Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

 • No events
 • स्वनुभव दिनकर (एक चिंतन)

  Posted on July 10, 2016

  0.00

  प्रस्तावना

  सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांचे एक अंतरंग अधिकारी शिष्य दिनकर नर्‍हेर पाठक समर्थांच्याच काळात होऊन गेले. दिनकर स्वामी या नावाने ते जनाला विदित झाले. प्रबळ पुण्याचा ठेवा घेऊनच स्वामी जन्मले. ह्या पुण्याईने अल्प वयातच त्यांना प्रखर वैराग्याचा लाभ झाला. हे वैराग्य त्यांना स्वत:च्या व इतरजनांच्या संसाराच्या सूक्ष्म निरीक्षणाने लाभले. श्रुती सांगते ‘ परिक्ष्य लोकन् कर्मचितान् ब्राहमणो निर्वेदमायात् | ’ हा उपदेश त्यांच्या जीवनात तंतोतंत उतरला. हेच वैराग्य त्यांना ब्रहमजिज्ञासा तृप्तीसाठी वयाच्या पंचविसाव्या वर्षी सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांचे कडे घेऊन गेले. ‘तद् विज्ञानार्थाँ स गुरुमेवाभीगच्छेत् समित् – पाणि: क्षोत्रियम ब्राहमनिष्ठम् | ’ याही आदेशाचे पालन त्यांनी केले. तेथे श्रीसमर्थांचा त्यांना अनुग्रह लाभला, साधन मिळाले आणि शुभारब्ध झालेल्या व एकांतात श्रद्धेने अनुष्ठीलेल्या साधनेचे अपरिहार्य असे आत्मसाक्षात्कार हे फल त्यांना अविलंब प्राप्त झाले. खरे तर ब्रहमानुभव अनिर्वचनीयच, पण ‘ अतींद्रिय परि भोगवीन इंद्रियांकरवी | ’ हे सामर्थ्य सत्पुरुषांना असते. दिनकर स्वामींनी या सामर्थ्यानेच ‘ रूपी अरुपाचे रूप दावीन | ’ या प्रतिज्ञेने तो ब्राहमानुभव शब्दबद्ध केला आणि त्या ब्रह्मोद्भव शब्दांनीच ‘ स्वनुभव दिनकर ‘ या ग्रंथाचा आकार घेतला. या ग्रंथरूपाने दिनकर स्वामींनी जगद्गुरू तुकोबांच्या , ‘ आपण जेऊनी जेऊ घाली लोकां | संतर्पण तुका करीतसे | ’

  या वाचनाचा जनांस साक्षात्कार घडविला आहे.

  सोळा प्रकरणे असलेल्या हा मराठी ओवीबद्ध ग्रंथ आध्यात्मिक अभ्यास करणार्‍यांमध्ये फारसा ज्ञात नाही व ज्यांना ज्ञात आहे त्या स्वरूपानुभवापासून दूर असणार्‍यांनाही फारसा आकलनसुलभ नाही. त्यामुळे ह्या ‘स्वानुभव दिनकरावरही ’ प्रकाश टाकणारा आणखी एक दिनकरच हवा. प पू डॉक्टर काका ( प पू डॉक्टर श्री द देशमुख, मुरगुड) यांच्या रूपाने ‘नवल उदयला चंडाशु | ’. प पू डॉक्टर काकांनी मूळ ग्रंथ स्वनुभवदीनकरावर चिंतन करून भाष्यात्मक निरुपणलेखमाला लिहून भाष्यनिरुपणाच्या उजेडात ग्रंथाचे सर्व पैलू उजळून काढले व साधकांना एक उत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथ बुद्धिगोचर केला. लेखमालेचे नावही ‘ स्वानुभवदिनकर – एक चिंतन ’, असून त्यातील प्रकरणे ‘सज्जनगड’ मासिकात ज्या क्रमाने प्रसिद्ध झाली त्याप्रमाणे लेखांक १ला, २रा इ.च आहेत. आता शब्दनिर्माता आहे स्वामी दिनकर आणि त्या शब्दांचा अर्थप्रकाश आहे काका दिनकर. सुंदर अलंकारांनी रूप खुलून दिसते, सुंदर रूपाने अलंकारांची शोभा वाढते. अगदी तसेच समजू या की, दिनकर स्वामींचा ‘ स्वानुभवदिनकर ’, प पू डॉक्टर काकांची त्यावरील लेखमाला यांमध्ये कोण कोणाचा अलंकार आहे हे सुज्ञ वाचकही ठरवू शकणार नाही अशी माझी खात्री आहे. मी नम्रपणे इतकेच नमूद करते की, ते दोन ग्रंथ परस्परांचे अलंकार करतात.

