प्रास्ताविक
अनुग्रह या अत्यंत पवित्र, नाजुक आणि साधकाच्या जीवनाला नवा रंग देणार्या विषयासंबंधी काही लिहावे असा माझा अधिकार नाही; किंवा कोणा अधिकारी पुरुषाने काही लिहिले असेल तर तत्संबंधी काही अभिप्राय व्यक्त करण्याची पात्रताही मजजवळ नाही. तरीही चार शब्द लिहित आहे ते केवळ डॉ. श्री. द. देशमुख यांच्याशी असलेल्या दीर्घ व अकृत्रिम स्नेहसंबंधामुळे. अध्यात्मशास्त्राचा सखोल अभ्यास, प्रदीर्घ काळ केलेली गुरुपदिष्ट साधना, अखंड मनन-चिंतन, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि विचारांची स्पष्टता इत्यादी त्यांच्या गुणांचा परिचय अगदी जवळून झालेला आहे. तत्त्व आणि व्यवहार यांचा सुरेख संगम त्यांच्या ठायी प्रत्ययास आला आहे. म्हणून त्यांचा मजवरील अहेतुक लोभ ही मला मोठी मोलाची गोष्ट वाटते. त्यांच्या इच्छेचा अनादर करणे अशक्य असल्यानेच हे चार शब्द.
‘अनुग्रहा’संबंधी साधकांत आणि अन्य लोकांत देखील फार कुतूहल असते. अनेक समज आणि गैरसमज असतात. परमार्थाचे क्षेत्र प्रदूषित करणार्या मतलबी बुवा-महाराजांनीही गोंधळात भर घातली आहे. अशा स्थितीत अनुग्रह म्हणजे नेमके काय, हे सोप्या, सुबोध भाषेत कोणातरी अधिकारी पुरुषाने समजावून सांगण्याची फार आवश्यकता होती. सद्गुरू कोणाला म्हणावे? सच्छिष्य कोण? गुरु-शिष्य संबंधांचे स्वरूप परमार्थामध्ये कशा प्रकारचे असते? महावाक्य कशाला म्हणतात? त्याची तात्त्विक बैठक कोणती? अनुग्रह कोणी घ्यावा? अनुग्रह घेणारावर कोणते दायित्व येऊन पडते? अनुग्रहात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? इत्यादी अनेक प्रश्न साधकाच्या मनापुढे येतात. या सर्व प्रश्नांचे शास्त्रशुद्ध विवेचन डॉ. देशमुख यांनी समर्थपणे केलेले आहे. अनेक मार्मिक उदाहरणांच्या सहाय्याने आणि संतवचनांचा मागोवा घेत त्यांनी सगळा विषय स्पष्ट केला आहे.
डॉ. देशमुख यांच्या विवेचनाचे ठळक वैशिष्ट्य हे की, वेदान्त तत्त्वज्ञानातील अनेक आधारभूत संकल्पना मूळ विषयाच्या अनुषंगाने त्यांनी स्पष्ट केल्या आहेत. उदाहरणार्थ, ‘तत् त्वम् असि’ – ते तूच आहेस, – असे सद्गुरू अनुग्रह देतांना सांगतात. या उपदेशाची तात्त्विक बैठक डॉ. देशमुख यांनी अनेक समर्पक उदाहरणांच्या सहाय्याने समजावली आहे. तसेच वेदान्तातील सुख-दुःख विवेकही प्रशांत जलाशयाचा दाखला देऊन मार्मिकपणे उलगडला आहे. दगडाबरोबर लाडूही त्यांनी आणल्यामुळे विषय सहज गळी उतरतो. गुरुतत्त्व आणि गुरुपरंपरा, संप्रदाय आणि त्याच्या मर्यादा या संबंधीच्या कल्पनाही नेटक्या पद्धतीने पुढे मांडल्या आहेत. ‘शक्तिपाता’चे जे मोठे गूढ सामान्यतः वाटते, त्याचीही उकल केली आहे.
‘जे चि क्षणीं’ अनुग्रह केला| ते चि क्षणीं मोक्ष जाला|
बंधन काही आत्मयाला| बोलोचि नये॥
या समर्थवचनाचा संपूर्ण आशय अशा प्रकारे क्रमाक्रमाने त्यांनी उलगडून दाखविला आहे. वरवर शब्द सोपे वाटतात, पण त्यांचा खरा अभिप्राय कळण्यासाठी अधिकारी पुरुषांकडून काही श्रवण करावे लागते. समर्थांसारखे आत्मज्ञानी सत्पुरुष जेव्हा ‘तत्क्षणी’ असा शब्दप्रयोग करतात, तेव्हा तो क्षण येण्यापूर्वी साधकाला केवढे जीवनपरिवर्तन घडवून आणावे लागते आणि अनुग्रहाचा खरा लाभ कोणत्या साधकांना होतो हे अशा श्रवणाने मनावर बिंबते. ज्याला खरोखरच परमेश्वरप्राप्तीची तळमळ आहे, त्याच्या प्रयत्नांना योग्य दिशा लाभते.
म्हणून ही पुस्तिका छोटीशीच असली तरी तिचे मूल्य निस्संशय मोठे आहे. डॉ. देशमुख यांची या विषयावरील दोन प्रवचने अशा प्रकारे पुस्तिकेच्या स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाशक अभिनंदनास पात्र आहेत. साधक बंधू या पुस्तिकेचे उचित स्वागत करतील, असा विश्वास आहे.
चं.प. भिशीकर, गणेशवाडी, पुणे -४