प्रस्तावना
प पू डॉ श्री श्री द देशमुख यांची वाणी परतत्वस्पर्शाने धन्य झालेली आहे. त्या वाणीने अनुग्रहित झालेली त्यांची लेखणी साधकबोधार्थ सिद्ध झाली आहे. तत्वज्ञानाचे आबालसुबोध विवरण करणारी त्यांची वाणी, ‘खेचरच्या हि मना | आणी सात्विकाचा पान्हा | की श्रवणासवे सुमना | समाधी जोडे ||’ या प्रभावाची आहे.
दांडगी विस्मरणशक्ती असणार्या श्रोत्याचे हे श्रवणसुख चिरस्मृत ठेवण्यास त्यांची लेखणी सहृदयतेने सक्रिय होते तेव्हा वाणी-लेखणीच्या हृदयंगम संगमात श्रोता वाचक अलौकिक आनंदाने डुंबत राहतो.
त्यांच्या अक्षर साहित्यातील एक लेखमाला ‘अध्यात्म आणि जीवन’ या नावाने नुकतीच प्रकाशित झाली आहे. वाचकांनी तिचे उत्स्फूर्त व भव्य स्वागत केले आहे. तिचा प्रकाशन – विमोचन सोहळा अजून विस्मरणात गेला नाही, तोच पंधरा लेखांची दुसरी लेखमाला ‘साधकबोध’ नावाने वाचकांच्या भेटीस आली आहे. नावाप्रमाणेच ती साधकाला शुद्ध परमार्थाच्या पथावर अग्रेसर होण्यासाठी बोधसंजीवन देणारी आहे. प्रत्येक स्तरावरील साधकाला ती आपल्याच साठी गुंफली आहे असे वाटल्यावाचून राहणार नाही.
ज्यांना त्यांच्या साहित्याचे वाचक होण्याचे भाग्य लाभले नाही पण श्रवणानंदाचा लाभ झाला आहे, ते भाग्यवंत होत. उलट ज्यांनी त्यांची मंत्रमुग्ध करणारी प्रवचने ऐकली नाहीत पण त्यांचे साहित्य वाचले आहे,तेही तितकेच भाग्यवंत होत. मग वाणी व लेखणी या दोन्हींचा ज्यांचा अनुभव, त्यांच्या आनंद व भाग्य यांना पारावार नसणारच. साधक जीवनाच्या एकेका टप्प्यावर प्रकाश टाकणारी हि लेखमाला साधकास प्रकाशसंदायिनी ठरणारी आहे. बोधाची व्यवहार्यता अतुलनीय आहे.
लेखमालेतील प्रत्येक लेखच स्वत:च्या स्वतंत्र व्यक्तिविशेषाने सर्वांगसुंदर आहे. प पू लेखकाने दमदार विचार परखड पण सुसंस्कृत भाषेत मांडले आहेत. सर्व विषय जिव्हाळ्याचे आहेत. मांडणी आकर्षक आहे. लेखकाच्या अफाट व समृद्ध साहित्यरत्नाकरातून प्रकाशन विभागाने या लेखमालेसाठी वेचलेली लेखरत्ने पाणीदार आहेत. या रत्नमालेमुळे वाचकाचे अधिक समर्पक म्हणजे साधकाचे जीवन पारमार्थिक ऐश्वर्याने विभूषित होणार आहे.
या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ वानगीदाखल लेखांतील काही मार्मिकता उद्धृत करण्याचा मोह होत आहे. ‘एकविसाव्या शतकातील कीर्तनकला’ मधून:
१. कीर्तनकाराला आधुनिक विज्ञानाची जाण असली पाहिजे.
२. बिदागीची बोलणी समाजासमोर येऊ नयेत.
३. पुन्हा जन्माला न येणे हि मोक्षाची नकारात्मक व्याख्या आहे. ह्याच जगात ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा अनुभव घेणे हि मोक्षाची होकारात्मक व्याख्या आहे.
४. ‘वांशीधराचा वेणू’ बघा कसा वाजतो आहे- कृष्णलीलेमध्ये रंगून जाणे हे अहंकारलयाचे एक उत्कृष्ट साधन आहे.
५. सर्व आश्रय सोडून देवाच्या आश्रयावर जीवन जगणार्याचे देवावर खरे खरे प्रेम असते, ह्या एकाच कसोटीला किती भक्त टिकतील? हा मर्मभेदक प्रश्न (‘भजन आणी ब्रह्मज्ञान’ ने विचारलेला )- वाचून डोळे खडकन उघडतील किंवा नाही सांगा बरं?
