प्रस्तावना
आनंद हा असा शब्द आहे की, त्याचा विरुद्धार्थी शब्द नाही. आनंदरूप परब्रह्माच्या ठिकाणी ‘एकमेवाद्वितीयम’ या वास्तवतेमुळे दुसरे नाहीच, म्हणून विरोधीहि काही नाही. मग विरोधवाचक विरुद्धार्थी शब्द कोठून असणार! विषयरहित सुखदशा म्हणजे आनंद. आनंद लाभलेल्याच्या चित्तावर त्याचे तरंग उठणेही शक्य आहे. त्या तरांगांचे मधुगुंजन म्हणजे आनंदाची गाणी. प्रत्येकाने स्वत:च्या जीवनातील रडगाण्यातून बाहेर पडावे आणि आनंदाची गाणी गावीत, असा हितबोध ‘साधक-सोपान’ या ग्रंथाचे लेखक प पू डॉ श्रीकृष्ण देशमुख – जे प पू डॉक्टर काका या नावाने परिचित आहेत- साधकांना करीत आहे.
सर्वसामान्यांचे वर्णन , ‘हित नेणती कोण’ असे आहे. ‘हित न जाणणे पेक्षा ‘हिताचा विचार सांगणार्या शास्त्राविषयी चित्तात अश्रद्धा व अनास्था असणे अधिक गंभीर बाबा आहे. या शास्त्राविषयी अश्रद्धा बाळगणारे ते सारे नास्तिक होत. हितनेणिवेमुळे नास्तिक आनंदाला पारखा असतो. अत: उत्तुंग अशा जीवनप्रासादाची निम्नतमपायरी नास्तिकता असून त्याचा अत्युच्य व सर्वोच्च माळा आनंदाची गाणी हा आहे. या सर्वोच्च माळ्यावर पोहोचण्यासाठी सर्वभूतहितैषी प पू डॉक्टर काकांनी विहंगगती नसणार्यांसाठी साधक सोपान बांधून दिला आहे. साधकाने स्वजीवनाची ऊंची या सोपनाची एक एक पायरी चढून सुखेनैव गाठायची आहे. या सोपानाच्या अकरा पायर्या आहेत चढणार्याने प्रत्येक पायरीवर स्वत:च्या पावलांची पकड घट्ट जमवायची, दृढ करायची आणि नंतर सावधपणे तोल सांभाळीत वरच्या पायरीवर आरुढ व्हायचे. ह्या पायर्या अर्थातच परमार्थाच्या वाटेवरील प्रगतिचे टप्पे आहेत. मागचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करून पुढचा गाठायचा आहे.
शास्त्रशुद्ध,तर्काधिष्ठित व सश्रद्ध विवेचन करून प्रत्येक टप्प्याचे स्वरूप लेखकाने वाचकापुढे पिंजून पिंजून पारदर्शीकरून मांडले आहे. आतासाधकाने डाव्या हातात हे पुस्तक घ्यायचे, एक एक ओल वाचायची, उजव्या हाताने तदनुसार कृती करायची आणि पावले उचलून पुढे जायचे बस. इतके नेमके, नेटके, सुलभ व स्पष्ट मार्गदर्शन साधक सोपानात मिळते . परमार्थपथाचा पथिक नसणार्या नास्तिकालाही या मार्गात आणून सोडण्याची कमाल किमया लेखकाने साधक-सोपानात केल्याचे प्रत्ययास येते.
या पुस्तकातील पहिला ‘आस्तिक नास्तिक ‘ हा लेख वगळता अन्य सर्व लेख प पू डॉक्टर काकांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रवाचंनांच्या कॅसेटवरुन लिहून काढलेले आहेत. प पू डॉक्टर काकांच्या शिष्यमंडळींनी श्रीगुरूसेवाबुद्धीने प्रवचने कॅसेटवरुन उतरविण्याचे काम चिकाटीने करून प्रस्तुत पुस्तकासाठी हे लेख उपलब्ध करून दिले. ‘आस्तिक नास्तिक ‘ हा लेख प पू लेखकाने प्रसाद मासिकासाठी तीन भागात लिहिलेला आहे. ते तिन्ही लेख एकत्र करून प्रसाद प्रकाशनाच्या सानुग्रह औदार्यामुळे या पुस्तकात अंतर्भूत केले आहेत.
