात सांगितले आहे. घनदाट भरलेला हरी दिसण्यासाठी, सत्संगलाभासाठी व इंद्रियांची सुखलोलुपता कमी करण्यासाठी तीर्थयात्रा करणे, तसेच शमदमादी साधणे आवश्यक आहे. पण ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली नाहीत तर तीर्थयात्रा हा केवळ शीण होईल व जर उद्दिष्टे समोर ठेऊन ही सारी साधना केली तर एक वेळ अशी येईल की अशा साधनांशिवायही अंतःकरण शांतपणे हरिकीर्तनात रंगेल. मन अनुकूल-प्रतिकूलांच्या तडाख्यांनी क्षुब्ध होणार नाही, मी-तूपणाची बोळवण होईल. असे आनंदाच्या डोहात आनंदरूप होऊन राहणे हे मानवी जीवनाचे साध्य आहे. यासाठी सुरुवातीपासूनच परमार्थाचा अर्थ समजावून घेऊन आपल्या वेळेचे व विचारांचे नियोजन करणे आवश्यक असते. फक्त विचारानेच मोक्ष मिळतो व त्या विचारांची दिशा वेदान्तशास्त्राने कळते. विचाराशिवाय आयुष्यभर साधना केल्यानंतरदेखील जर अंतःकरण क्षुब्ध होतच राहिले तर आपली चूक लक्षात न घेता परमार्थशास्त्रातच काही अर्थ नाही असा निष्कर्ष काढला जातो.

  म्हणून सर्व साधना जाणून घेऊन, आनंदरूप मोक्षासाठी करावयाच्या. त्या साधना म्हणजे नेमके आचरण व विचार. यात अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ नवविधा भक्ती, तीर्थयात्रा, संतसंग इत्यादी. या सर्व किती काळ करायच्या हा प्रश्न येतो. अंतःकरण शुद्ध होईपर्यंत या गोष्टी कराव्यात असे शास्त्र सांगते. आत्मानुभूतीचा संस्कार घेण्याइतके अंतःकरण शुद्ध झाले, शांत झाले की या पूर्वतयारीच्या साधनांचे काम संपते. आपल्या अंतःकरणावर अनेक विषय, घटना, व्यक्ती आणि या सर्वांच्या उलट सुलट स्मृती यांचे ओरखाडे असतात त्यामुळे वेदान्तशास्त्रतील विचारांचा संस्कार अंतःकरणावर उमटतच नाही. ज्याप्रमाणे कोर्‍या कागदावर हलकी ओढलेली रेषसुद्धा उमटते त्याप्रमाणे अंतःकरण संस्कारक्षम झाले की आत्मानुभवाचा संस्कार सहज उमटतो. हे सर्व संत समजाऊन सांगतात. म्हणूनच “संतांचे संगती मनोमार्गगती। आकळावा श्रीपती येणे पंथे।।’ असे श्रीज्ञानेश्वरमाऊलीने हरिपाठात सांगितलेले आहे. हे सारे अंतःकरण शुद्ध झालेले असेल तरच शःय आहे. समर्थ म्हणतात,

  सगुणाचेनि आधारें। निर्गुण पाविजे निर्धारें।

                  सारासार विचारें। संतसंगें।। दा.बो. 6-6-55

  या दोन्ही ठिकाणी संतसंगाचे अपार महत्व सांगितले आहे. सार आणि असार ज्या विचारांनी समजते असे वाL्मय संतांनी उपलब्ध करून ठेविले आहे. ही सामग्री सतत वापरणे हे विवेक जागा असल्याचे लक्षण आहे. विवेकाधिðित आचरणामुळे एक उत्कृष्ट दर्जेदार जीवन जगता येते आणि ते मोक्षाच्या दिशेने अग्रेसर असते. शुद्ध विचार हे त्यासाठी  साधन आहे

  साधने दोन प्रकारची असतात. दूरान्वयाने जे साधन अनुकूलता निर्माण करून देते ते बहिरंग साधन व प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी जे साधन उपयोगी पडते ते अंतरंग साधन होय. बहिरंग साधनात शमदमादी आतापर्यंत पाहिलेली सर्व साधने येतात. नंतर त्याहून थोडा अंतरंग असणारा श्रवण, मनन व निदिध्यासन हा प्रत्यक्ष साधनाचा भाग येतो. खरे अंतरंग साधन म्हणजे तत्वपदार्थशोधन व सोहं हे आहे. त्यासाठी मात्र फक्त विचार लागतो.

  अनुभव येण्यास काही अडचणी येतात. तत्त्वंपदार्थशोधन म्हणजे काय, सो@हं म्हणजे काय हे कळले तर त्या काही प्रमाणात दूर होतील. त्यांचा विचार हवा. आपले स्वरूप मुळचे आनंदघन असताना आपल्याला दुःख, शोक, भय इत्यादी विकार होतात. त्या विकारांशी आपण तादात्म्य पावून दुःखी होतो. याला कारण स्वस्वरूपाचे अज्ञान हे होय. हे अज्ञान अंतरंगसाधनेने जाते. या अंतरंगसाधनेला सुरुवात करताना तत्, त्वम् व असि या पदांचा अर्थ समजावून घ्यायला हवा तरच तत्वपदार्थशोधन करता येईल. ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात,

  येथ अविद्यानाशु हें स्थळ। तेणें मोक्षोपादान फळ।

                  या दोही केवळ। साधन ज्ञान।। ज्ञाने. 18-1243।।

  सच्चिदानंद हे आपले स्वरूप असतांना देहालाच स्वरूप समजून त्याच्यासंबंधी असलेले विचार स्वतःवर लादून घेणे यालाच “अविद्या’ किंवा बंधन असे म्हणतात. त्याची निवृत्ती करावयाची असेल तर वेदान्तशास्त्रानुसार विचार हवा. यासाठी बंधनाचे स्वरूप पाहू.

