Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

 • No events
 • माण्डूक्योपनिषद्

  Posted on July 9, 2016

  प पू डॉक्टरकाकांनी दहा प्रमुख उपनिषदांवर मराठीत विवरण केले आहे. मूळ संस्कृत संहिता, त्यावर मराठीत ओवीबद्ध टीका व त्या ओव्यांचा सुलभ अर्थ असे या रचनेचे स्वरूप आहे. प पू काकांनी काठ, केन, बृहदारण्यक, इशावास्या, मांडुक्या, प्रश्न, मुंडक, तैत्तरीय आदि अनेक उपनिषदांवर ह्या प्रकारे ग्रंथ लिहिले आहेत व त्या सर्व वेदांताचा अभ्यास करणार्‍यांमध्ये अत्यंत मान्यताप्राप्त आहेत.

  प्रस्तावना

  माण्डूक्योपनिषद् हे दशोपनिषदातील सर्वात अर्वाचीन उपनिषद मानले जाते. ‘मण्डुक ’ या नावाचा ऋषी हा या उपनिषदाचा द्रष्टा असल्याने हे माण्डुक्य-उपनिषद आहे. या उपनिषदात एकूण बारा गद्य मंत्र आहेत. त्यामुळे हे उपनिषद सर्व उपनिषदांमध्ये आकाराने लहान आहे पण तरीही आध्यात्मिक दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे उपनिषद आहे.

  उपनिषदामध्ये ब्राहमविद्द्येचे ज्ञान असते, पण ती उपासनेचाही विचार करतात. (उदा. प्रश्नोपनिषदाचा पाचवा प्रश्न.) येथे उपासना दोन प्रकारची असते. सेवारूप आणि ध्यानरूप. सेवारूप उपासनेमध्ये ईश्वरसेवेचे विवेचन असते. या सेवेमुळे ईश्वरकृपा, श्रीगुरूप्राप्ती, श्रीगुरुकृपा व शेवटी आत्मकृपा होते. या संबंधीचे विवेचन इशावास्य उपनिषद, भगवद्गीता यामध्ये आहे.

  ध्यानरूप उपासनेमध्ये जप, ध्यान, धारणा यांचे मार्गदर्शन असते.  माण्डुक्य-उपनिषदामध्ये ह्या प्रकारचे विवेचन आहे.

  माण्डूक्योपनिषदामध्ये जो ब्रह्माचा वाचक आहे, त्या प्राणवाचे म्हणजेच ओंकाराचे महत्त्व प्रतिपादन केलेले आहे. थोडक्यात ते असे – ओंकाराच्या अ, उ, म या तीन मात्रा आहेत. या मात्राच वैश्वानर, तैजस व प्राज्ञ हे तीन पाड आहेत. तसेच जागृती, स्वप्न व सुषुप्ती या अवस्थाही तीन मात्रांमध्येच सामावलेल्या आहेत. म्हणजे, संपूर्ण जगत् प्राणवामध्ये अंतर्भूत होते. ओंकाराच्या प्रत्येक मात्रेच्या उपासनेचे फळ सांगून पूर्ण ओंकारोपासनेने या तीन मात्रांपलीकडे असलेला तुर्य जाणला जातो.

  ओंकार हा वैदिक मंत्र आहे तरी या मंत्राच्या जपाचा अधिकार सर्वांना आहे असे सनतकुमार संहितेत सांगितले आहे.

  माण्डूक्य उपनिषदावर श्रीमत आद्य शंकराचार्यांचे आजेगुरु श्री गौद्पादाचार्य यांनी कारिकात्मक टीका केली आहे. त्यामधून अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादन केलेले आहे. पहिल्या प्रकरणात उपनिषद मंत्र व त्यांच्यावरील कारिका आहेत. मात्रा व पाड यांचे अधिक स्पष्टीकरण करून तिन्ही मात्रांच्या पलीकडे असलेल्या अमात्र अशा तुर्याचा अनुभव आला असता साधक शोक, भय, इत्यादींच्या पलीकडे जातो हे स्पष्ट केले आहे.

