प्रस्तावना
श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या अस्सल वेदान्तपर काव्यरचनांचा, आत्माराम हा ग्रंथ मेरूमणी ठरावा असा आहे.
“नाना ग्रंथांच्या संमती | उपनिषदे वेदांत श्रुति |
आणि मुख्य आत्मप्रचिती | शस्त्रेसहित || ”
ही दासबोधच्या रचनेसंबंधी त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आत्मारामाचे बाबतीतही तितकीच खरी आहे. निर्भेळ वेदान्ताची ही रचना असल्याने तिचा अभ्यासही शास्त्राच्या अनुरोधाने केला असता अधिक फलदायी ठरतो. कोणत्याही अध्यात्मशास्त्राच्या ग्रंथरचनेमध्ये अनुबंध व लिङ्गे यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विचार केलेला असतो. यामुळे साधकाच्या चिंतनाला एक निश्चित चोकट प्राप्त होऊन अभ्यासाला अर्थपूर्णता येते.
अनुबंध
अधिकारी – “कां जे तुझी भ्रांति फिटली | नाहीच अद्दापि “ (१-१९) हा आत्मारामाचा अधिकारी आहे. काही ग्रंथांचा अभ्यास करूनही परमार्थ म्हणजे नेमके काय ते न समजल्याने व त्या अनुरोधाने प्रत्यक्ष साधना न घडल्याने अनुभव न आल्यामुळे ज्याचा भ्रम नाहीसा झालेला तो आत्मारामाचा अधिकारी होय. ज्याचा देह-मन सापेक्ष अहंकार बाधित झालेला नाही त्याचा अहं-मम भ्रम नष्ट होत नाही. शरीरसापेक्ष “मी” व प्रपंचसापेक्ष “माझे” असा भ्रम आहे तोपर्येंत आत्मारामाचे दर्शन होत नाही. म्हणजेच ज्याने जड व चंचल आत्मनिवेदन केले असून निश्चळ आत्मनिवेदन झालेले नाही त्याला या ग्रंथाचा खरा लाभ होईल (दा. बो १२-५ ) तो या ग्रंथाचा खरा अधिकारी आहे.
विषय – ग्रंथाचा विषय निश्चित असला म्हणजे अभ्यासाचा विषय निश्चित होतो. मांडणी केली जात असताना प्रासंगिक विषय मधे मधे आले, तरी मुख्य विषयाचे अनुसंधान सुटत नाही.
“म्हणून नाशिवंत तितुका मळ | तुवा त्यजला अमंगळ |
तो गेलिया तुंचि केवळ | आहेस बापा | “ (२-९)
हा आत्मारामाचा विषय आहे. अनात्म, म्हणजे मायिकाचा त्याग केला असता आत्मानुभव येतो हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे.
प्रयोजन – अधिकारी साधकाने वरील विषयाचा अभ्यास करण्याच्या हेतूला प्रयोजन असे म्हणतात.
“दासबोधीचे समासी | निर्मूळ केले मीपणासी |
तया निरूपणेही वृत्तीसी | पालट दिसेना || १-२० || ”
दासबोधाच्या अभ्यासानंतरही जर समाधानाची योग्य दिशा सापडली नसल्याने अपेक्षित परिणाम दिसत नसेल तर त्याने आत्मारामाचे चिंतन करावे.
संबंध – आत्माराम हा ग्रंथ व त्याचा अधिकारी वाचक यांच्यात प्रयोज्य-प्रयोजक संबंध आहे. म्हणजे आत्माराम हा ज्ञानाचा प्रयोजक असून साधक प्रयोज्य आहे. हा केवळ तांत्रिक विषय आहे.
सहा लिङ्गे
(१) उपक्रम व उपसंहाराची एकवाक्यता
लिङ्गे म्हणजे ग्रंथाच्या अभ्यासाचा आधार. किंवा सदग्रंथाचे सहा निकष म्हणजे षडलिङ्गे, ग्रंथाच्या मुख्य विषयाच्या मांडणीचा आरंभ म्हणजे उपक्रम. ग्रंथाची मांडणी पूर्ण झाल्यावर त्या विषयाशी सुसंगत निष्कर्ष निघाला की तोच उपसंहार. उपक्रम व उपसंहाराची एकवाक्यता किंवा सुसंगती हे चांगल्या ग्रंथाचे लक्षण आहे.
