प्रस्तावना
जनसामान्यानेही, ‘सदा ची गावी जीवनात या आनंदाची गाणी |’ ही शुभाकांक्षा ज्यांच्या श्रीमुखातून उत्स्फूर्तपणे प्रगट झाली आहे, ते आहेत मुरगुडचे संतहृदय प पू डॉ श्री श्री द देशमुख उपाख्य, प पू डॉ काका. तेच या ‘अध्यात्म आणि जीवन’ या पुस्तकाचे आदरणीय लेखक आहेत. ‘अध्यात्म आणि जीवन’ या शीर्षकाचा एक प्रदीर्घ लेख (एकूण ५ भाग) इतर सात लेखांसह या पुस्तकात आहे. या लेखात ‘सुखी व सफल जीवनासाठी अध्यात्मशास्त्र कसे उपयुक्त आहे’ या जिव्हाळ्याच्या विषयाचा अतिशय मार्मिक ऊहापोह केलेला आहे. अन्य लेखही याच आशयाला समर्पित आहेत. त्यामुळे पुस्तकाचे नामाभिधान, ‘अध्यात्म आणि जीवन’ असे करण्यात एक हृदयंगम औचित्य साधले गेले आहे. तसे म्हणाल तर प्रत्येक लेख अन्य लेखांशी अर्थत: एक अतूट आणि मधुर नातेसंबंध राखून आहे असे लक्षात येते. ‘सदा चि गावी…. गाणी’ हे गीत स्वत:च्या मोहक प्रकृतीने लेखसंग्रहाची विलोभनीयता अधिकच खुलवितांना दिसते.
या संग्रहातील सर्वच लेख अन्यान्य वेळी मान्यवर मासिकातून प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे प्रस्तुत पुस्तकासाठी समान प्रकृतीच्या लेखांची निवड म्हणजे संकलनकर्त्याच्या चातुर्याचा एक अभिनव प्रयोग आहे हे निर्विवाद.
लेख वाचीत असतांना सतत जाणवत राहते की लेखक बेजोड विद्वान आहे, त्यांचे शब्दासामर्थ्य अलौकिक आहे, त्यांच्या विषयाच्या आकलनात यथार्थता आहे, त्यांची संबोधस्पष्टता स्फटिकतुल्य आहे, त्यांची बहुश्रुतता चौफेर आहे, त्यांचे प्राचीन-अर्वाचीन व पौर्वात्य वाङ्मयाचे वाचन प्रचंड आहे. अध्यात्मासारखा दुर्गम विषय वाचकांपुढे ठेवतांना मांडणी ओघवती, मार्मिक, सोपी, सहज, नेमकी, निर्भीड व रसाळ आहे. शिवाय लेखकाने ज्या आत्मविश्वासाने आध्यात्मिक मूल्यांचा प्रत्ययकारी पुरस्कार या लेखांमधून लेका आहे ती मूल्ये त्यांच्या अनुभव क्षेत्रातीलच आहेत, हे वाचकाला जाणवल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे लेखक वाचकाच्या मनावर त्यांच्या स्वतंत्र लेखनशैलीचा ठसा उमटवून जातो. लेखकाच्या परखडपणा व सडेतोडपणा वाचकमनाला भावल्याशिवाय राहत नाही. लेखकाच्या संपूर्ण लेखनावर श्रीमद् भागवदगीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे व संत वाङ्मय या अक्षर वाङ्मयाचा व त्यातील अद्वैत सिद्धांताचा विलक्षण प्रभाव आहे. वाचन करतांना वाचकही नकळत त्याच प्रभावात जातो व क्षणभर का होईना, अतुल आनंदात निमग्न होतो. पुस्तकातील काही प्रत्यक्ष अवतरणे पाहू म्हणजे बरील बाबींचा वाचकाला प्रत्यय येईल.
१. ‘शुद्ध परमार्थाची निकड’ या लेखात, ‘परमार्थ हे एकमेव खर्या व शाश्वत सुखाचे साधन आहे व ते वैराग्याखेरीज हाती लागत नाही, हे दासबोधाचे सार आहे.’
२. ‘मानवी पुनर्वसन’ मध्ये, ‘मतांच्या राजकीय व्यूहरचनेमुळे हिंदूंना विषमतेची वागणूक हिंदूंकडूनच मिळते’. पुनर्वसन ही संकल्पना फारच वेगळा आयाम स्पष्ट करते. ‘जिवाची स्वरूपच्यूती, त्यामुळे तो बद्ध व त्याचे स्वरूपी पुनर्वसन होते तेव्हा तो नित्यमुक्त स्थितीत प्रस्थापित होतो’.
३. ‘समाज आणि धर्म’ मध्ये, चार आश्रमांचे विवरण कर्तव्याच्या भूमिकेतून मांडून लेखक म्हणतो, ‘उपकाराच्या ओझ्याखाली दबून राहण्याची अपेक्षा असणे हे दुर्बलपणाचे लक्षण आहे. वर्तमानपत्राचे वाचन, विवाहादी समारंभांना जाणे, गटाने फिरावयास जाणे, गतकाळातील आठवणीत रमणे व त्या सतत सांगत आहाणे, प्रकृतीच्या अनाठायी विचारात वेळ घालविणे, मुले-जावई-सुना-नातवंडे यांचे कौतुक किंवा तक्रारी सांगत राहणे, पत्ते कुटणे म्हणजे वानप्रस्थ नव्हे’.