माणसाच्या चित्तातील नास्तिकभाव मायेचा परिणाम आहे. त्यामुळे प्रपंच जेणेकरून दृढमूल होईल अशा प्रवृत्तीमार्गात तो राहतो. महद्भाग्याने सत्समागमामुळे विवेक जागृत होतो. जागृत विवेकामुळे प्रपंचविषयक वैराग्याचा उदय होतो. पुढे मनोजय व इंद्रियजय साधतात, प्रतिकूलता सहन करण्याची क्षमता वाढते आणि शास्त्र , गुरु यांविषयी श्रद्धा उत्पन्न होते. याची सहज परिणती म्हणून सुरू होणार्या सत्कर्म आणि सद्उपासना यामुळे चित्तसमाधानाचा लाभ होऊन चित्त ज्ञानाभ्यासास अनुकूल होते. या नश्वर सृष्टीपसार्यातून बाहेर पडावे व अविनाशी वस्तू प्राप्त करावी अशी मुमुक्षा उत्पन्न होते. साधकाची गुरुनिष्ठा दृढावते व श्रीगुरुकृपेने तो आनंदमंदिराच्या गाभार्यात प्रविष्ट होऊन आनंदाने ‘आनंदगीते’ गाऊ लागतो. साधकाच्या आध्यात्मिक सोपानाचे सक्रम व साग्र स्वरूप या लेखसंग्रहात लेखकाने मोठ्या हृदयंगम शैलीने विशद केले आहे. थोडक्यात साधकाला साधनचतुष्टयसंपन्न होऊन दृढ ब्रह्माभ्यास केल्याविना आनंदरूप मोक्ष प्राप्त होत नाही ही बाब लेखकाने मोठ्या खुबीने निदर्शनास आणून दिली आहे.
लेखक प्रसंगी सिद्धांतासाठी कठोर आहे पण साधकासाठी कनवाळू आहे, संबोध स्पष्टते बाबत गोंधळलेला नाही व वाचकाला गोंधळवीत नाही, सडेतोड व परखड आहे पण बंडखोर नाही, सत्याचा उपासक व उद्घोषक आहे पण अप्रिय नाही, सूक्ष्म सिद्धांताचा विवेचक आहे, पण शुष्क तार्किक चिकित्सक नाही आणि विषयाचा सहजसुलभ अनौपचारिक प्रतिपादक आहे पण तत्वहानी करणारा आशास्त्रीय प्रवक्ता नाही. हे पुस्तक वाचतांना सामान्यजनदुर्लभ असणारे हे सद्गुण प्रस्तुत लेखाच्या ठिकाणी असल्याचे प्रकर्षाने जाणवते. प्रामाणिक जिज्ञासू साधकाला परमार्थ प्रगतीच्या दृष्टीने विघातक व अनावश्यक अशा प्रभावातून बाहेर काढण्याची लेखकाची लोकविलक्षण ताकद आस्तिक – नास्तिक या लेखात प्रकट झालेली दिसते. या लेखातील आशयाचे मोहक कथारूप प्रतिपादन वाचकाला त्याचे उद्बोधन करीत करीत खिळवून ठेवते; हे आपण प्रत्यक्ष वाचताना अनुभवाल .