  तीन प्रकारच्या भ्रांतीत अडकणे हेच बंधन आहे. भ्रांती म्हणजे जसे आहे तसे न कळता त्याहून विपरीत ज्ञान होणे. हा भ्रम असल्याने तो कल्पित आहे हे निश्चित. म्हणून बंधन कल्पितच आहे व ते त्या वस्तूबद्दल ज्ञान झाले की नाहिसे होते. या भ्रांती मुख्यत्वाने तीन प्रकारच्या आहेत. 1) देह सत्यत्व भ्रांती – मी म्हणजे माझा देह अशी समजूत असणे हे तिचे स्वरूप आहे. 2) जगतसत्यत्व भ्रांती – भोवतालचे जग सत्य आहे. व 3) कर्तृत्वभोगतृत्व भ्रांती – मी कर्ता असून जग हे माझे भोग्य आहे. या भ्रांतीतून बाहेर पडण्याचा विचार वेदान्तशास्त्र, संत व श्रीगुरू सांगतात.

  1) देहसत्यत्व भ्रांती – चार देह व त्यात राहात आहे असे वाटणारा आत्मा यांचे स्वरूप कळले की देहसत्यत्व जाते. पंचीकृत पंचमहाभूतांपासून स्थूल देह निर्माण झाला व अपंचीकृत पंचमहाभूतांपासून सूक्ष्म देह निर्माण झाला असे पंचीकरण शास्त्र सांगते. या स्थूलदेहाला सहा विकार आहेत. तो बीजरूपाने आधी असतो, मग जन्माला येतो, वाढतो, त्यात बदल होतो, तो क्षीण होतो व शेवटी नष्ट होतो. म्हणजे तो त्रिकालाबाधित नाही व म्हणून मिथ्या आहे. सूक्ष्म देहाचे घटक पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मद्रिये, पंचप्राण आणि अंतःकरण असे आहेत. सूक्ष्म देह दिसत नसल्याने त्याची कल्पना करणे कठीण आहे. या घटकांपैकी मन हे इंद्रिय सर्वांवर हुकुमत गाजवत असल्याने या शरीराचा विचार करतांना मुख्यत्वाने मनाचा विचार करावा लागतो. जीवाचे मनाशी तादात्म्य असल्यामुळे मनविरहित मी ही कल्पना पटण्यासाठी ध्यानाचा अभ्यास उपयोगी पडतो. आत्मा सत्य आहे, निर्विकार आहे. देह त्यागून आत्मा जसा असतो तसा असतो. या विचाराने ही भ्रांती जाते.

  2) जगत्सत्यत्व भ्रांती – जगातील वस्तूंच्या मिळण्यावर आपले सुख अवलंबून असेल तर जग सत्य वाटते आहे. कोणत्याही घटनेविषयी आपल्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असतील तर जग सत्य वाटते आहे हे ठरवता येते. जगही पंचभूतिकच असल्याने मिथ्या आहे हे कळते.

  3) कर्तृत्वभोगतृत्व भ्रांती – मी कर्ता असून जग भोग्य आहे असे वाटणे हे याचे स्वरूप आहे. “सकळकर्ता तो जगदीश।’ हे पटले तर ही भ्रांती जायला वेळ लागणार नाही.

  विचारसागर, वृत्तिप्रभाकर, पंचदशी, विवेकसिंधु इत्यादी तत्त्वज्ञानाचे ग्रंथ फार सुंदर आहेत. या प्रक्रिया त्यात तपशीलवार मिळतात. परंतु ते तत्त्वज्ञान पचविण्यासाठी साधकाने साधनचतुष्टयसंपन्न असणे फार महत्त्वाचे आहे. विकारांनी अंतःकरण व्यापलेले असतांना या ग्रंथांमधून सांगितलेल्या अपरोक्ष ज्ञानाचा संस्कार अंतःकरणावर उमटत नाही, रुजत नाही. साधकाच्या प्रत्यक्ष कृतीचा, शारीरिक, मानसिक, बौद्धिक  तयारीचा परिपूर्ण विकास झाला असेल तरच आत्मानुभवाचा प्रत्यक्ष ठसा उमटेल.

  ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या प्रतिपादनाचा विषय “अविद्यानाश’ आणि मोक्ष हे त्याचे फळ एवढाच असल्याचे सांगतात. “देव शोधावया गेलो तो देवचि होऊनि ठेलो।’ असे श्रीतुकाराम महाराज म्हणतात.”विभक्त नव्हे तो भक्त’ अशी व्याख्या श्रीसमर्थ करतात. यालाच “जीवब्रहमैःय’ असे वेदान्तात म्हणतात. हा अनुभव अखंड प्राá होणे हेच मोक्षेच्छेचे फल आहे.

  डॉ श्री. द. देशमुख. 

  साधक सोपान मधून…..


  हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

  Blog Search