Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

 • No events
 • श्रीकृपा प्रकाशन, नागपूर.

  || श्री ||

  थोडा पूर्व इतिहास :- एका विद्दमान संतांच्या प्रतीपादनाप्रमाणे, हिंदु धर्मगंगा चार प्रवाहांची मिळून बनलेली आहे. एक आद्द प्रवाह म्हणजे ज्यांना मंत्र दिसले त्या वेदकालीन मंत्रद्रष्ट्या ऋषींचा प्रवाह. त्यांनी ते मंत्र लिहून ठेवले. नंतर आले पुराणकालिन ऋषीमुनी, मंत्रद्रष्ट्या ऋषींनी जे लिहून ठेवले त्यावर मनन आणि विवरण करून त्यांनी मंत्राचा अर्थ सर्व जनांपार्यंत पोहोचवला. तिसरा प्रवाह आहे, हे जे ज्ञान ऋषींमुनिंनी ग्रंथित करून ठेवले त्याप्रमाणे आचरण करून समाजापुढे आदर्श ठेवणार्‍या संतांचा आणि चवथा प्रवाह आहे, ऋषींमुनिंनी ग्रंथित, प्रतिपादित करून ठेवलेल्या ज्ञानाप्रमाणे आचरण करून व त्या ज्ञानाने त्यात आवश्यकता असल्यास युगधर्माप्रमाणे बदल करून तत्कालीन भाषेत त्या ज्ञानाने समाजाचे प्रबोधन करणार्‍या आचार्यांचा.

  फार पूर्वीपासून चालत आलेल्या ह्या परंपरेतील पूज्यपाद भगवान आदि शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदासस्वामी, स्वामी विवेकानंद हे काही अतिशय तेजस्वी तारे. ह्या सर्व आचार्यांनी वाणी व लेखणी ह्या दोन्ही साधनांचा सारख्याच कुशलतेने वापर केला. त्याच परंपरेतील आज महाराष्ट्रात विद्दमान असलेल्या आचार्यांपैकी एक विभूतिमत्व म्हणजे प पू डॉक्टर श्रीकृष्ण द. देशमुख (उर्फ डॉक्टर काका) मुरगुड जी. कोल्हापूर.

  मुमुक्षू आणि साधकांना प्रबोधन करण्यासाठी प पू डॉक्टर काकांनी गेली तीन दशकांहून अधिक वर्षे आपली वाणी व लेखणी अविरत वापरली.

  प पू डॉक्टर काकांच्या सुरुवातीच्या ग्रंथापैकी काही म्हणजे दासबोध चिंतनिका व अद्वैत मकरंद हे होत. हे सुरूवातीचे ग्रंथ त्यांच्या शिष्यांनी वैयक्तिक रित्या प्रकाशित केले. लवकरच श्रीकृपा प्रकाशन हे नाव व बोधचिन्ह ही तयार झाले. त्याचा वापर करून आणखी काही पुस्तके प्रकाशित झाली पण तीही वैयक्तिक स्तरावर. कार्याचा व्याप वाढत होता आणि तो त्याहूनही अधिक वाढवायचा असे शिष्यांच्या मनी होते. परमेश्वराचीच तशी योजना होती, त्यामुळे हा विचार पुढे आला की ह्या कार्याला संस्थात्मक रूप द्यावे, संस्था स्थापतेवेळी प पू डॉ काकांचे आशीर्वाद व मार्गदर्शन प्राप्त करण्यात आले. त्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरूनच सन २००४ च्या गुढी पाडव्याला श्रीकृपा प्रकाशनला एका संस्थेचे रूप प्राप्त झाले.

  कार्य :- श्रीकृपा प्रकाशनाच्या उद्दिष्टांपैकी एक प पू डॉक्टर काकांच्या (डॉक्टर श्री. द. देशमुख ह्यांच्या ) आध्यात्मिक वाड्ग्मयाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे हे होते व आहे. ह्या उद्दिष्टाला अनुसरून २००४ नंतर प पू काकांनी जे ही ग्रंथलेखन केले ते सर्व श्रीकृपाप्रकाशन ने ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले आणि अनेक सेवाभावी वितरकांच्या व काही प्रतिष्ठित ग्रंथविक्रेत्यांच्या माध्यमातुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. ह्या ग्रंथांमध्ये पंचदशी भावदर्शन, संसारसागरातील गीता दीपस्तंभ, अनुग्रह, आत्माराम, नारद भक्तीसूत्रे, चिंतनिका आदि अनेक महत्त्वाचे ग्रंथ विषशत्वाने नमूद करावेसे वाटतात. सर्व ग्रंथाचे मुद्रण, मुखपृष्ठ आणि ग्रंथाचा आकार, कागदाचा दर्जा ह्या बाबत सदैव उत्कृष्टतेचाच आग्रह धरित आलो आहोत. डॉ काकांच्या लेखणीतून आलेल्या ग्रंथांच्या अंतरंगाची उंची तर भव्यच, तिला पूर्ण पणे साजेल असे बहिरंग तयार करणे अशक्यच. पण तरी जास्तीत जास्त उत्तम निर्मिती मूल्ये ठेवून पुस्तकाचे बहिरंग ही आकर्षक करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

  श्रीकृपा प्रकाशन संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात प पू डॉ काका लिखीत पंचदशी भावदर्शन, नैष्कर्म्यसिद्धी भावदर्शन व संक्षेपशारीरक भावदर्शन ह्या तीन ग्रंथांचे भावपूर्ण व प्रसन्न प्रकाशन समारंभ अनुक्रमे आळंदी, नागपूर व पुणे येथे संपन्न झाले आहेत. प पू डॉ श्री द देशमुख ह्यांच्या नवनवीन ग्रंथांचे प्रकाशन, जुन्या ग्रंथांच्या आवृत्त्या, नवनवीन वितरक व ग्रंथविक्रेते ह्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त अध्यात्मप्रेमींपर्यंत डॉ काकांच्या विचाराचा प्रसार व प्रचार हे आमचे कार्य श्रीगुरूकृपेने अविरत चालू आहे व चालत राहील.