४. ‘हिंदुधर्म’ मधे (अ) ‘धारणात् धर्म:’ या परिभाषेचा आशय अति नावीन्यपूर्ण पण समर्पक सांगितला आहे. तो असा,’समाज ज्याचे आधारे स्वत:च्या हितासाठी स्वत: बंदिस्त राहतो तो धर्म’. (ब) हिंदूंना सावधगिरीचा गर्भित इशारा देणारे हे मर्मस्पर्शी शब्द पहा, “तलवार, भाकरी, औषधे व पैसे यासारख्या प्रसार माध्यमांनी ते विचलित होणार नाहीत असे हिंदुत्व आम्हा सर्वांना लाभो ही जगदीशचरणी प्रार्थना.”
५. ‘तत्वज्ञान आणि साधना’ मध्ये हा नेमकेपणा लक्ष वेधतो, पहा, (अ) ‘साधना करायची ती आत्मप्राप्तीसाठी नसून अविद्या निवृत्तीसाठी असते’. (ब) प्रश्नोपनिषदातील दाखला देतांना, उतावीळ शिष्य व घाईगर्दीचे गुरु असा प्रकार त्यांच्यापाशी नव्हता. तसेच मोकाट शिष्य व बहकलेले गुरु असेही परस्पर सामंजस्य नव्हते.’
अध्यात्म आणि जीवन भाग १ व भाग ५ मध्ये आधुनिक रसिकतेचा खरपूस समाचार घेण्यापुरते लेखकाचे मनोधैर्य वाखणण्यासारखे आहे. चतुर्वर्ण्य व्यवस्था, चतुर्विधपुरुषार्थ, अंत:करण चतुष्टय, मानसेवा, सुखदु:ख, आत्मसुखाचा अनुभव, ज्ञान, भक्ति, ध्यान, योग जगण्याची प्रेरणा, प्रारब्ध, कर्मयोग, ईश्वरउपासना, मृत्युनंतरची गती, अस्तित्व-ज्ञान-सुख या प्रेरणांचे प्रकृती-विकृती व संस्कृती अशा तीन भागात केलेले विवेचन हे सर्व उत्तमोत्तमच आहे. अध्यात्मशास्त्राची उद्दिष्टे पहा कशी सुस्पष्ट रेखाटली आहेत. ‘अस्तित्वाची विकृती प्रेरणा नष्ट करणे, सहज प्रेरणा बाधित करणे व समाजासाठी त्या प्रेरणेचे उदात्तीकरण करून लोकसंग्रह करणे ही अध्यात्मशास्त्राची उद्दिष्टे आहेत.
अशा या सर्वांगांनी परिपूर्ण व समृद्ध लेखसंग्रहाला प्रस्तावना लिहितांना मला माझा अधिकार लक्षात घेता संकोच होतो आहे. त्याचबरोबर ‘क्व सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्पविषयामती: |’ या सुप्रसिद्ध वाचनाचे विनम्र स्मरण होत आहे. लेखकांशी माझ्या भाग्याने माझा प्रत्यक्ष परिचय आहे, त्यामुळे मला माझ्या तोकड्या सामर्थ्याचा सतत साक्षात्कार होत आहे. तरीही प्रस्तावना लेखन माझे हातून व्हावे ही संबंधितांची इच्छा ईश्वरेच्छा आहे असे समजून या पुस्तकास प्रस्तावना लिहिण्याचे नम्र धाडस केले आहे. कदाचित ही प्रस्तावना लिहिल्यामुळे माझे सामर्थ्य समृद्ध होईल अशी ईशयोजना असावी.
सर्व लेख वाचल्यानंतर एक बाब अशी लक्षात येते की, लेखांमध्ये विषय, संबोध, प्रतिपादन इ चे अनावश्यक पुनरावर्तन झालेले आहे. परंतु हा नगण्य दोष पुस्तकाचे माहात्म्य कोणत्याही प्रकारे कमी करीत नाही. सलगपणे लेखन नाही व एकावेळी एक लेख स्वतंत्रपणे पूर्ण असावा ही अपेक्षा आहे त्यामुळे हा दोष अनिवार्य ठरला असे प्रयत्नाशिवाय लक्षात येते. हा दोष लेखकाचा असण्यापेक्षा संपादन विभागाचा आहे. परंतु त्या त्या लेकाचे स्वतंत्र व्यक्तिमत्व जोपासण्याच्या श्रद्धावृत्तीमुळे संपादन विभागाला ते करणे मानवलेले दिसत नाही.
शेवटी हा उपेक्षणीय दोष पत्करून संग्राह्य , वाचनीय,अभ्यासनीय व चिंतनयोग्य आहे, हे नमूद करून व लेखकास अभिवादन करून प्रस्तावना प्रपंचास विराम देते.
दिनांक ९ जुलै १९९८ मंदाताई गंधे
अमरावती