लेख लेखनाच्या शास्त्रीय कसोट्यांना या पुस्तकातील लेख पूर्णांशाने उतरणारे नसतीलही. ते तसे असावेत असा संपादकाचा आग्रही हेतूही नाही. प्रत्यक्ष प्रवचनेच जशीच्या तशी लिखित स्वरुपात मुद्रित लेकी आहेत. यासाठी की ज्यांनी ती प्रत्यक्ष ऐकली आहेत, त्यांना ती वाचतांना पुन: श्रवणाचा आनंदानुभाव यावा. वाचताना खरेच प पू डॉक्टर काकांचा आवाज कानात घुमतो आहे असे वाटल्याशिवाय राहात नाही. ज्यांना प्रवचनांचे प्रत्यक्ष श्रवण घडले नाही त्यांना ही प्रतिपादनातील अनौपचारिकता व सहज ओघ, ‘आपण प्रत्यक्षच ऐकत आहोत’ असा अनुभव दिल्याशिवाय राहात नाहीत. एखाद्या विषयावर बोलणे व तोच विषय बुद्धिपुरस्सर लिहिणे या दोहोत फरक असतो. तो फरक जमेस धरून या पुस्तकाचे वाचन करणे अपेक्षित आहे. कोठे कोठे पुनरावृत्ती असेल , कोठे तपशील व स्पष्टीकरणे कमी असतील , वाक्यरचना शिस्तशीर नसेल , प्रस्तुतीकरण मागेपुढे असेल तरीही प्रवचनात शास्त्रीय विषय तर्कशुद्ध, मार्मिक व क्रमबद्ध पद्धतीने किती ताकदीने मांडला झेला आहे हे अनुभवाला येते व वाचक आपल्याला वस्तू उमजली या आनंदात हरवून जातो हे खास. या लेखनसंग्रहाचे यश यातच निहित आहे.
प पू डॉक्टर काकांच्या यापूर्वीच्या दोन लेखनसंग्रहांना प्रस्तावना लिहिण्याचा बहुमान संपादक मंडळाने मला दिला. प्रस्तावना लिहिण्याच्या दोन प्रयत्नात माझी हवी तशी प्रगति संपादक मंडळीला आढळली नसणार. म्हणून मजविषयी हितबिद्धीने त्यांनी मला तिसरी संधी दिलेली दिसते. अन्यथा आध्यात्मिक अधिकार्याच्या तिसर्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्यास त्यांनी मला का सांगावे? त्यांची भूमिका मला अनाकलनीय आहे. फार खोलात न शिरता त्यांच्या सूचनेला नम्रपणे मान देऊन हा लेखनप्रपंच केला आहे. अधिकारी लेखक बोधपर लेखन करीत आहे,नि:स्वार्थबुद्धीने शिष्य साधक मुद्रण , प्रकाशन , संपादनाचे काम करीत आहेत . मी पाहिले, कोणीतरी तापत ठेवलेले दूध उतू चालले आहे; आपण नुसते ‘ अग्नये स्वाहा ’ म्हणून विनाशरम यज्ञाचे पुण्य पदरी का पाडून घेऊ नये? सेवा न करता पुण्यलाभ पदरी पाडू पाहणार्या मी केवळ स्वार्थापोटी प्रस्तावना लिहिण्याचे धाडस, स्वत:ची पात्रता न जोखता , करून गेले आहे. या धाडसाचाच एक भाग म्हणून लेखाविषयी व पुस्तकाच्या विषय वस्तु विषयी माझ्या मगदुराप्रमाणे मी काही उहापोह केला आहे. वाचक क्षमाशील आहेत व लेखक क्षमारूप आहे, ह्या भरवशाचा तो परिणाम आहे. ‘ वाचूनी पढे न वाची | न सेवा जाणे स्वामीची | ऐशिया मज ग्रंथाची | ( या ठिकाणी माउलींच्या परवानगीने आपण ग्रंथाची ऐवजी प्रस्तावनेची असे म्हणू ) योग्यता के असे || ’हे माउलीने माझे समर्पक वर्णन केले आहे. अशा मला प्रस्तावनारूप सेवेची तिसरी संधि देऊन संपादक मंडळी मला प पू लेखकाच्या कृपेला व त्या कृपेच्या माध्यमातून सर्वेश्वराच्या प्रसादाला पात्र करीत आहेत. त्यांचे ऋण मी जाणते. प पू लेखकाच्या श्रीचरणी माथा ठेवून सर्वेश्वराचे स्मरण करीत म्हणते इत्यलम् |
मंदाकिनी गंधे
दि ५-७-२००१