  श्रीकृपा प्रकाशनाच्या कार्यात अधिकृतता यावी आणि वाढता व्याप लक्षात घेता लेखनाच्या प्रकाशनाच्या संदर्भात एक शिस्त व सुसूत्रता राहावी म्हणून प पू डॉक्टर काकांनी श्रीकृपा प्रकाशनला त्यांच्या साहित्याच्या प्रकाशनाचे व तदनुषंगिक  सर्व हक्क दिले आहेत.

  त्यात आता ह्या नवीन युगाला अनुसरून केलेल्या संकेतस्थळाची भर पडत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे झालेल्या युगपरिवर्तनाचा फायदा प पू डॉक्टर काकांच्या विचारांच्या प्रचार व प्रसारासाठी पण व्हावा ह्या शुभहेतूने आम्ही हे संकेत स्थळ सुरू करत आहोत.

  ह्या संकेत स्थळाच्या मदतीने सर्वांना प पू डॉक्टर श्री द देशमुख ह्यांच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथाबद्दल माहिती व ग्रंथवाचन तसेच त्यांच्या प्रवचनातून झालेले मार्गदर्शन, पूर्वीच्या अभ्यास वर्गांमधून झालेले मार्गदर्शन, त्यांचे आगामी कार्यक्रम परिवारातील अन्य संस्था/ उपक्रम ह्या विषयी माहिती, क्षणचित्रांच्या माध्यमातून लेखकाचा सहवास आदि विविध लाभ मिळणार आहेत. आपण सर्वांनी त्याचा लाभ घेऊन आनंदाची लुट करावी तसेच आमच्यावरील लोभ कायम ठेवावा हीच ह्या संकेतस्थळाच्या निमित्ताने आपल्या जवळ विनंती.

  संतांचा आशीर्वाद :- श्रीकृपा प्रकाशनच्या कार्याला अगदी प्रारंभापासूनच अमरावती येथील सुप्रसिद्ध, वेदांत व संतसाहित्य अभ्यासक, आध्यात्मिक मार्गदर्शक, श्री गोपाळकृष्ण मंदीर अंबापेठ अमरावती मंदिराच्या स्फूर्तिस्थान प पू मंदाताई गंधे ह्यांचे निरपेक्ष प्रेम लाभले आहे.

  तसेच नैष्कर्म्यसिद्धी भावदर्शन प्रकशनापासून महाराष्ट्रातील विद्दमान थोर आचार्य, आचार्य गोविंददेव गिरिजी महाराज ह्यांचाही कृपालोभ आम्हाला प्राप्त होत आहे. ही आमच्यावर ईश्वराची मोठी कृपाच होय. त्यांचा व इतरही संतमंडळींचा लोभ आमच्यावर असाच राहो हीच ईशचरणी प्रार्थना.

  कार्यकारिणी :- संस्थेच्या स्थापने नंतर संस्थापक अध्यक्ष मा. साधनाताई पूरोहित, मा डॉक्टर वैजयंती पांडे (माजी उपाध्यक्ष), मा श्री अनिलजी देशपांडे व मा डॉक्टर धनंजय मोडक (दोघेही माजी सचिव ) मा श्री गजानन देव (माजी मुख्य पुस्तक वितरक ) ह्यांनी संस्थेच्या कार्यात भरीव आणि रचनात्मक योगदान दिले.

  सध्या कार्यरत असलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे.

  • अध्यक्ष :- श्री मोहन वैद्य.
  • उपाध्यक्ष :- डॉ वैशाली बेझलवार.
  • सचिव :- श्री महेश गद्रे.
  • सहसचिव :- श्री गजानन देव .
  • कोशाध्यक्ष :- श्री पुरुषोत्तम अपशंकर.
  • मुख्य पुस्तक वितरक :- श्री अनंत नाईक.
  • सदस्य :- डॉ सौ नीना मोडक.

  समारोप :- श्रीकृपा प्रकाशनच्या कार्याचा हा वृक्ष जो बहरला आहे त्याला कारणीभूत प पू श्रीगुरूंचा आशीर्वाद व देश विदेशातील अनेक अध्यात्मप्रेमींचा आम्हाला लाभलेला स्नेह आहे ह्याची आम्हाला जाणीव आहे. आम्हाला तनमनधनाने सहकार्य करणार्‍या सर्वच मित्रांचे ह्यावेळेस आम्हाला स्मरण होत आहे. हे सर्व ईश्वराचे नियोजन आहे ह्याची आम्हांला सतत जाणीव आहे.

   

  || हरी ओम ||  List of address
  List of books