६. सत्य आहे त्याची कल्पना केली असता, जे भ्रमरूप आहे त्याची कल्पना नष्ट होते असे भ्रमनिवारक उपायाचे लेखकाने ‘भ्रमात’ (भ्रम या लेखात) केलेले प्रतिपादन वाचकाने भ्रमात वाचू नये.
७. धंदा, व्यवसाय किंवा नोकरी या चरितार्थाच्या साधनांमध्ये चरितार्थ चालणे हे मुख्य उद्दिष्ट असते. पण असे उघडपणे व स्पष्टपणे म्हणण्याची सोय हि नसते. समाजसेवा, राष्ट्रसेवा, कौटुंबिक प्रगती, इ. उद्दिष्टांचे मुलामे त्यावर चढवावे लागतात- इति ‘अभंग संकीर्तन’ उवाच.
ऐश्वर्ययोग, नैष्कर्म्यसिद्धी, अनंत राघवाचे स्वरूप, ते हे संत, गुरु – शिष्य संवादाचे महत्त्व या लेखांचे ज्ञानैश्वर्य अनुभवून वाचकास आपण ज्ञानसमृद्ध झाल्यासारखे होते. ‘प्रश्नोत्तरी’ चा सुटसुटीतपणा व नेमकेपणा भावून जातो तर ‘साधनाच्या व्याख्या’ मनाची पकड घेण्यात यशस्वी ठरतात.
बुद्धिनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, तत्वनिष्ठ व अनुभवनिष्ठ असे हे सर्व लेख एकनिष्ठ होऊन वाचले असता ब्रह्मनिष्ठ होण्याचे ध्येय बाळगणार्या वाचकास ते अंतर्निष्ठ केल्यावचून राहणार नाहीत कारण त्यांचा परतत्वस्पर्श हृदयस्पर्श केल्याशिवाय राहणार नाही.
‘साधकबोध’ वाचनाचे फलित – १ साधकाला बाधक बाबी टाळता येतील, साधकबाबी आत्मसात करता येतील. २. अनावश्यक बाबींपासुन अपराधी भावनेशिवाय दूर राहता येतील, आवश्यक बाबींच्या दृढ आचारणासाठी पुरेसे धैर्य लाभेल. ३. चित्ताची विकारवशता शिथिल होईल, निर्विकारता स्थिर करण्याची क्षमता वाढेल. ४. आपणच आपले परमार्थाविषयीचे गैरसमज, अपसमज व नासमज काढून टाकण्यास व शास्त्रशुद्ध हितकारी समजांनी संपन्न होण्यास समर्थ होऊ. ५. सुखधामाचे यात्रेकरू असलेल्या सार्या साधकांचा सुखप्रवास सुखाने व वेगाने पूर्ण होईल. या सुखद आश्वासनाने साधक आश्वस्त होईल.’ “ झाले साधनाचे फळ | ” हे धन्योद्गार त्याच्या मुखातून नकळत बाहेर पडतील. असा हा पंचगुणी ‘ साधकबोध ’ संग्रही असावाच अशी आग्रही भूमिका कोण्या साधकाची नसेल?
‘अध्यात्म आणि जीवन’ या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहिली, तेव्हा ‘ शुका तिच्या योगे सतत पिंजर्यामाजी पडशी | ’ असे भान माला नव्हते. परिणामत: ‘ साधकबोध ’ साठी प्रस्तावना लिहिण्याची काहीशी आनंददायी पण अति अवघड जबाबदारी प्रकाशन विभागाने मजवर टाकली. ती मी आली तैशी पार पाडली आहे. माझ्या कर्तृत्वाकडून पाहिले तर ती अधिकाधिक आकर्षक करण्याचा व तद्द्वारा वाचकांच्या संतोषास उतरण्याचा मी प्रयत्न केला आहे. ईश्वरी कर्तृत्वाकडून पाहिले तर ती त्याच्या योजनेत होती तशी उतरली आहे. खचितच दूसरा दृष्टिकोन सुज्ञ वाचक व अज्ञ प्रस्तावनालेखक या दोहोंनाही समाधान देणारा आहे. इत्यलम् |
वाचक वर्गास शुभेच्छा. प्रकाशन विभागास धन्यवाद.
प पू लेखकास विनम्र प्रणती.
प पू मंदाकिनी गंधे.