  ही लेखमाला इतकी उत्कृष्ट झाली आहे की, प पू डॉक्टर काकांच्या या लेखांतून मूळ ग्रंथाच्या सौंदर्य, स्वरूप, दृष्टान्त, प्रतिपाद्य विषय, लेखकाचे लेखन कौशल्य, त्याची चित्ताचा ठावा घेणारी प्रतिपादन शैली, लेखकाने गाठलेली सर्वोच्च आध्यात्मिक ऊंची व बहुश्रुतता या बाबींचा पुरेसा अंदाज येतो. शिवाय सोबतच श्रीगुरूंच्या सहवासात त्यांच्या मार्गदर्शनाबरहुकूम सश्रद्धपणे त्यांनी उपदिष्ट साधन भजून आपणही ती ऊंची गाठू शकू असा आत्मविश्वास आपल्यात निर्माण होतो. हल्ली नाही का आपण बघत की, मूळ पाठ्यपुस्तक न वाचता फक्त त्यावरील मार्गदर्शिका (गाईड) अभ्यासूनच विद्यार्थी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होतात!! या लेखांच्या वाचनाने मूळ ग्रंथ वाचल्याचे समाधान निश्चितच मिळते.

  या लेखमालेतील वेगवेगळ्यावेळी प्रसिद्ध झालेले सर्व लेख क्रमबद्ध संग्रहीत करून श्रीकृपा प्रकाशनाने त्यांचे एक पुस्तकच तयार केले आणि येत्या श्रीगुरुपौर्णिमेला ते प्रकाशित करून गुरुभक्तांना प्रसादभेटरूपाने हस्तांतरितही केले जाणार आहे. वाचकांची मोठीच सोय झाली. श्रीकृपाप्रकाशनाच्या या उपयुक्त व स्तुत्य उपक्रमाची कृतज्ञताभावनेने प्रस्तावनेत नोंद घेणे मला उचित वाटते.

