Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

 • No events
 • दासबोध चिंतनिका

  Posted on June 24, 2016

  120.00

  प पू डॉक्टर श्रीकृष्ण द देशमुख म्हणतात ‘श्रीदासबोध हे श्रीरामदासस्वामींचे साधुकाव्या आहे.’ चिंतनिकेत श्रीदासबोधातील सर्व ओव्या व त्यांचे अर्थ दिलेले नाहीत. जेथे अद्वैताचे गूढ सिद्धांत आहेत त्या सिद्धांताच्या प्रक्रिया सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीदासबोधाचा सखोल अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे. सुप्रसिद्ध समर्थभक्त श्री सुनीलदादा चिंचोळकर यांनी ह्या ग्रंथासाठी लेखनिक म्हणून कार्य केले होते.

  Clear
  SKU: N/A Category:

  प्रस्तावना

  श्रीदासबोध हे श्रीसमर्थ रामदासस्वामींचे साधुकाव्य आहे. मुख्यत्वे ह्या रचनेमुळेच ‘ कवि वाल्मिका सारिखा मान्य ऐसा | ’ असे त्यांचे विषयी म्हंटले गेले. साधुकाव्याचे लक्षण पुढील प्रमाणे सांगितले आहे.
  धर्मार्थकाममोक्षेषु वैचक्षण्यम कलासु च | करोति किर्तिप्रीतींच साधुकाव्यम निवेषणम || (अवलोक टीका )
  अर्थ – धर्म, अर्थ, काम, मोक्ष,कला,रसिकत्व,कीर्ती व प्रेम यांची प्राप्ती करून देणार्‍य काव्याला साधुकाव्य असे म्हणतात.
  श्रीदासबोधाचा यथार्थ अभ्यास झाल्यानंतर ‘साधु साधु ’ असे उद्गार सहजच बाहेर पडतात.
  धर्म – वैदिक धर्म, महाराष्ट्र धर्म व स्वरूप धर्म अशा तिन्ही धर्माचा श्रीदासबोधात विचार आहे. ‘ मुलुख बडवावा कीं बुडवावा | धर्मरक्षणाकारणे | ’ हा हिंदू धर्माचा विचार आहे. ‘महाराष्ट्रधर्म उरला कांही | तुम्हां कारणे | ’ हा राष्ट्रधर्माचा विचार असून ‘सकळ धर्मामाजी धर्म | स्वरूपी राहणे हा स्वधर्म | ’ हा स्वरूप धर्माचा विचार आहे.
  अर्थ – ‘अर्थ’ या शब्दाचा कौटिल्याने केलेला अर्थ श्रीसमर्थांनी स्वीकारला आहे. चातुर्य, राजकारण,शासन,संघटन,व्यवस्थापन, व्यवहारातील सावधपण, प्रापंचिक वैभव, बहुश्रुतपणा, कर्तबगारी व सतत प्रयत्न या सर्वांना मानवी जीवनात असलेले मूल्य मानी केले आहे. दैववादापेक्षा यत्नवादावर फार फार मोठा भर दिला आहे. सर्व समज वैभव, बल व ज्ञानसंपन्न असावा असा त्यांचा आग्रह आहे.
  दीन, दुबळे, आर्त, पराभूत,आशाळभूत, दरिद्री, गुलामगिरीचे, लाचार, खचलेले व निराश जीवन त्यांनी फेकून देण्यास शिकविले.
  काम – कामजीवन हा मानवी समाजाचा स्थायिभाव आहे. सर्व स्त्रीपुरुषांची ती सहज प्रवृत्ती असल्याने त्याविषयी पाल्हाळाने सांगण्याची मुळीच गरज नाही. फक्त ते जीवन न्याय, नीती व धर्माने बंदिस्त असले पाहिजे असा आग्रह धरण्याची फार गरज आहे. ‘घरी असूनि सुंदरी | जो सदांचा परद्वारी | बहुतांचे उचिष्ट अंगीकारी | तो एक मूर्ख ||’ (२.१.६० ) हे सांगण्याचा सर्व संतांचा वारसा श्रीसमर्थांनी पुढे चालविला आहे. ‘प्रपंच सुखें करावा | परी कांही परमार्थ वाढवावा |’ (५.३.१०३) असा विचार श्रीसमर्थ सामान्य प्रापंचिकांसमोर सतत ठेवतात.
  मोक्ष – हा श्रीदासबोधाचा आत्मा आहे. सर्व संतांच्या रचनांचा तोच आत्मा असतो.
  शुद्ध उपदेशाचा निश्चयो | सायोज्यमुक्तीचा निश्चयो | मोक्षाचा निश्चयो | बोलिला असे || १.१.६
  जालें जन्माचें सार्थक | निर्गुण आत्मा आपण येक | परंतु हा विवेक | पाहिलाच पाहावा || ६.२.३७
