प्रस्तावना
सुमधुर मधाने भरलेली फळे जर जमिनीलगत असणार्या झुडुपाला लागत असतील, तर उंच झाडावरील शेंड्याला लागलेल्या मधमाशांच्या पोळ्यातून मध काढण्याची खटपट का करावी? हा प्रश्न ‘विवेकसिंधू’कार मराठी भाषा व संस्कृत भाषेच्या संदर्भाने विचारतात. असाचा प्रश्न गहन शास्त्रीय भाषा व सोपी भाषा या संदर्भात विचारता येईल. वेदान्त शास्त्राच्या चिंतांनाच्या केंद्रस्थानी साधक असून पंडित नसतो हे भान ठेवले पाहिजे. जीव, जगत्, ईश्वर, आत्मा व ब्रह्म या संकल्पना, त्यांचे परस्परातील संबंध व त्यांचा साधनेसाठी होणारा उपयोग ही वेदांतशास्त्राच्या अभ्यासाची मुख्य सामग्री आहे. याच्या आधाराने जीवाला ईश्वराच्या आज्ञा पाळीत, त्याची उपासना करीत मिथ्या जगात जगता येते. असा अनुभव आल्यावर वरील सर्व सामग्री निवृत्त होते. ती निवृत्त होण्यातच तिची विश्वासार्हता आहे. विवाह लावून दिल्यावर पूरोहित ज्याप्रमाणे विवाहितांच्या जीवनात लुडबुड करीत नाही, त्याप्रमाणे वेदान्तशास्त्र निवृत्त झाले पाहिजे. अर्थात, त्या पुरोहिताप्रमाणे त्याला पुढे अनेक जीव-शिवाची लग्ने लावून द्यावयाची असल्याने ते शास्त्र टिकूनही राहिले पाहिजे.
देहाने मिळणारे व बुद्धीला होणारे असे सुखाचे दोन प्रकार असून आत्मसुख हा मानण्यापुरता तिसरा प्रकार आहे. उदा. – पांच कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये यांच्या मदतीने मिळणारे सुख देहसुख आहे असे या वर्गीकरणापुरते मानावे. संगीताचा आस्वाद, सौंदर्याचे रसग्रहण, नर्मविनोद, साहित्यातील रस व अलंकार इत्यादींचे सुख बौद्धिक सुख आहे. परंतु नित्य असणार्या आत्मसुखावरच ही सुखे निर्भर आहेत. ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’ असे संत तुकाराम महाराज याच पारमार्थिक वास्तवाच्या अनुभवाने म्हणतात, ‘सुख देवासी मागावे दु:ख देवाला सांगावे’ हे सांगताना महाराज सुख हे सुखरूप देवाकडेच मिळते असे सुचवितात. विषय सुख निर्माण करतात, निद्रा सुख देते. आत्मा सुखरूप आहे हे वेदांताशास्त्राचे सांगणे लक्षात घेतले पाहिजे. ‘विषयजनित सूखे सौख्य होणार नाही’ हे समर्थ वचन विषयसुखे ‘आगमा पायी’ (गीता) असतात असे सांगते; म्हणून वेदान्तशास्त्राचे सुलभ चिंतन आवश्यक आहे. मात्र त्यातील पंडिती आवेश परमत खंडनासाठी आवश्यक असला तरी, एक चाकोरी धरून चालणार्या प्रामाणिक साधकांसाठी आवश्यक नाही. ज्ञानदेव तुकारामादी सर्व मराठी संतांनी भगवान शंकराचार्यांनी उत्तम तयार करून दिलेल्या केवलाद्वैताची वाट पुन्हा पुन्हा स्वच्छ करून वाहती ठेवली आहे. मराठी माणसाने खरेतर इतरत्र जाण्याची गरजच नाही.
कर्म, उपासना, वैराग्य व ज्ञान (परोक्षज्ञान) यांचा सर्व संतांनी सतत पुरस्कार केला आहे. ही सर्व मोक्षाची साधने असून मोक्ष स्थितीमध्ये त्यांना स्थान नाही. उपासनेचे रूपांतर आत्मदेवापासून विभक्त नसलेल्या देवाच्या भक्तीत झाले असता त्यालाच ज्ञानाचे स्वरूप येते. ‘ज्ञानाने देवाला ओळखून देवाचे भक्त व्हावे’ असा सर्व संतांचा आदेश आहे. श्रीगुरू हे सुद्धा श्रीगुरू रूपाने ज्ञानानंतर निवृत्त होतात.
‘सार विचारसागर’ हा ग्रंथ साधकाला या दृष्टीने उपयुक्त होईल असा विश्वास वाटतो.
डॉ श्री. द. देशमुख (मुरगुड)