  दुसर्‍या वैतथ्य नावाच्या प्रकरणात श्रीगौडपादाचार्यांनी जगताचे ‘वितथ ’ म्हणजे मिथ्या स्वरूप युक्तीच्या सहाय्याने सिद्ध करून अद्वैतच खरे आहे हे सांगितले आहे व तर्क आणि युक्तीने द्वैती मतांचे खंडण केले आहे. श्रीशंकराचार्याँच्या अद्वैतविषयक आत्मषटकाची आठवण करून देणारी कारिका येथे आहे ती अशी –

  न निरोधो न चोत्पत्तीर्न बद्धो न च साधक: |

  न मुमूक्षुर्न वै मुक्त इत्येषा परमार्थता  || ३२ ||

  तिसर्‍या प्रकरणाचे नाव ‘अद्वैत प्रकरण ’ असे आहे. येथे श्रुती, युक्ती व अनेक उदाहरणे यांनी ‘जग कल्पनामात्र असून अद्वैतच खरे आहे ’ हे सिद्ध केले आहे. ब्रह्माला येथे ‘अस्पर्श ’ म्हणजे सर्वांहून अलिप्त, कसलाही स्पर्श न होणारे म्हटले आहे. शेवटी निष्कर्ष काढला आहे की – ‘ न कश्चिज्जायते जीव: संभवोSस्य न विद्द्यते | ’ जीव जन्मालाच आलेला नाही व येण्याचा संभवही नाही. अद्वैतरूप ब्रह्मच फक्त खरे आहे.

  चवथ्या अलातशांती प्रकरणात, मशाल वेगाने फिरविली असता भासणार्‍या चक्राच्या उदाहरणाने विश्वाचे स्वरूप सांगितले आहे. जसे, मशाल फिरू लागली की तेजाचे चक्र सत्य वाटते तसे केवळ कल्पनास्पांदामुळे जग अस्तीत्वात आल्यासारखे वाटते. वास्तविक फक्त ब्रह्म आहे. शेवट ब्रह्माला वंदन करून स्वत:च्या कृतकृत्य अवस्थेचा उल्लेख त्यांनी केला आहे.

  श्रीरामकृष्ण सोनयांनी आपल्या गुरूपरंपरा चरित्रात गौडपादाचार्यांचे चरित्र दिले आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात विट्याच्या अलीकडे काही अंतरावर शुकाचार्यांचा डोंगर म्हणून एक रमणीय स्थान आहे. तेथे भूपाळ नावाचे एक खेडे आहे. त्यात विष्णुदेव नावाचा एक विद्वान आणि त्याची पत्नी गुणवती हे दांपत्य राहत होते. त्यांच्या पोटी शुकाचार्यांच्या कृपेने जे अपत्य जन्माला आले, तेच शुकदत्त.

  शुकदत्त लहानपणीच विरक्त झाला व घर सोडून शुकाश्रमात गेला. तेथे अन्नपणी वर्ज्य करून तो तपश्चर्येला बसला. पुढे त्याला दृष्टान्त झाला – तू वंग देशात जिष्णुदेव नावाच्या सिद्धपुरुषाकडे जा. त्याप्रमाणे शुकदत्त वंगदेशात गेला. जिष्णुदेवाने त्याला रहस्यासहा सांप्रदायिक मंत्र व त्याची उपासनापद्धती सांगितली.

  शुकदत्त दुरून पायी चालत गौड देशात आला म्हणून गुरूने त्याचे नाव ‘ गौडपाद ’ ठेवले. हा शुकाचा शिष्य म्हणूनही प्रसिद्ध आहे. पण हा शुक कोण? वास्तविक हा विचार त्यांच्या ग्रंथापुढे गौण आहे. कारण प्राचीन ग्रंथकारांच्या संदर्भात फार त्रोटक माहिती उपलब्ध असते. ती माहिती पूर्ण विश्वसनीय नसते. त्यामुळे त्यांच्या रचनांचा अभ्यास करणे अधिक चांगले.

  व्यासपुत्र शुक व हा शुक यांच्यामधील गुरूपरंपरा अज्ञात आहे म्हणून ‘ व्यासं शुकं गौडपादं महान्तम् ’ असे म्हणतात. या श्रीगुरूपरंपरेला वंदन असो.

  डॉक्टर श्री. द. देशमुख


  हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

  Blog Search