  वीस दशक दासबोध | श्रवणद्वारें घेतां शोध | मननकर्त्यास विशद | परमार्था होतो || २०.१०.३१
  जालें साधनाचे फळ | संसार जाला सफळ | निर्गुण ब्रह्म तें निश्चळ | अंतरीं बिंबलें || २०.१०.२६
  कला, किर्ती, प्रीती – ही साधुकाव्याची अवांतर फळे आहेत. श्रीसमर्थांची कलेची कल्पना उत्कटता व भव्यतेशी निगडित आहे. संगीत, नृत्य व नाट्यातील बारकावे समजावून घेऊन त्यांच्या माध्यमातून लोकरंजन व लोकशिक्षण झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे |’ असे सांगतांना ‘किर्ति पाहातां सुख नाही’ (१९.१०.२५) असे ते बजावून सांगण्यास चुकत नाहीत. श्रीसमर्थांच्या कला, बल, वैराग्य, चातुर्य व ज्ञानसंपन्न महंताला जनताजनार्दनाची प्रीती सहजच प्राप्त होते. सर्वांच्या उपयोगी पडणारा, अडेल पडेल जाणून पूर्ण करणारा, आर्त व तळमळणार्‍यांचे सांत्वन करणारा, मोठी कार्ये उभी करणारा, क्षमाशील, सोशिक व स्वत: न मिरविणारा महंत कीर्तिसंपन्न होतो.
  अशा ह्या साधुकाव्याचा, साधकाच्या (दशक ५ समास ९ ) दृष्टीने अभ्यास करण्याचा हा प्रयत्न आहे. या अभ्यासासाठी निश्चित केलेली तत्वे पुढील प्रमाणे –
  १) श्रीदासबोधाची संहिता छापली नाही. ती बहुतेक साधकांकडे असते. मूळ संहितेसह चिंतंनिकेचा अभ्यास करावा.
  २) जेथे अद्वैताचे गूढ सिध्द्धांत आहेत त्या सिद्धांतांच्या प्रक्रिया सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. व अशा ओव्यांचे विस्तृत अर्थ दिले आहेत.
  ३) जेथे सर्वांच्या नीत्य परिचयाचे विषय आहेत व जो भाग सोपं व पुन:पुन: लिहिलेला आहे तेथे गोषवारा देऊन तो किती ओव्यांचा झाला ती ओवी संख्या दिली आहे.
  ४) जरूर तेथे उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा व नाथ भागवताचे संदर्भ दिले आहेत. श्रीगणेशगीता, यमगीता वगैरे ग्रंथ आज फारसे प्रचलीत नसल्याने व त्यांतील तत्वज्ञानाचा समावेश वरील ग्रंथात असल्याने त्यांचे संदर्भ दिले नाहीत.
  ५) मधून मधून जरूर तेथे काही विशिष्ट ओव्यांचे विस्तृत स्पष्टीकरण दिले आहे.
  ६) श्रीदासबोधाच्या उपलब्ध प्रतीतील पाठभेदामुळे साधुकाव्याच्या हेतूची हानी होत नसल्याने पाठभेद चर्चा टाळली आहे.
  ७) श्रीदासबोधाच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानात पुनरुक्ती असल्याने एकदा एका विषयाचा शक्यतर पूर्ण विचार केल्यानंतर पुन्हा तो विषय आला असता तो तसाच सोडून दिला आहे. श्रीदासबोधाची रचना काहीशी विस्कळीत असल्याने दशक व समासात विचाराच्या प्रवाहाचे सातत्य व संगती असल्याचे ओढून ताणून दाखविण्याचा प्रयत्न केला नाही.
  श्रीसमर्थ ही व्यक्ती, संप्रदाय व वाङ्मय यांच्या अभ्यासाचे गाढे व्यासंगी श्री सुनील चिंचोळकर ह्यांनी लेखनिकाचे कार्य केल्याने ग्रंथाच्या रचनेला बहुमोल मदत झाली. त्यांचा मी आभारी आहे.
  प.दा.अ चे संयोजक श्री द्वा. वा. केळकर ह्यांनी काही बहुमोल सूचना देऊन व प्रस्तावना लिहून ग्रंथास साह्य केले आहे.
  वै. पांगारकर महाराज व रामनिष्ठ श्री के वि बेलसरे महाराज ह्यांनी लिहीलेल्या सार्थ व सटीक दासबोधा मुळेच या ग्रंथाची अशी रचना करणे शक्य झाले.
  सौ. देशमुख व नेरळचे श्री केतकर ह्यांनी ग्रंथलेखनास अनमोल साह्य केले.


  हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

  Blog Search