प्रस्तावना
अथर्वशीर्षाच्या शेवटी ‘ इत्युपनिषद् ’ असे म्हटले आहे. त्याचा अर्थ असा होतो की हे उपनिषद आहे. ‘ गणपतिउपनिषद् ’ असा अनेक अभ्यासकांनी याचा उल्लेख लेका आहे. ‘अथर्वशीर्ष ’ या नावावरून असे लक्षात येते की अथर्ववेदाचे उपनिषद आहे. उपनिषदांना ‘ श्रुतिशिरम् ’ – वेदाचे उत्तमांग, मस्तक असे म्हणतात. ‘अथर्वशीर्ष’ हे तर म्हणजे अथर्ववेदाचे मस्तक आहे. संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद या सगळ्यांना देव म्हणतात. त्याचा शेवटचा भाग म्हणजे ऊयापनिषद् म्हणजे वेदांता किंवा वेदांचा सिद्धान्त, वेदाचे सार. या दृष्टीने अथर्वशीर्षाकडे पाहिले म्हणजे अथर्वशीर्षाची एक वेगळीच प्रतिमा मन:चक्षूपुढे उभी राहते.
यात गणपतीकडे बघण्याचा ऋषींचा दृष्टिकोन आपल्याला समजू लागतो, ते कधी त्याला शिवपार्वतीचा पुत्र म्हणतात तर कधी परमेश्वर म्हणतात आणि कधी परब्रह्म म्हणतात. शंकर पार्वतीचा मुलगा म्हणून तो लंबोदर आहे, एकदंत आहे, सुपासारखे त्याचे कान आहेत, वर्ण आरक्त आहे, रक्तचंदनाची उटी त्याच्या सर्वांगाला लावली आहे. रक्तपुष्पांनी त्याची पुजा लेकी आहे, रक्तवस्त्र परिधान केले आहे, तो मूषकावर बसला आहे, हातात पाश, अंकुश, भग्नदंत घेतला आहे व एका हाताने भक्तांना अभय देत आहे.
भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी सृष्टीच्या प्रारंभी तो प्रगट होतो. जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा तो परमेश्वर आहे. अथर्वशीर्षाचे द्रष्टे ऋषी प्रार्थना करतात , ‘गणेशा, तू माझे रक्षण कर. पूर्वेकडून कर, पश्चिमेकडून कर, दक्षिण-उत्तरेकडून कर. सर्व बाजूंनी कर. तू वक्त्याचे रक्षण कर, श्रोत्यांचे रक्षण कर, गुरूंचे रक्षण कर. शिष्याचे रक्षण कर. तुला मी नमस्कार करतो. योगी लोक तुझेच ध्यान करतात. ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, चंद्र, अग्नी ही सगळी तुझीच रुपे आहेत. तुझा तो विलास आहे. सर्व वाणी तूच आहेस. आनंद हे तुझे स्वरूप आहे. तत्वमसि वाक्याने श्रुती तुझेच प्रतिपादन करतात. ‘ सर्वं खलु इदं ब्रह्म ’ ही श्रुती तुझेच वर्णन करते. तू परब्रह्म आहेस. तू स्वत: काहीच करत नाहीस, पण सगळे जग तुझ्यापासून उत्पन्न होते, तुझ्यावर राहते, तुझ्यात लीन होते आणि तुझ्यावरच भासते. साप दोरीवर उत्पन्न होतो, दोरीवर राहतो, दोरीतच लय पावतो आणि दोरीवरच भासतो. जगताचा सर्व अध्यास तुझ्यावर आहे. ऋषी पुढे ‘ ओम गं ओम ’ ‘ ओम गंगणपतये नम: ’ आणि ‘ गणेशगायत्री ’ यांचे निरूपण करतात.
अवघ्या दहा मंत्रात अथर्वशीर्ष आपल्याला सर्व गणेशविद्या विशद करून सांगते. डॉक्टर देशमुखांनी ही विद्या आत्मसात केली आणि आपल्या परिणतप्रज्ञ लेखणीने जगाला दाखवून दिली. प्रस्थानत्रयीवर भाष्य करणार्या ह्या अभिनव आचार्यांची प्रतिभा फक्त शास्त्रग्रंथातच अप्रतिहत संचार करते असे नाही तर सकल संतवाग्ड्मयाच्या महासागरात स्वैर विहार करते. नैष्कर्म्यसिद्धी सारख्या आणि पंचदशीसारख्या शास्त्रग्रंथातली प्रमेये संतवाग्ड्मयाचा आधार घेऊन विशद करण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. अथर्वशीर्षावर आजपर्येंत हजारो पाने लोकांनी लिहिली. पण इतके मुलग्राही विवेचन आणि तेही इतक्या सोप्या आणि रंजक भाषेत करण्याची किमया केवळ डॉक्टर देशमुखच करू शकतात. त्यांच्याकडून परमेश्वराने असेच लिखाण करून घ्यावे एवढीच या निमित्ताने मंगलमूर्तीजवळ प्रार्थना करतो.
विघ्नहरी भालचंद्र देव
चिंचवड