“तया निजपदाकडे | आनंदे वृत्ति वावडे |
पद लघलिया जडे | तद्रूप होऊनि “ || १-८ ||
हा उपक्रम असून
“ऐसा कृपाळु स्वामीराव | आदि पुरुष देवाधिदेव |
शिष्यास निजपदी ठाव | ऐक्यरूपे दिधला” ||
हा उपसंहार आहे. पद व तद्रूपता या उपक्रमाची निजपद व ऐक्यरूप यांचेशी एकवाक्यता आहे.
(२) अभ्यास — श्रवणादी साधने व विवेकादीकांचे अनुसंधान व आचरण सतत चालू ठेवणे म्हणजेच अभ्यास. तो असा असावा —
“ श्रवण आणि मनन | या ऐसें नाही साधन |
म्हणोनी हे नित्यनूतन | केलें पाहिजे “ || ( ४-५ )
(३) अपूर्वता – ग्रंथ व ग्रंथातील विषयाचे काहीतरी वैशिष्ट्य असावे. मंडणीत विशेषता असावी. ‘स्पष्ट व नाट्यमय गुरुशिष्य संवाद’ हे वैशीष्ट्य या ग्रंथामध्ये जाणवते.
“तूं नाशिवंतामध्यें आलासी | आपणास कां रे चोरिसी ? |
नाशिवंत देतां चकचकीसी | फट रे पढतमूर्खा ! “ || ( ४-१२ )
(४) फळ — ग्रंथाचे प्रयोजन सिद्धीला गेले की त्याला फळ असे म्हणतात.
“मी संसारीहून सुटलों | पैलपार पावलों |
मीच सकळ विस्तारलों | सर्वांभूतिं ” || |५-४ |
अनुबंधातील प्रयोजनामध्ये संकुचित मीपणा गेला नसल्याचे समर्थांनी शिष्याच्या लक्षात आणून दिले होते. तो मीपणा येथे ब्रह्मरूप झाला आहे. हेच ग्रंथाचे फळ
(५) अर्थवाद – ग्रंथाच्या स्तुतीला अर्थवाद म्हणतात. आत्मारामामध्ये समर्थांनी हे लिङ्ग विलक्षण पध्दतीने मांडले आहे.
“ ग्रंथ संपता स्तुती उत्तरे | बोलताती अपारे |
परी अर्थासी कारण, येरे | येरा चाड नाही || ५-२७ || “
माझ्या या ग्रंथाची स्तुती न करता त्याच्या मुख्य विषयाशी साधनरूप निष्ठा ठेवावी असा आग्रह समर्थ धरतात.
(६) युक्ती – प्रतिपाद्य विषय समजावून सांगताना काही चपखल उदाहरणांचा किंवा तर्काचा उपयोग केला जातो. हीच युक्ती…
“ जें जालेचि नाहीं सर्वथा | तयावरी निर्गुणाची सत्ता |
ऐसें हे ज्ञातेपणे बोलता | तुज लाज नाहीं || २-२५ || ”
जे जग मयीक असल्याने (!) वास्तविक नाही, त्याला निर्गुणाचे अधिष्ठान आहे असे मोठ्या शहाणपणाने म्हणताना तुला लाज कशी वाटत नाही? निर्गुणाला ‘अधिष्ठानत्व हा गुण नसतो हे समजावून सांगताना समर्थांनीएचए तर्क मांडला आहे. सिनेमातील नाट्यमय प्रसंग व ठसकेबाज संवाद थोडक्यात ट्रेलरमध्ये दाखवतात. त्यामुळे सिनेमाचे स्वरूप कळते. त्याचप्रमाणे अनुबंध व शद्लिंड्गामुळे ग्रंथाचे स्वरूप कळते. कोणत्याही व्यापक प्रस्तावनेपेक्षा अनुबंध व लिङगे यांचा विचार ग्रंथाच्या अंतरंगामध्ये शिरण्यास जास्त उपयुक्त ठरतो.