  एखाद्या ग्रंथाची प्रस्तावना जणू त्या ग्रंथाच्या अभ्यासार्थ लिहिलेला प्रकरण ग्रंथच असते. कारण, त्या ग्रंथाच्या स्वरूपाचे प्रस्तावनेत प्रतिबिंब पडलेले असते. ग्रंथाचे अनुबंधचतुष्टय प्रस्तावनेतून कळते आणि ग्रंथ वाचनाविषयी आकर्षण वा प्रतिकर्षण उत्पन्न होते. त्यामुळे प्रस्तावना लेखकाची जबाबदारी फार मोठी आहे. थोडक्यात काय की प पू काकांच्या या पुस्तकावर प्रस्तावनेद्वारा मला प्रकाश टाकायचा आहे. दिनकर स्वामींच्या स्वानुभवदिनकरावर प पू काकांनी चिंतनपूर्वक निरूपण करून प्रकाश टाकला. आता प पू डॉक्टर काकांच्या पुस्तकावर मला प्रकाश पाडायचा आहे ! सांगा बरं, दिनकराला प्रकाशित करणारी प्रस्तावना लिहिणे किती कठिण आहे? कोणते बळ माझे अंगी आहे की, हे काम करण्याचे मी मान्य केले आहे, माझ्यापाशी देखील प्रकाश आहे. आपणास माहीत आहे की सूर्य, चंद्र, अग्नि यांची तमा न बाळगता तो क्षुद्र किडा – काजवा – स्वत:चा प्रकाश दाखवीत ऐटीत मिरवत असतो. त्या बिचार्‍याला काय माहीत की, पुढे तुकाराम नावाचा एक संत येईल व आपल्या प्रकाशाचे, ‘ काजव्याच्या ज्योती | तुका म्हणे न लगे वाती || ’ असे मोजमाप करून आपल्या प्रकाशसामर्थ्याचे दारिद्र जनास सांगेल. पुन्हा एखादा तुकोबा पुढे येईल माझ्या प्रकाशसामर्थ्याच्या दुर्बलतेचा मला साक्षात्कार घडविपर्यंत मी काजव्याचा आदर्श समोर ठेवून ‘ दिनकर ’ नावच्या ग्रंथाला ही प्रस्तावना लिहिण्यासाठी असेच मिरविणार ! काजव्याच्या उजेडात दुसरे काही भलेही न दिसो ,पण त्याचे तर अस्तित्व कळते ना? या प्रस्तावनेतून वाचकास स्वनुभवदिनकर भलाही ना दिसो, पण मला ग्रंथवाचक व श्रीकृपाप्रकाशन यांच्या चित्तात स्थान मिळणे हे ही नसे थोडके! माझ्यावर  अति प्रेम करणार्‍या श्रीकृपाप्रकाशनाच्या चित्ताच्या एखाद्या कोपर्‍यात मला नक्कीच जागा आहे म्हणूनच तर प पू काकांच्या याही पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची सेवा त्याने मला दिली. माझ्या ह्या भाग्याचा हेवा कोणाला वाटणार नाही, एवढी ग्रंथलेखकाची मझेवर कृपा आहे. या श्रद्धेने, स्वानुभव दिनकराला आता प्रस्तावनेद्वारा पूर्व क्षितिजावर आणते.

  1. सद्गुरुकृपेने ब्राहमसाक्षात्कारी झालेले दिनकरस्वामी जनहिताच्या कळकळीने बोलताहेत. निसर्गच तसा आहे,’ अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी | धरिताही परी आवरेना || ’ एकूण काय की या प्रासादिक ग्रंथात पामर दशेपासून साक्षात्कारापर्यंतच्या सर्व टप्यांचा सांगोपांग ऊहापोह आहे; तो अभ्यासून निरुपणात प पू डॉक्टर काका म्हणतात –
  2. लेखकाबद्दल : लेखकाचा व्यासंग दांडगा वा अफाट आहे हे म्हणणेही तोकडे पडावे. पंचांग, इतिहास, काव्य, पुराणे, रामायण, महाभारत, षड्दर्शने, प्रस्थान त्रयी, त्यावरील भाष्ये व टीका या सार्‍यांचाच त्यांनी अभ्यास केला होता हे ग्रंथावरून स्पष्ट दिसते. त्यांची काव्य प्रतिभा उत्कृष्ट प्रतीची असून काव्य प्रासादिक आहे. पाहा मूळ ओवी, ‘ स्व म्हणजे आपुला अनुभव | घेईजे या नाव स्वानुभव | दिनकरा ऐसा स्वयमेव | अस्तोदयरहित प्रकाश || ’ प पू काका पुढे म्हणतात, येथे ‘ पाहावे आपणासी आपण | या नांव ज्ञान || ’ हा समर्थांचा आशय तर आलाच आहे, शिवाय ग्रंथाच्या नावात व ह्या ओवीतही स्वयंज्योती आत्म्याचा स्पष्ट उल्लेख खुबीने केलेला दिसतो. शिवाय या ओवीत आपल्या ओळखीच्या सूर्याचा अस्तोदय हा दोष आत्मसूर्यात नाही हे ही निदर्शनास आणून दिले आहे.
  3. स्वानुभव = आत्मानुभव = ब्रहमानुभव. ब्रहमानुभव केवळ ब्रह्मरूपच. ब्रह्म स्वयंज्योतिरूप आणि ब्रहमवित ब्रहमैव भवति | म्हणून लेखक स्वयंज्योति – स्वानुभवरूप म्हणजेच स्वानुभव दिनकर. शिवाय स्वानुभव स्वयंज्योतिरूप म्हणजेच सूर्य. म्हणूनही स्वानुभव दिनकर. त्याच्या प्रकाशाने सर्व प्रकाशित झालेले आहे. तस्य भासा सर्वमिदं विभाति |
  4. ग्रंथाचा विषय :- श्रीगुरूंच्या कृपाछायेत गुरुपदिष्ट साधनांद्वारा साधना केल्यास विरक्त अशा साधनचतुष्टयसंपन्न साधकाला स्वत:च्या प्रकाशरूपाचा (ब्रहमाचा ) अनुभव येतो. ह्या साधनांमध्ये कर्म, उपासना, भक्ती, ज्ञान, योग यांचा अंतर्भाव होतो.
  5. मूळ संहितेच्या आधारे अर्थनिरुपण करणारे लेखक वैराग्यासंबंधी लिहितात – प्रपंचात पुरुषाची बौद्धिक सुख मिळविण्याची पात्रता कमी असली की, देहसुख हे सुखाचे एकमेव साधन बनते. त्यासाठी तो कोणतीही किंमत मोजण्यास तयार होतो. देहसुखाच्या सामग्रीत स्त्री, पुत्र, धन, संपत्ती, गृह, पशु, इ सारख्या नाशिवंत बाबींचा भरणा असतो. या बाबींचे षडभाव (अस्ति, जायते, इ ) जाणून पुरुषाने विरक्त व्हावे. शहाण्याला इतका बोध पुरेसा आहे.
  6. दिनकर स्वामी भक्ती प्रकरणात लिहितात, ‘जळो त्याची वित्पत्ति | जळो त्याची संतती संपत्ति | जयाचे आर्त भगवंती | अणुमात्र नाही || ’
  7. भक्तीने भागवत्कृपाप्राप्तीने आत्मलाभ होतो व आत्मलाभाने नारदेहाचे सार्थक होते. काल वाया घालवू नये. ‘म्हणौनि कोणा एकाने ऐसे न करावे | नरदेहासारखे रत्न लाधलिया दैवे | सत्संगति श्रवणे मनने साधावे | निज हित आपुले || ’
  8. संहितेतील अतीव मार्मिक व महत्वाच्या ओव्या प पू डॉक्टर काकांनी जशाच्या तशा ऊद्धृत करून वाचकाचे लक्ष वेधले आहे. काही ओव्या :-

  श्रीगुरूंविषयी – ‘गाठी पडेल जेव्हा हस्तमस्तकास | होईल अष्ट देहांचा निरास | जालिया महावाक्य उपदेश | ब्रहमानुभव घडेल || ’ म्हणौनि सर्वथा सद्गुरूवाचून | न घडेचि पै आत्मसाधन || ’

  कर्माविषयी इशारा – ‘शास्त्रबाह्य कर्म करू नये | करित बहुत होती अपाये ’

  श्रीगुरूसेवेविषयी – शिष्याने आपला अहंकार किती टाकला आहे त्याची सेवा ही परीक्षा आहे.

  कर्म व देह यांचे संबंधी – ‘तरी देहावेगळे कर्म ना घडे | आणि कर्मावेगळे दहही न बहुडे | हे येकाविण येक असे घडे | जन्य जनकत्वे पाहता | ’

  कर्माची कारणे – अधिष्ठान, कर्ता, इंद्रिये, प्राणादिकांच्या क्रिया व दैव अशी कर्माची पाच कारणे. हीच निमित्त व उपादान कारणेही आहेत.

  त्रिगुणांविषयी – ‘शरीरमात्र पंचभूतांचे वोतले | त्या माजी त्रिगुण असती व्यापले | कोठे गुप्त कोठे असती प्रगटले | कार्यकारण रुपे || ’

  ग्रंथात येणार्‍या विवेचनाच्या बाबी – ‘तरि कोण दैवत काय उपासना | आसन ध्यान मुद्राभिधाना | मंत्र यंत्र पूजाविधाना | रूप दावूं || ’

  उपासनेविषयी मार्मिकता – ‘तुवा पुसली जे का उपासना | तिचिया दो प्रकारे असती भावना | प्रवृत्तीनिवृत्त्यात्मक भिन्ना | सगुण आणि निर्गुण || ’  या संहितेवरील प पू काकांचे मार्मिक व खुलासेवार निरूपण – देहावरील प्रेम व जगतसत्यत्व दृढ असेल तर त्याचेसाठी प्रवृत्तिपर सगुण उपासना सांगितली आहे. देहतादात्म्य कमी असून जगतभ्रम नाहीसा होत येईल तशी त्याने निर्गुणाची उपासना करावी.

  सत्संगाविषयी सुबोध, प पू डॉक्टर काकांच्या शब्दांत – हा सर्व पारमार्थिक विषय पुर्णपणे समजावून घेण्याइतकी समज ब बुद्धी नसेल तर ज्यांना ती आहे त्यांच्या संगतीत त्याची सेवा करित राहणे हाच आत्मलाभाचा एक मार्ग उरतो.

  • पूर्ण ग्रंथात या पुढे उपासनेची प्रक्रिया, प्रणवोपासना, उपासनेचे रहस्य, उपासनेत अंतर्भूत बाबी, ‘आता भक्ती कासयासी म्हणिजे | कवण्या प्रकारे देवासी भाजिजे || आणि श्रीगुरूंसी शरण रिगिजे | कवणेपरी देवा || आणि माया अविद्द्या आहे कैसी | कैसे जाणावे जीव ईश्वरासी | देहशोधन तया योगाभ्यासासी | जाणिजे कैसे जी || ’ ह्या प्रश्नांच्या उत्तरातून लक्षात येतात प पू काका वाचकाचे लक्ष वेधतात ती बाब उपासनेचा आवाका किती मोठा आहे हे जाणून ‘आत्मेत्येवोपासीत | हा उपनिषदांचा उपासनाविषयक संदेश ध्यानात घेऊन सर्वव्यापक व सार्वभौम आत्मोपासनेचा अवलंब करावा. ’
  • ग्रंथाच्या पुढील प्रकरणात उपरोक्त प्रश्नांचा व त्यांच्या उत्तरांचा विस्तृत उहापोह केलेला आहे.
  • थोडक्यात असे की ज्याला जे उपासना इ साधन भावते त्याला त्याचे विस्तृत मार्गदर्शन स्वानुभव दिनकरात उपलब्ध आहे. मूळ ग्रंथाइतकाच प पू डॉक्टर काकांचा निरूपण ग्रंथही परिपूर्ण आहे. उलट स्वानुभव निरुपणातून प पू डॉक्टर काकांनी स्वत:च्या लेखन कौशल्याने स्वत:चा ग्रंथ सरसपणे अधिक खुलसेवार, रोचक व सुबोध केलेला आहे असे म्हणणे अतिशयोक्ति नाही हे प्रत्यक्ष वाचल्यावर वाचकालाच जाणवेल.

  प पू दिनकर स्वामी, प पू डॉक्टर काका आणि श्रीकृपाप्रकाशन यांनी माज पामरासी बहाल केलेल्या थोरपणाबद्दल कृतज्ञभावनेने विनम्र वंदन करते. अलं अधिकविस्तरेण | इति प्रस्तावनामर्यादा |

   कु मंदाकिनी गंधे

  अमरावती  

  संपूर्ण ग्रंथ (केवळ व्यक्तीगत उपयोगा करिता)

  Swanubhav Dinkar


  हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

  Blog Search